
नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी वर्षभर शिल्लक असतानाच पारनेरच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. पारनेरचे नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून दिला जाणार असल्याने इच्छुकांची संख्या व रंगत वाढणार आहे. नगराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा आ. निलेश लंके व त्यांच्या सर्व विरोधकांमध्ये टशन रंगणार आहे. निलेश लंके हे लोकसभेला विजयी झाले असले, तरी त्यानंतर विधानसभेला मात्र त्यांना पत्नीलाही निवडून आणता आले नाही. पारनेर तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता लंके विरोधकांची एकी व ताकद दोन्हीही वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी नगराध्यक्षपदासाठी लंकेंना बरंच झुंजावं लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं कसं आहे पारनेरचं गणित याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
पारनेर नगरपंचायतीची निवडणूक 2022 साली झाली होती. म्हणजेच जानेवारी 2027 पर्यंत तिची मुदत आहे. परंतु निवडणूक आयोगाने आत्ताच पारनेरचा पुढच्या नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर केले आहे. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे 7, शिवसेनेचे 6, तालुका विकास आघाडीचे 2, अपक्ष 2 व भाजपचा एक असे 18 नगरसेवक निवडून आले होते. सत्ता स्थापनेसाठी 10 चा आकडा कोणत्याच पक्षाला पार करता आला नव्हता. अखेर त्यावेळी विद्यमान आ. निलेश लंके यांनी तालुका विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांसह एका अपक्षाची मदत घेत विजय औटी यांना नगराध्यक्ष केले होते. ही संधी सव्वा वर्षे टिकली. त्यानंतर नगराध्यक्ष विजय औटी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर नितीन आडसूळ यांना संधी मिळाली. मात्र या सत्तेच्या सारीपाटात विजय औटी यांनी निलेश लंके यांच्यावर आरोप करत त्यांच्यापासून सवता सुभा केला. विजय औटी यांची हिच नाराजी नंतर निलेश लंके यांना चांगलीच महागात पडली.
यावेळी नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा विजय सदाशिव औटी हे लंकेंच्या विरोधातील सर्वात प्रमुख नेते असणार आहेत. आ. काशिनाथ दाते व माजी खा. सुजय विखेंच्या मार्गदर्शनाखाली विजय औटी पुन्हा एकदा खा. निलेश लंके यांचे पानिपत करतील, असे फासे टाकले जात आहेत. याशिवाय वसंत चेडे, अशोक चेडे, युवराज पठारे, निलेश खोडदे, नितीन आडसूळ, योगेश मते, अर्जुन भालेराव आदींची भुमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. तालुक्यातील सर्व लंके विरोधकांना पुन्हा एकदा ताकद देण्याचा प्रयत्न विखे गटाकडून करण्यात येणार आहे. हेच तालुक्यातील लंके विरोधक नगरपालिका निवडणुकीत आपापल्या गटाला सक्रीय करत लंकेविरोधात मोट बांधणार असल्याच्या चर्चा आहेत.
यावेळी निघालेली नगराध्यक्षपदाची सोडत ही ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे सहाजिकच इच्छुकांची संख्या वाढणार आहे. परंतु विधानसभेलाही इच्छुकांची संख्या जास्त असताना विखेंनी डाव टाकत सर्व लंके विरोधकांना एकाच झेंड्याखाली आणले होते. नगरपालिका निवडणुकीतही पुन्हा एकदा हिच स्टॅटर्जी आमलात आणली जाईल, अशा चर्चा आहेत. ही निवडणुकही महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच होण्याची शक्यता आहे. शिवाय स्थानिक पातळीवर लंकेंवर नाराज असलेल्या ठाकरे गटावरही अनेक घडामोडी अवलंबून असणार आहे. विधानसभा निवडणुकीत लंकेंनी पारनेरची जागा शिवसेनेला सोडण्याचा शब्द दिल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. तरीही लंके हट्टाला पेटले व आपल्या पत्नीला मविआकडून तिकीट मिळवून दिले, असा आरोप शिवसेनेने केला होता. त्याचा फटका लंके यांना बसला होता. आताही ठाकरे गटाची नाराजी दूर करण्यात लंके किती प्रमाणात यशस्वी ठरतात, यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. दाते, झावरे व शिंदे व विखे गट यावेळी विजय औटी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल, असे सांगितले जात आहे.





