
नेवासे तालुक्यातील निपाणी निमगाव येथे ज्येष्ठ दाम्पत्याला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
राधाकिसन पंढरीनाथ पवार आणि त्यांच्या पत्नीने नातेवाईकांकडून पाईपलाइन वारंवार तोडली जात असल्याची तक्रार केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २५ एप्रिलला रात्री त्यांच्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फोडण्यात आली. यावेळी विचारणा केली असता शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
२२ ते ३० ऑगस्टदरम्यान पाइपलाइन तुटल्याने दाम्पत्याला पाण्यापासून वंचित राहावं लागलं. ३० ऑगस्टला पत्नीने इतरांच्या मदतीने पाइपलाइन जोडली; मात्र दुसऱ्याच दिवशी ती पुन्हा फोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
राधाकिसन पवार यांना चालण्यास अडचण असून त्यांच्या पत्नीला दृष्टीची समस्या आहे. त्यामुळे या वयातही पाण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. दरम्यान, नेवासेचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिलं आहे.





