Latest

ज्या भावाच्या हातावर राखी बांधली, त्याच भावाचा बहिणीवर हल्ला; अहिल्यानगर हादरलं ! नेमकं काय घडलं?

अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील राखसवाडी खुर्द येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतातील कांदा आणल्याच्या कारणावरून भावाने बहिणीशी वाद घातल्याचा आरोप आहे.

४ सप्टेंबरला कांदा आणल्याचा जाब विचारत भावाने बहिणीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर दोन दिवसांनी हा वाद पुन्हा उफाळला.

बहिणीच्या घरी नातेवाईक जमले असताना काही जणांनी महिलांसह तरुणावर लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही मारहाण झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

या घटनेत महिलांसह काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. एवढंच नाही, तर पुन्हा येथे आलात तर जीवे मारू, अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी अलका भाऊसाहेब चोरमले यांनी फिर्याद दिली असून कर्जत पोलिसांनी रामदास पिंगळे, रखमाजी रुपनर यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कांद्यावरून सुरू झालेला वाद हिंसाचारापर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button