Explained

Explained : Pathardi Nagar Parishad | पाथर्डीचा नगराध्यक्ष कोण? राजळे-ढाकणे- घुलेत तिरंगी लढतीची शक्यता

पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. ओबीसी प्रवर्गाचा उमेदवार नगराध्यक्ष होणार आहे. गेल्या दहा बारा वर्षांपासून पाथर्डीला पुरुष नगराध्यक्ष असल्याने यावेळी महिलेला आरक्षण मिळेल, असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही. यावेळी महिलेला नगराध्यक्ष होण्याची संधी आहे, मात्र इच्छुक पुरुषांची संख्या पाहता, हे सध्यातरी शक्य दिसत नाही. परंतु ऐनवेळी राजळे-ढाकणे गटातून एखाद्याने महिलांना संधी दिल्यास हे अशक्यही नाही. दुसरीकडे ढाकणे गट हा राजळेंचा परंपरागत विरोधक असला तरी, गेल्या काही दिवसांपासून ढाकणे भाजपच्या स्टेजवर दिसत असल्याने ते ऐनवेळी राजळेंशी सलगी करतील का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. नेमकं कसं आहे पाथर्डी नगर परिषदेचं गणित.. याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

पाथर्डी नगरपरिषदेसाठी यावेळी 10 प्रभागांतून 20 उमेदवार निवडून दिले जाणार आहेत. पूर्वी ही संख्या 17 होती. यावेळी प्रभागांच्या पुनर्रचनेत तीन सदस्यांची भर पडली आहे. नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून दिला जाणार असल्याने रंगत वाढली आहे. यावेळी पाथर्डी पालिकेसाठी सुमारे 24 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्यावेळी राजळे गटाने ढाकणे गटावर मात केली होती. यावेळीही याच दोन्ही गटांत निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांत पाथर्डीचे स्थानिक राजकारण बदलले आहे. पक्षातून विरोध असला तरी, राजळेंनी जवळपास सर्वच संस्थांवर एकहाती वर्चस्व निर्मान केले आहे. विधानसभेत विजयाची हॅट्रीक केली आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर, शरद पवार गटाची राज्यातील ताकदही मर्यादीत झाली आहे. त्यामुळे पक्षात प्रताप ढाकणे हे अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रताप ढाकणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची सलगी वाढवली आहे. ढाकणे हे मुळचे भाजपचेच असल्याने ते लवकरच पुन्हा स्वगृही येतील, असेही सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी ढाकणेंच्या कारखान्याला मदत केली. त्या उपकाराची परतफेड म्हणून ढाकणे राजळेंसोबत युती करणार का, हा प्रश्नही विचारला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ढाकणे हे भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढती करतील की, भाजप प्रवेशाच्या चर्चा फोल ठरवत निकराने लढाई करतील, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

यंदा पाथर्डीत आजी-माजी आमदार असलेल्या शिवाजीराव गर्जे व चंद्रशेखर घुले यांचा गटही चांगलाच अँक्टीव्ह झालेला दिसत आहे. चंद्रशेखर घुलेंना विधानसभेला राजळेंना टक्कर द्यायची असेल तर, स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करावी लागणार आहे. त्यादृष्टीने ते पाथर्डी नगर परिषदेत लक्ष घातलील असाही अंदाज बांधला जात आहे. असे झाले तर, पाथर्डी नगर परिषदेसाठी राजळे, ढाकणे व घुले अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे राजळेंची ताकद लक्षात घेता, ढाकणे, घुले व इतर पक्षातील राजळे विरोधक हे एक होऊन राजळेंसोबत एकास एक लढत देतील, अशाची चर्चा रंगल्या आहेत.

सध्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, डाँ. मृत्यूंजय गर्जे, बजरंग घोडके, मंगल कोकाटे. अमोल गर्जे यांची नावे चर्चेत आहे. याशिवाय राजळे विरोधक म्हणून बंडू बोरुडे यांच्यासह काही अपक्षही अचानक चर्चेत आले आहे. नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून येणार असल्याने स्पर्धा ऐनवेळी वाढणार आहे. सर्वच पक्षांना सर्वसमावेशक चेहरा शोधावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button