Explained

Explained : Devlali Pravara Nagar Parishad | सत्यजित कदमांची पूर्ण तयारी, महाविकास आघाडीचीही एकास एक देण्याची तयारी?

नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण साठी खुले झाल्याने देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीत रंगत जास्त वाढली आहे. सुमारे 40 वर्षांच्या या नगरपंचायतीत दर पाच वर्षांला सत्तांतर होण्याची परंपरा गेल्या पंचवार्षिकला रोखली गेली. जनतेतून नगराध्यक्ष झालेल्या भाजपच्या सत्यजित कदम यांची सध्या नगराध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चा सुरु आहे. शिवाय विरोधी महाविकास आघाडीच्या बैठकांचा जोरही वाढला आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट यावेळी जोरदार तयारी करुन लढत देईल, अशी गणिते मांडली जात आहे. दुसरीकडे प्रहरानेही निवडणुकीत रंगत वाढली आहे. कदमांविरोधात एकास एक उमेदवार देण्याची तयारी सध्या सुरु असून देवळालीत रंगत वाढली आहे. नेमकी कशी आहे देवळालीतील गणिते? कोण होणार देवळालीचा नगराध्यक्ष? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांचे आजोळ म्हणून देवळाली प्रवरा प्रसिद्ध आहे. देवळालीतील कदम कुटुंबाचा अजित पवारांसोबत नातेसंबंध असला तरी, कदम कुटुंब हे भाजपमध्ये आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देवळालीतील स्थानिक स्वराज्य संस्थांवर, नगर परिषदेवर कदम कुटुंबाचाच बोलबाला राहिलेला आहे. देवळालीची नगर परिषद ही 40 वर्षांची असून आजही तिचा राज्यात दबदबा कायम आहे. या क वर्गातील नगर परिषदेने स्वच्छता अभियानासह अन्य अभियानामध्ये राज्य व देश पातळीवरील बक्षिसे पटकाविल्याने तिची कायम चर्चा होते. या नगर परिषदेत दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतो असा इतिहास होता. परंतु गेल्यावेळी जनतेतून नगराध्यक्ष झालेले सत्यजित कदम यांनी भाजपची पकड आणखी घट्ट बनविली. यावेळीही भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी सत्यजित कदम यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे.

यावेळी 10 प्रभागांतून 20 नगरसेवक निवडून देण्यात येणार आहे. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले असून, सर्वच जागांसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. महाविकास आघाडीसह भाजप व शिंदे गटाच्या स्वतंत्र बैठका आत्तापर्यंत झाल्या. अर्थात महाविकास आघाडी व महायुतीतील सर्व पक्ष एकत्र लढतात की, स्वतंत्र लढतात यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण राहिले असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. विशेष म्हणजे, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही याच नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण होते. त्यामुळे या वेळीही विविध पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवारांची चुरस अधिक रंगणार असल्याचे संकेत आहेत.

राजकीय क्षेत्रात सध्या या निर्णयामुळे चांगलाच उत्साह आणि हालचाल सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असून त्यात सत्यजित कदम, गणेश भांड, सचिन ढुस, बाबासाहेब मुसमाडे, अण्णासाहेब चोथे, शैलेंद्र कदम, प्रशांत मुसमाडे, हरीष वाळुंज, सुनील कराळे, संतोष चोळके, आप्पासाहेब ढुस, अजय खिलारी, डॉ. विश्वास पाटील, अजिंक्य कडू आदी संभाव्य इच्छुकांचा यात समावेश आहे.

अजित पवार व विखे या निवडणुकीत लक्ष घालतात का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदर देवळाली प्रवराच्या नगराध्यक्षपदासाठी सध्या चांगलीच रंगत आली असून, येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button