
राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नुकतेच निधन झाले. या निधनानंतर सर्वपक्षिय नेत्यांनी दुःख व्यक्त केले. शोकसंदेश पाठविले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानाने बिहारमधून शिर्डीला आले. तेथून नगर-मनमाड या ऐतिहासीक खराब रस्त्याने बुऱ्हानगरला गेले. कर्डिलेंच्या अंत्यविधीलाही सर्वपक्षिय नेते उपस्थित होते. यावरुन कर्डिलेंचा आवाका कळतो. कर्डिलेंचे लोणीच्या विखेंसोबत असलेली मैत्री सर्वसूत होती. विखे 2019 ला भाजपात येण्यापूर्वी, कर्डिले- विखे ही मैत्रीची गाडी रुळावर आली होती. त्यामुळेच कर्डिलेंच्या अचानक जाण्याने मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खा. सुजय विखे यांना सर्वात जास्त दुःख झाले. विशेष म्हणजे कर्डिलेंच्या निधनाच्या अधल्या दिवशी सुजय विखे व कर्डिले हे लोणीत बरोबरच होते. पंडीत प्रदीप मिश्रा यांना भेटण्यासाठी विखेंच्या बंगल्यावर गेलेल्या कर्डिलेंचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत कर्डिलेंचा हात धरुन सुजय विखेंनीच त्यांना आधार दिल्याचे दिसले होते. विखे-कर्डिलेंचा हा हातात हात आताचा नव्हता. या हाताला थेट सात-आठ वर्षांचा इतिहास होता. नेमकी कशी होती विखे-कर्डिलेंची मैत्री याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
नगर दक्षिणेचे तत्कालीन खा. दिलीप गांधी यांच्याऐवजी भाजप विखे कुटुंबाला संधी देईल अशा चर्चा 2018 ला सुरु झाल्या होत्या. 2019 ला लोकसभेची निवडणूक होणार होती. त्यावेळी विखे कुटुंब हे काँग्रेसमध्ये होते. तर दुसरीकडे राहुरी विधानसभेचीही पुनर्रचना होऊ पाहत होती. आता राहुरी विधानसभेत राहुरीसह नगर व पाथर्डी तालुक्यातील गावे जोडली गेली होती. त्यावेळी शिवाजीराव कर्डिले हे राहुरीचे आमदार होते. बंद पडलेला राहुरी कारखाना सुरु करायचा असेल तर कर्डिलेंना विखेंची मदत हवी होती. कारण कर्डिलेंचा सहकाराशी संबंध नव्हता. परंतु राहुरी कारखाना ही त्यांच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची बाब होती. त्यामुळे कारखाना सुरु करण्यासाठी, कर्डिलेंना विखेंची मदत लागणार होती.
एकडे सुजय विखेंचा मूड पाहता विखे नगर दक्षिणेची लोकसभा निवडणूक लढविणार, हे ही स्पष्ट होऊ लागले होते. नगर जिल्ह्याचं हे बदलत राजकारण शरद पवारांच्या डोळ्यावर आलं. विखे कुटुंबाशी असलेलं वैर पाहता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली नगर दक्षिणेची जागा सोडण्यास नकार दिला. हट्टाला पेटलेल्या सुजय विखेंनी त्यानंतर थेट भाजपात जात उमेदवारी मिळवली. ही उमेदवारी मिळविल्यावर कर्डिले व विखे हे एकाच पक्षात आले. परंतु त्या अगोदर जवळपास एक वर्षांपासून या दोघांचेही मिले सूर मेरा तुम्हारा सुरु होते. विखे कर्डिलेंना राहुरीत तर कर्डिले विखेंना नगरमध्ये मदत करतील, असा अलिखित करार त्यावेळी सुरु होता.
विखे भाजपात आल्यावर कर्डिले व विखेंचे सुर जास्त जमू लागले. आता शरद पवारांनीही नवी चाल खेळली. विखेंना लोकसभेला कर्डिले मदत करतील, हे लक्षात घेऊन पवारांनी कर्डिलेंचे जावई असलेल्या, संग्राम जगतापांना त्यांच्याविरोधात उभं केलं. कर्डिलेंची गोची झाली. एकीकडे विखेंची मैत्री व दुसरीकडे जावई अशा द्विधा मनस्थितीत गुंतलेल्या कर्डिलेंनी अखेर मैत्रीला जागण्याचा निर्णय घेतला. पक्षाला व मैत्रीला बाधा येणार नाही, हे लक्षात घेऊन कर्डिलेंनी त्यावेळी सुजय विखेंना मदत केली. या मदतीच्या जोरावरच विखे बहुमताने निवडून गेले.
त्यापूर्वी राहुरी कारखाना सुरु करण्यासाठी, कर्डिलेंच्या हट्टापायी विखेंनी त्यांना मदत केली होती. राहुरी कारखाना स्वतः विखेंनी चालवायला घेतला होता. कर्डिलेंना त्यांच्या राजकारणाला, या कारखान्यामुळे चांगली मदत मिळणार होती. झालेही तसेच. विखेंच्या मदतीमुळे राहुरी कारखाना सुरु झाला आणि इकडे कर्डिलेंच्या मदतीमुळे विखे लोकसभेतही पोहोचले. त्यानंतर विखे-कर्डिले मैत्रीचा नवा अध्याय सुरु झाला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत कर्डिलेंच्या थोडक्यात पराभव झाला. विखे भाजपमध्ये आल्यामुळे हा पराभव झाल्याच्या अफवा त्यावेळी उठविण्यात आल्या. मनभेद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु चाणाक्ष कर्डिलेंनी विखेंची साथ सोडली नाही. त्यानंतर पुढे पाच वर्षे कर्डिले घरीच होते, तरी त्यांनी प्रत्येक कामात विखेंची सोबत केली. कर्डिले-विखे कुटुंबातील प्रेम कमी होऊ दिलं नाही.
विखेंनीही या मैत्रीची लगेच परफेड केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ध्यानीमनी नसताना अध्यक्षपदाची माळ कर्डिलेंच्या गळ्यात पडली. त्यावेळी पडद्यामागून व पडद्यापुढून सगळ्या चाली स्वतः मंत्री विखेंनी खेळल्या. जी गोष्ट अशक्य होती, ती गोष्ट विखे-कर्डिले जोडगोळीने करुन दाखवली. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीलाही विख-कर्डिले जोडगोळीने करिश्मा करुन दाखवला होता. विधानसभेला तर, विखेंच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघापैकी 10 मतदारसंघात महायुतीचा आमदार झाला होता. त्यात स्वतः शिवाजीराव कर्डिलेही होते. विखेंच्या मदतीमुळेच कर्डिलेंनी माजीमंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरेंचा पराभव करुन दाखवला होता.
कर्डिले-विखेंच्या याच मैत्रीला कुणाचीतरी दृष्ट लागली. कदाचित पुढच्या अडीच वर्षांत कर्डिलेंना मंत्रीपदाची संधीही मिळाली असती. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. विखेंच्या पुढाकाराने कर्डिले मत्रीही होतील, अशा चर्चा कर्डिलेंचे कार्यकर्ते करत होते, परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. या निधानाने सर्वात जास्त धक्का बसला तो सुजय विखेंना… विखेंचा एक सच्चा दोस्त या जगातून निघून गेला. ही पोकळी न भरुन येणारीच आहे. त्यामुळे कर्डिलेच्या अंत्यविधीला विखेंच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहिले. जे झाले ते झाले. परंतु एकमेकांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी विखे-कर्डिलेंची ही मैत्री नगरच्या राजकारणात नक्कीच सुवर्णअक्षरात लिहीली जाईल, हे मात्र नक्की…





