Explained

Explained : Nilesh Lanke | भेटी, भाषणे, व्हिडीओ, फोटो आणि पुरावे… सिस्पेबाबत खा. लंकेंवर गंभीर आरोप…

अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना सिस्पेने चुना लावला. सुमारे 3 हजार कोटींचा गफला झालाय. या सगळ्या घोटाळ्यात, नगर दक्षिणेचे खा. निलेश लंके यांचा सहभाग असल्याचा आरोप, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळ यांनी केला आहे. या संघटीत गुन्ह्याला खासदार लंके यांची मदत झाली असून, याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत, असं ठोकळ यांचं म्हणणं आहे. सोमवारी त्यांनी नगरच्या जिल्हा पोलिस अधिक्षकांसह थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना, याबाबतचा तक्रार अर्ज पाठवला. या प्रकारामुळे नगरच्या राजकारणात आता चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोपींचा पाहुणे-रावळे म्हणून प्रचार करण्यापासून घोटाळा उघड झाल्यावर त्यांना पाठीशी घालण्यापर्यंत खा. लंके यांचा पुढाकार असल्याचा आरोप ठोकळ यांनी केलाय. नेमकं काय आहे प्रकरण व काय आहे आरोप, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून सिस्पे, इन्फिनीटी सारख्या सुमारे 20 कंपन्यांनी, नगर व पुणे जिल्ह्यातील साध्याभोळ्या गुंतवणूकदारांची लूट केली. या कंपन्यांचे मास्टरमाईंड सध्या फरार आहेत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकल्यावर एक-एक करुन तक्रारी दाखल होऊ लागल्या. परंतु गेल्या चार वर्षांत, या कंपनीने नगर दक्षिणेचे खा. निलेश लंके यांच्या मदतीनेच हातपाय पसरले असा थेट आरोप, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठोकळ यांनी केला. त्यांनी याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षकांना तक्रार अर्ज दिला. शिवाय या तक्रारीच्या प्रती, थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डीजीपी रश्मी शुक्ला यांनाही पाठविल्या आहेत.

या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या 3-4 वर्षांत या कंपन्यांनी आपले बस्तान बसविले. ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून स्थानिक एजंटांकडून गुंतवणूकदार वाढवले. सुमारे दीड लाख साध्याभोळ्या गुंतवणूकदारांना या कंपन्यांनी फसवले. यात 25 ते 30 मुख्य सूत्रधार आहेत. नगर जिल्ह्यात सुमारे 11 हजार एजंट पैसे गोळा करत होते. सिस्पे-इन्फिनीटीसारख्या सुमारे 15 ते 20 कंपन्या या घोटाळे बहाद्दरांनी सुरु केल्या होत्या. विशेष म्हणजे गेल्या तीन-चार वर्षांतील या घोटाळ्यात, खा. निलेश लंके यांच्या मदतीचा सहभागही दिसून येत आहे….

ठोकळ यांनी निलेश लंके यांच्या सहभागाचे पुरावेही दिले आहेत. निलेश लंके यांचे आरोपींसोबतचे फोटो, व्हिडीओ, भाषणे आणि बातम्या ठोकळ यांनी या तक्रारीसोबत जोडल्या आहेत. ठोकळ यांचे नेमके म्हणणे काय? ते आपण पाहू…

⦁ तक्रारीत म्हटले आहे की, या कंपन्यांचे आठ महिन्यांपूर्वी सुपा येथे कार्यालय स्थापन झाले. त्याचे उद्धाटन स्वतः निलेश लंके यांनी केले.
⦁ या भाषणात त्यांनी पारनेकरांना सांगितले की, या कंपनीचे मालक माझे पाहुणे आहेत. त्यांनी अगोदर श्रीगोंदा येथे व आता पारनेर येथे ही कंपनी सुरु केली.
⦁ माझे सहकारी रुपयाला रुपया जोडतात, असेही लंके यांनी भाषणात सांगितले होते. त्यानंतर साध्याभोळ्या लोकांचा या कंपनीवर विश्वास बसला. वास्तविक, लंके यांनी भाषणात ज्या अधिकाऱ्यांची नावे घेतली होती, तेच अधिकारी या घोटाळ्यात नंतर आरोपी झाले. लंके यांच्या आवाहानानंतर गुंतवणूक काही कोटींनी वाढली. म्हणजेच लंके यांचाही या घोटाळ्यात स्पष्ट सहभाग दिसतोय, असा ठोकळ यांचा आरोप आहे.
⦁ सिस्पे कंपनी ही इन्फिनीटीला मर्ज झाली आहे, असेही लंके यांनी सांगितले होते. परंतु वास्तविक ही कंपनी एमसीएला अँक्टीव्ह आहे. म्हणजेच खा. लंके यांनी खोटं बोलून लोकांना फसवलंय, असही तक्रार अर्जात म्हटलं आहे.
⦁ श्रीगोंद्यात 7 जुलैला फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आरोपी निष्पण्ण झाले. हेच आरोपी त्यानंतर संसदेत थेट खा. लंके यांना भेटले. या भेटीचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतरच आरोपी फरार झाले. 2022 मध्ये या कंपनीने काही गाड्यांचे अनावरण केले. हे अनावरण खा. लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके यांच्या हस्ते झाले. म्हणजेच लंकेसह त्यांच्या कुटुंबाचाही आरोपींची प्रसिद्धी करण्यात हात आहे, असा आरोप ठोकळ यांनी केलाय.
⦁ दुसऱ्या एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत खा. लंके म्हणतात की, पैसे गोळा करणाऱ्या एजंटवर कारवाई करु नका. मी एसपींशी बोलतो. मग लंके दोषी स्थानिक एजंटांना का पाठीशी घालतात? का या आरोपींना भेटतात? या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद गाडीलकर संसदेत लंकेंना भेटला. त्यानंतर लंके यांनी त्यांना थेट शरद पवारांकडेही नेले, असाही आरोप ठोकळ यांनी केला आहे.
⦁ राणी लंके यांच्या प्रचारात याच घोटाळ्यातील आरोपींच्या गाड्या होत्या, असा आरोपही ठोकळ यांनी केला आहे.
⦁ शिवाय आरोपींच्या सोशल मिडिया अकांऊंटबाबतही ठोकळ यांनी शंका उपस्थित केली आहे. ठोकळ यांनी तक्रार अर्जात जोडलेले पुरावे व फोटो हे आरोपींच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन घेतलेले आहे. परंतु आता आरोपी फरार झाल्यावर आरोपींचे अकाऊंट प्रायव्हेट केले आहे. म्हणजेच आरोपी त्यांचे स्वतःचे अकाऊंट अजूनही चालवतात. मग ते पोलिसांना सापडत का नाहीत? असा सवालही ठोकळ यांनी केला आहे.

वास्तविक ठोकळ यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी जोडलेले पुरावेही तितकेच गंभीर आहेत. हा तक्रार अर्ज थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठविल्यामुळे या तक्रारीला वजन प्राप्त झाले आहे. या सगळ्या तक्रारीनंतर खा. लंके अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button