
नेवासा तालुक्यातील सोनई, खूप वर्षांपूर्वी तिहेरी हत्याकांडाने गाजले होते. त्यानंतर आता, एका दलित युवकाला झालेल्या मारहाणीनंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आलेय. जुन्या वादाच्या रागातून सोनईतील युवक संजय वैरागर याच्यावर गेल्या आठवड्यात जिवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरु झाली. या सगळ्या प्रकरणाला जातीपातीचं वळण मिळाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप, मोर्चे, रास्तारोको, असे सगळे प्रकार सुरु झाले. बुधवारी याच प्रकरणात सोनईतील व्यापारी असोसिएशन व ग्रामस्थांनी निषेध व निवेदन देण्याचे नियोजन केले आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
काही वर्षांपूर्वी सोनईत दलित समाजातील तिहेरी हत्याकांड चांगलेच गाजले होते. सवर्ण समाजातील कुटुंबाने तिन तरुणांना जीवे मारुन बोअरवेलमध्ये टाकले होते. हे हत्याकांड त्यावेळी चांगलेच गाजले. त्यानंतर आता एका दलित समाजातील तरुणावर जिवघेणा हल्ला झाला. जुन्या भांडणाच्या वादातून हा सगळा प्रकार झाल्याचे प्रथमदर्शन दिसले. हल्ला झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना दाखल केलेल्या फिर्यादीनंतर, या प्रकरणात जातीय वाद असल्याचा कंगोरा समोर आला. कुटुंबियांच्या आरोपानुसार जातीय वैमनस्यातून ही मारहाण करण्यात आली. 10 ते 12 आरोपींनी संजय वैरागर याला गाडीत जबरदस्तीने बसवून अज्ञात ठिकाणी नेले. तेथे लाकडी दांडा व लाथाबुक्यांनी निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीत जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी केल्यानंतर या प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जखमी संजय वैरागर याला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुटुंबियांच्या फिर्यादीवरुन 11 जणांवर विविध कलमांसह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. या सगळ्या प्रकारानंतर विविध दलित संघटनांनी, हे प्रकरण उचलून धरले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणात भाष्य केले. आरोपीच्या नातलगांशी फोनवर चर्चा केल्यानंतर, त्यांनी या प्रकरणाबाबत आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन ट्विट केले. त्या ट्विटमध्ये त्यांनी या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय लवकरच आपण या पिडीत कुटुंबाची भेट घेण्यासाठी सोनई येथे जाणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी विविध दलित संघटनांनी घोडेगाव येथे नगर- संभाजीनगर महामार्गावर रास्तारोको आंदोलनही केले.
प्रकरणाची एक बाजू समोर आल्यानंतर, लगेच दुसरी बाजूही समोर आली. या घटनेतील संशयित आरोपी व सोनईतील व्यावसायिक गणेश चव्हाण यांनी संजय वैरागर याच्यावर गंभीर आरोप केले. संजय वैरागर हा सोनईतील सराईत गुन्हेगार असून, त्याने आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. याबाबत आपण सोनई पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, याच तक्रारीचा राग येऊन अगोदर संजय वैरागर याने आपल्यावर जिवघेणा हल्ला केल्याचा आरोप गणेश चव्हाण याने केला. गणेशवर सध्या नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेथेच पत्रकारांशी बोलताना त्याने केलेले हे आरोप व्हायरल झाले. गणेश चव्हाण यांच्या म्हणण्यांनुसार, संजय वैरागर हा सोनईतील सराईत गुन्हेगार आहे. याच्याविरोधात तातडीने कारवाई करून विशेष तपास पथक (SIT) नेमावे, अशी मागणी आपण केली आहे. वैरागर याच्यावर खूनाचा प्रयत्न, खंडणी, हफ्तेखोरी, आणि पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. वैरागर हा पूर्वीच्या गुन्ह्यात जामीन न घेता सोनईत मोकळेपणाने फिरत आहे, असा आरोप चव्हाण याने केला. गणेश चव्हाण यांनी सांगितले की, वैरागर याने आपल्या दुकानात येत, खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता. मी गुन्हा दाखल केल्याच्या रागातून माझ्यावर हल्ला केला. हे प्रकरण पूर्णपणे सूडभावनेतून केलेले असल्याचे चव्हाण याचे म्हणणे होते.
व्यावसायिक गणेश चव्हाण याने केलेले आरोप गंभीर होते. गणेश चव्हाण यांच्या रुग्णालयातील आरोपानंतर सोनईतील स्थानिक भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानेही फेसबुक लाईव्ह करत, जखमी वैरागर याच्याविरोधातील काही पुरावे मांडले. या घटनेत हिंदू- दलित वाद जाणूनबुजून आणल्याचा आरोप, या फेसबुक लाईव्हमध्ये करण्यात आला. हल्ला झालेल्या संजय वैरागर याच्यावर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे व त्याबाबत वर्तमानपत्रात यापूर्वी आलेल्या बातम्यांची कात्रणेही दाखविण्यात आली. शिवाय या प्रकरणात हिंदूत्ववादी संघटनेशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांवर कसे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, याची माहितीही देण्यात आली. या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर सोनईत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. याच प्रकरणात आता सोनई ग्रामस्थ व व्यापारी असोशिएशनतर्फे बुधवारी सोनई पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे. सोनईतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बॅनर सध्या व्हायरल होत आहेत.
मारहाण, दाखल झालेले गुन्हे, जखमी व आरोपींनी केलेले आरोप…. हे सगळं गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. हा वाद जुन्या भांडणातून झाला, भाईगिरीतून झाला, खंडणी मागितल्यावरुन झाला, की थेट दलित-सवर्ण वादातून झाला… हे सगळं पोलिसांना तपासावं लागणार आहे.





