
2006 साली श्रीरामपूरचे नगराध्यक्षपद हे खुले होते. त्यावेळी संजय फंड यांनी कारभार हाकला. आता तब्बल 19 वर्षानंतर श्रीरामपूरचे नगराध्यक्षपद खुले झाले. शिर्डी लोकसभा किंवा श्रीरामपूर विधानसभा, ही तालुक्यातील राजकारणाची दोन्ही प्रमुख पदे यापूर्वीच आरक्षित आहेत. या आरक्षणामुळे श्रीरामपूरचे स्थानिक पुढारी गेल्या कित्येक वर्षांपासून वनवासात असल्यासारखेच आहेत. परंतु आता याच पुढाऱ्यांना आयती संधी चालून आली आहे. त्यामुळे थोडे न थिडके तब्बल डझनभर उमेदवार नगराध्यक्ष होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. नेमकं काय चाललंय श्रीरापूरात, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले झाले. आरक्षण जाहीर होताच, श्रीरामपूरातील चौकाचौकात फटाके फोडण्यात आले. स्थानिक नेत्यांचा राजकीय दुष्काळ किमान नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचणार, हे यामुळे निशित झाले. कारण शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा, या दोन्ही प्रमुख निवडणुकांत श्रीरामपूरातील प्रमुख पुढारी फक्त प्रचारापुरतेच मर्यादीत रहावे लागत होते. इच्छा असूनही आरक्षणामुळे त्यांना निवडणूक लढविता आली नाही. फक्त किंगमेकर हा शिक्का त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फ्लेक्सवर दिसत होता. त्यामुळेच आता खुल्या झालेल्या नगराध्यक्षपदासाठी तब्बल डझनभर इच्छुकांनी दंड थोपाटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढतील, असे सांगण्यात आले आहे. परंतु श्रीरामपूरमध्ये हे शक्य नसल्याचे सध्याच्या राजकीय समिकरणावरून दिसत आहे. पारंपारिक पुढाऱ्यांसह यंदा नव्या चेहऱ्यांनीही नगराध्यक्षपदाचा दावा दाखल केल्याने रंगत वाढली आहे. महायुतीत जी स्थिती आहे, तीच स्थिती महाविकास आघाडीतही आहे. महाविकास आघाडीत सध्या काँग्रेसच्या ससाणे गटाचे पारडे जड दिसत असले तरी, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार गटही पडद्यामागून चाचपणी करताना दिसत आहे. गेल्यावेळी शुअर शीट म्हणून गणल्या गेलेल्या राजश्री ससाणे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. माजी मंत्री कै. गोविंदराव आदीक यांच्या कन्या अनुराधा आदीक यांनी त्यावेळी बाजी मारली होती. खरंतर त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते यांच्या पत्नी दिपाली चित्ते याही रिंगणात होत्या. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेऊन अनुराधा आदिक यांना पाठींबा दिला. या पाठींब्यामुळे भाजप व महायुतीची मते, अगदी शेवटच्या क्षणी आदीक यांच्या पारड्यात पडल्याचे त्या विजयी झाल्या असेही सांगितले गेले.
आताही सर्वच पक्षातील दिग्गजांनी चाचपणी सुरु केली आहे. त्यात अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, संजय फंड, काँग्रेसकडून राजश्री ससाणे किंवा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, श्रीनिवास बिहाणी, अंजुम शेख, प्रकाश चित्ते, माजी नगरसेवक अशोक कानडे, शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख सचिन बडदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अॅड. संतोष कांबळे, स्नेहल खोरे, राष्ट्रीय श्रीराम सेवा संघाचे सागर बेग आदींची नावे चर्चेत आली आहेत. काही वर्षांपूर्वी श्रीरामपूरचं राजकारण माजी आ. भानुदास मुरकुटे व ससाणे गटाभोवतीच फिरताना दिसत होतं, परंत आता परिस्थिती बदलली आहे. श्रीरामपूर विधानसभेची जागा गेल्या तीन टर्मपासून आरक्षित असल्याने, ससाणे-मुरकुटे गटाचा स्थानिक राजकारणाचा होल्ड कमी होताना दिसत आहे. त्याऊलट गेल्या काही वर्षांपासून श्रीरामपूरमध्ये विखे गटाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले शहरातील 12 नेते भाजपमध्ये दाखल झाले. त्यापूर्वी ससाणे-मुरकुटे गटाने बाजार समिती निवडणुकीत विखे गटाशी युती केली होती. परंतु ऐन पदाधिकारी निवडीत ससाणे-मुरकुटे गटाने विखे गटाची साथ सोडली. ससाणे-मुरकुटे गटाच्या याच खेळीचा बदला आता विखे गट घेण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
नगराध्यक्षपदाचा विचार केला तर, अनुराधा आदिक यांच्याविरोधात पुन्हा एकदा राजश्री ससाणे उभ्या राहतील, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे. शिवाय अंजुम शेख यांनीही त्यांच्या समाजाची एकगठ्ठा मते घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतोय का, हे येत्या काही महिन्यांत समजणार आहे. दुसरीकडे गेल्यावेळी विधानसभा रिंगणात अपक्ष उमेदवारी केलेले राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत कुणीही पाठीशी नसताना सागर बेग यांनी सुमारे 50 हजारांच्या आसपास मते घेतली होती. हिंदू समाजाला एकत्र करण्यात सागर बेग त्यावेळी यशस्वी ठरले होते. आताही त्यांनी अशीच चाल खेळली तर, त्यांच्या निवडीच्या शक्यताही वाढणार आहेत. दुसरीकडे विखेंचे कट्टर समर्थक समजले जाणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचीही गेल्या काही दिवसांपासून चांगलीच क्रेझ वाढली आहे. नितीन दिनकर व सागर बेग हे दोन्ही चेहरे श्रीरामपूरच्या राजकारणात नवीन आहेत. त्यामुळे पारंपारिक राजकारणाला कंटाळलेले श्रीरामपूरकर या दोघांपैकी एकाला डोक्यावर घेतील, असेही सांगितले जात आहे. त्यात नितीन दिनकर हे उमेदवारीपेक्षा किंगमेकरच्या भुमिकेत दिसतील, असेही सांगितले जात आहे. दिनकर व बेगयांच्या चालीवरच श्रीरामपूरचा नगराध्यक्ष ठरेल, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.





