अहिल्यानगरमध्ये गेल्या आठवड्यात एक रक्तरंजीत हत्याकांड घडलं. या दुर्देवी घटनेनंतर मोठा जनक्षोभ उसळला. शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा कब्रस्थानजवळ, धीरज परदेशी या महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला शुक्रवारी मारहाण झाली. त्यानंतर उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहराचं वातारवण अचानक बदललं. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत महापालिकेच्या एका वायरमनला अटक केली. त्यानंतर टप्प्याटप्याने सात जणांना अटक झाली.
अजूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आ. संग्राम जगताप यांनी नुकतीच या प्रकरणात प्रेस घेऊन तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. परंतु हे सगळं सुरु असताना, आता या प्रकरणात रोज नवनवीन बातम्या येऊ लागल्या आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या याच खेळात धीरज हत्या प्रकरणाचा तपास मागे पडेल का? या शंका आता उपस्थित होऊ लागल्या आहेत. नेमकं काय चाललंय नगरमध्ये?
तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर धीरज परदेशी या युवकाचा ९ ऑगस्टला मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी पहिल्या फिर्यादीत पुन्हा खुनाचा गुन्हा दाखल केला. मुख्य हल्लेखोर मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद हे हल्ल्यानंतर हैदराबादला पळून गेले होते. पोलिसांनी हैदराबाद सिटी पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली.
१३ ऑगस्ट रोजी मुख्य संशयितांना मदत केल्याच्या आरोपावरून इम्रान मुसा सय्यद यालाही अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ७ आरोपी जेरबंद झाले. हे सर्व आरोपी आता पोलिस कोठडीत आहे. आरोपींच्या नागरदेवळे हद्दीतील अनधिकृत बांधकामावर तेथील ग्रामपंचायत प्रशासनाने बुलडोझर चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या.
धीरजच्या कपाळावर भगवा टिळा असल्यामुळे कट्टरतावाद्यांनी पूर्वनियोजित कट रचून त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप धीरज यांच्या पत्नीने आणि आ. संग्राम जगताप यांनी केला. दुसरीकडे, काही नेत्यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग न देण्याचे आवाहन केले आणि जुन्या वादातून ही घटना घडल्याच्या चर्चा केल्या. त्यामुळे प्रकरण पुन्हा तापले. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या.
आरोपींना तात्काळ फाशी द्यावी आणि त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवावा या मागणीसाठी डीएसपी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दोन दिवस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आंदोलकांशी फोनवरुन चर्चा केली. जलदगती न्यायालयात हा खटला चालवला जाईल आणि सक्षम विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाईल, असे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि अंत्यविधी पार पडला.
हे सुरु असतानाच, महापालिका कामगार युनियनने मुकुंदनगर भागात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर काम बंद आंदोलन केले. मयत धीरज यांच्या पत्नीला शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची मागणीही लावून धरली. आ. संग्राम जगताप यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन “पोलीस तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणाच्या मूळ ‘मास्टरमाइंड’चा शोध घ्यावा” अशी मागणी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. नगरमधील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष्य करत असून, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
पोलिसांनी आतापर्यंत काही आरोपींना अटक केली असली, तरी या हत्येमागे असणारे मुख्य ‘मास्टरमाइंड’ वेगळेच आहेत. पोलीस या मुख्य सूत्रधारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून त्यामागचा खरा चेहरा समोर आणला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुकुंदनगर आणि संबंधित संवेदनशील भागात अजूनही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
या सगळ्या प्रकरणात आता ठाकरे गटाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. त्यांनी आ. जगतापांना १० प्रश्न विचारले.
डीएसपी चौकातील आंदोलनादरम्यान आ. जगताप मुकुंदनगरला एकटा घुसणार, असं म्हणाले होते. मग ते कधी घुसणार आणि किती वाजता घुसणार? हे सांगा
आरोपींच्या घरांवरती संग्राम जगतापांचा बुलडोझर चालणार ते कधी चालणार? हे सांगावे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचंच सरकार आहे. मग धीरजचा कुटुंबाला आत्तापर्यंत तुम्ही किंवा सरकारने किती मदत केली? ते सांगा महानगरपालिकेत सत्ता तुमची आहे. मग धीरजच्या कुटुंबातील कुणाला नोकरी दिली किंवा किमान प्रस्ताव तरी दिला का? याची माहिती नगरकरांना द्यावी.
धीरजच्या अंत्यसंस्कारप्रसंगी सगळे शहर बंद होतं. मग तेव्हा तुमची हाँटेल्स, परमीटरुम चालू होते. मग तुम्हाला वेगळा न्याय का? बंद दरम्यान, तुमच्याच प्रभागातील बुरुडगाव रोडवरील व्यापारी गांधी बंधूंना दुकान बंद करण्यासाठी मारहाण झाली. मारहाण झाली ते हिंदू होते व मारहाण करणारेही हिंदू नव्हते का?
आंदोलनानंतर हिंदूवर गुन्हे दाखल झाले. त्यात तुमच्या कुटुंबातील कुणावर गुन्हा दाखल झाला? हे सांगावे. आंदोलन झालं तेव्हा, २०० पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले, मग तुमच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही.? हिंदूच्याच राज्यात हिंदूच असुरक्षित का? अहिल्यानगरमध्ये तुम्ही किती हिंदू मुलांना नोकऱ्या दिल्या आणि नगरमध्ये किती कंपन्या आणल्या? याचं उत्तर द्या, असं आवाहन काळे यांनी केलं.
आता हे सगळं सुरु असतानाच, मुकुंदनगर परिसरातील वॉर्ड क्रमांक चारमधील काँग्रेसचे नगरसेवक शम्स समीउल्ला खान यांना इंस्टाग्रामवर मेसेज करून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नगरमधील नगरसेवकाला दक्षिण आफ्रिकेतून धमकी दिली गेल्याने खळबळ उडाली. येत्या 24 तासांत काहीतरी स्टेटमेंट दे, नाहीतर तुझा व्हिडिओ टाकून तुझी इंस्टाग्रामवर बदनामी करेन, अशी धमकी आपल्याला दिल्याची तक्रार शम्स खान यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीनंतर, मुळ मुकुंदनगर येथील व सध्या दक्षिण आफ्रिका येथे राहत असलेल्या आकीब असीफ सय्यद (वय 30) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
आता हे सगळे आरोप-प्रत्यारोप, आणि घटना पाहता, धीरज रजपूत प्रकरणाचा रेंगाळणार का? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. हत्या प्रकरणाची चर्चा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय का? असंही बोललं जाऊ लागलं आहे. पोलिस सध्या सगळ्याच अँगलने तपास करत आहेत. परंतु त्यानंतर रोज घडणाऱ्या या प्रकरणांमुळे पोलिस तपासावर दबाव येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.





