Explained

Explained : Rahuri Nagar Parishad | तनपुरे गटाला निवडणूक सोप्पी नक्कीच नसणार; सुजय विखे लक्ष घालतील?

राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे व प्रभागातील नगरसेवकांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. ही निवडणूक अनेक वर्षे रखडल्याने आता स्थानिक राजकारण्यांमध्ये उत्साह संचारला आहे. परंतु यावेळी पहिल्यांदाच नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले. शिवाय 12 प्रभागातील 24 जागांसाठीचे आरक्षणही जाहीर झाले. राहुरीच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी प्रवर्गातील नगराध्यक्ष होणार असल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मित निधनानंतर भाजपची कामगिरी कशी राहील, हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे. नेमकी कशी आहेत, राहुरीची गणिते याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

राहुरी नगरपरिषदेवर गेली कित्येक वर्षे तनपुरे गटाची सत्ता होती. तनपुरे यांच्या विरोधात विखे-कर्डिले व इतर अनेक स्थानिक पुढाऱ्यांनी युत्या-आघाड्या केल्या परंतु माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर परिषदेवरील आपली पकड ढिली पडू दिली नाही. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र नगर परिषद हद्दीतील याच हक्काच्या वोट बँकेने तनपुरेंना हिसका दाखवला होता. राहुरी शहरातून तनपुरेंना म्हणावे तेवढे लीड मिळाले नव्हते. त्याला नगर परिषदेचा कारभार हेही एक कारण असल्याचे त्यावेळी सांगितले गेले. आता याच नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्याने, तनपुरेंना सत्ता टिकविण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे.

राहुरी नगर परिषदेसाठी यापूर्वी 10 प्रभागांतून 20 नगरसेवक निवडून दिले जात होते. यावेळी दोन प्रभाग वाढले आहेत. म्हणजेच आता 12 प्रभागांतून 24 जणांना नगर परिषेदेत जाण्याची संधी मिळणार आहे. नगर परिषदेवर यावूर्वी माजी खा. प्रसाद तनपुरे, डाँ. उषाताई तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, माजी आ. प्राजक्त तनपुरे यांच्या गटानेच सत्ता भोगली. गेल्या निवडणुकीतही तनपुरे गटाने एकहाती सत्ता जिंकली. त्यावेळी विखे-कर्डिले गट एकत्र तनपुरे विरोधात लढला मात्र त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र शहराचे व तालुक्याचे राजकारण 360 अंशात बदलले. प्राजक्त तनपुरे यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर स्थानिक तनपुरे विरोधी गट व विखे-कर्डिले गट चांगलाच अँक्टीव्ह झाला. स्थानिक राजकारणात विखे- कर्डिले गटाचा दबदबा वाढला. परंतु गेल्याच आठवड्यात आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनाने भाजप कार्यकर्ते सध्या सैरभैर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजप तनपुरे गटाचा कसा सामना करील, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

राहुरी नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जमातीला नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. या आरक्षणामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. एसटीसाठी ही खुर्ची राखीव झाल्यामुळे सामान्य कुटुंबातील नेत्यांना संधी मिळणार आहे. सध्या माजी नगरसेवक कैलास माळी, माजी नगरसेवक सुनील पवार, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे, डाँ. अंगराज पवार, गोरख नाना बर्डे यांची नावे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. यापैकी कोणता पक्ष कुणाला संधी देणार यावरही बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. शिवाय शेवटच्या टप्प्यात डाँ. सुजय विखे पाटील हेही भाजपच्या गटाला मार्गदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्ष निवडताना स्थानिक पातळीवर काम करण्याचा अनुभव, जनसंपर्क, क्षमता या बाबींचाही विचार होणार आहे.

ही निवडणूक जनसेवा मंडळ व विकास मंडळ या पारंपारिक गटांत होईल की महायुती व महाविकास आघाडीत होईल, हेही येत्या काही दिवसांत कळणार आहे. परंतु सध्यातरी सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, अशा शक्यता वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button