
डिसेंबरपर्यंत नगरपालिका व नगर परिषदेच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. प्रत्येक टर्म लोकप्रतिनीधी बदलाचा इतिहास नेवासेकरांनी गेल्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. आता याच आजी-माजी आमदारांमध्ये नगरपंचायतीची लढाई रंगणार आहे. नेवाशाचं वारं गेल्या काही दिवसांपासून भगवं झाल्याचं दिसत आहे. दुसरीकडे गडाखांनाही आपल्या अस्तित्वासाठी घनघोर लढाई करावी लागत आहे. त्यामुळे नेवासा नगरपंचायतीची निवडणूक ही यावेळी अभूतपूर्व होईल, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे. दिवाळीनंतर गडाखांचे अनेक माजी नगरसेवक महायुतीत दाखल होण्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. गडाख आपला गड राखतील का? लंघे- प्रभाकर शिंदे हे हातपाय पसरतील का? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
नेवासे नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने, गेल्या कित्येक दिवसांपासून स्वतःचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी धडपडणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. महायुती व महाविकास आघाडीपेक्षा, नेवाशात लंघे-गडाख गटांभोवती राजकारण फिरते. याशिवाय आम आदमी पार्टी, भाजप, बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती असे पक्षही अधून मधून आपले अस्तित्व दाखवतात. नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने यावेळी काही अपक्षही नशिब आजमावतील, असे सांगितले जात आहे. आरक्षण जाहिर झाल्यानंतर लगेचच काही इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरु केला. आता हा प्रचार शेवटपर्यंत चालेल का, हे भविष्यात कळेल.
नेवासा नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतरची ही दुसरीच निवडणूक आहे. गेल्यावेळी 2017 ला ही निवडणूक झाली होती. त्यावेळी शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे 17 पैकी 9 नगरसेवक निवडून आले होते. तर भाजपचे 6 नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस व अपक्षाने एक जागा पटकावली होती. नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित निघाल्याने जास्त नगरसेवक निवडून आले तरी, गडाखांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाला सत्तेच्या खुर्चीपासून दूर रहावे लागले होते. कारण या जागेवर भाजपच्या संगिता दत्तात्रेय बर्डे या निवडून आल्या होत्या. पहिले अडीत वर्षे त्यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षात पुन्हा गडाख गटाच्या योगिता पिंपळे यांनी नगराध्यक्षपदाची खुर्ची पटकावली होती.
यावेळी नगरसेवक वाढले आहेत. शिवाय नगराध्यक्षपदही सर्वसाधारण जागेसाठी खुले आहे. त्यामुळे यंदा सहाजिकच इच्छुकांची संख्या वाढली आहे. सोशल मीडियावर भावी नगरसेवक म्हणून दिवाळीचे मॅसेजेसही सुरु झाले आहे. काहींनी तर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे सोशल मीडियावर ठामपणे जाहीरही केले आहे. दुसरीकडे विधानसभेला पराभव झाल्यानंतर गडाख गट अस्वस्थ झाला आहे. गडाखांचा ठाकरे गटाशी घरोबाही काहींना आवडलेला नाही. पराभवानंतर पहिले काही महिने अज्ञातवासात असलेले गडाख सध्या तालुक्यात फिरताना दिसत आहेत. लंघे यांनीही आपल्या पूर्वीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांशी योग्य संवाद ठेऊन पायाला भिंगरी बांधली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रभाकर शिंदे यांच्यासोबत सध्या नेवासा नगरपंचायतीसाठी खल सुरु आहे. सत्ताधारी पक्ष असल्याने व इच्छुकांची संख्या जास्त असल्याने भाजप-शिवसेना युतीला उमेदवारी देताना कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे काही गडाख गटातील काही माजी नगरसेवक हे लवकर लंघे गटात किंवा भाजपमध्ये सहभागी होतील, अशाही चर्चा रंगल्या आहेत. गडाखांनीही आपली रणनिती आखली आहे. भेटीगाठीसह पडद्यामागील हालचालीही वाढल्या आहेत. पराभवानंतर आपले अस्तित्व दाखवून देण्याचा गडाखांचा प्रयत्न आहे.





