
गेल्या काही दिवसांपासून वांबोरी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा अखेर विहिरीत मृत्यू झाला. गडाख वस्ती परिसरातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.
रविवारी संदीप गडाख विहिरीतील पाणी पाहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या दिसला. त्यांनी तातडीने वांबोरी पोलिस आणि वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले आणि शवविच्छेदन केले.
भक्ष्याच्या शोधात असताना अंदाज चुकल्याने बिबट्या विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, गडाख वस्ती, जवरे वस्ती, मोरेवाडी, पठारे वस्ती आणि कलापुरे वस्ती परिसरात पाळीव प्राणी आणि कुत्रे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लोडशेडिंगमुळे रात्री परिसरात अंधार होत असल्याने वन्यप्राण्यांचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी रात्री कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.





