
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजासाठी सरकारने मोठा दिलासा दिलाय. शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून नुकसान भरपाईपोटी निधी वितरण प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, दिवाळी सणापूर्वीच ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत असून त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. नगर जिल्ह्याला किती मिळाली नुकसानभरपाई, किती पैसे जमा होणार, कसे जमा होणार, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
गेल्या काही महिन्यांत नगर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करून निधी वितरण करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. अनेक जिल्ह्यांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, मदतीचे प्रत्यक्ष वितरणही सुरू झाले आहे. नुकत्याच आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपये एवढा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे:
त्यात सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठीही ४८० कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, बीड जिल्ह्याला सर्वाधिक नुकसान भरपाई मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील ८ लाख ६ हजार ५१३ शेतकऱ्यांसाठी तब्बल ५७७ कोटी ७८ लाख रुपये एवढी विक्रमी मदत मंजूर करण्यात आली आहे. तसेच, नांदेड जिल्ह्यालाही भरीव मदत मिळाली असून, पूर्वी मंजूर झालेल्या ५४५ कोटी रुपयांनंतर आता पुन्हा २८ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी असलेली ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. यामुळे प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता राखली जाईल आणि शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय लवकरात लवकर दिलासा मिळेल. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या निकषांनुसार, दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मदतीचे मेसेजही येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याचे जे ठोस आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने पाऊले टाकली जात आहेत. निधी वितरणाचे काम वेगाने सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पंचनामे पूर्ण झालेल्या सोलापूर, छत्रपती अहिल्यानगर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांसाठीही लवकरच निधी मंजूर करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
नगर जिल्ह्याचा विचार केला तर, जिल्ह्यातील अकोले वगळता इतर सर्व तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यानुसार दिसते. जिल्ह्यातील सुमारे 8 लाख 27 हजार 117 शेतकऱ्यांचे 6,02,194. 50 हेक्टर क्षेत्र बाधित समजण्यात आले आहे. त्यांना 84,696.89 कोटींचा निधी वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास शनिवारपासून सुरुवात झाल्याचे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले. त्यामुळे किमान फुल न फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड होण्याची चिन्हे आहेत.





