Explained

Babanrao Dhakne | काकूंचा पराभव तर केलाच, पण मंत्रीपद मिळवून बीडला न्यायही दिला…

नगर जिल्ह्यातील निवडणुकांचा इतिहास पाहिला, तर अनेक धक्कादायक निकालांची नोंद आढळते. मंत्री, राज्यमंत्री, किंवा थेट केंद्रीय मंत्री असलेले नेतेही, अगदी अविश्वसनिय पद्धतीने पराभूत झाले आहेत. बाहेरच्या नेत्यांना नगर जिल्ह्यात स्थिरावू न देण्याचा, इथला इतिहास आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले किंवा अगदीच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचं उदाहरण यानिमित्ताने देता येतं. पण थांबा… नगर जिल्ह्याच्या इतिहासाचं याबाबतचंच एक पान मात्र दखलपात्र राहिलंय. नगर जिल्ह्यातील एका नेत्यानं, दुसऱ्या जिल्ह्यात जावून लोकसभेची खासदारकी मिळवलीय. बरं, आदिकांसारखे ते काही राज्यसभेवर वगैरे गेले नाहीत, तर थेट जनतेतून निवडणूक लढवून त्यांनी सलग दोन वेळा खासदार असलेल्या एका महिला दिग्गज नेत्याला त्यांच्याच जिल्ह्यात धूळ चारलीय. या अफलातून नेत्याचं नाव होतं, बबनराव ढाकणे. आणि पराभूत झालेल्या दिग्गज महिला नेत्याचं नाव होतं, केशरकाकू क्षीरसागर. आता केशरकाकू हे नावच एवढं मोठं आहे की, त्यांना महाराष्ट्राच्या प्रती इंदिरा गांधी म्हटलं जायचं. पण याच काकूंना बीडमध्ये जावून पराभूत करण्याची किमया, बबनरावांनी साध्य केली होती. नेमकं काय होती या निवडणुकीची गंम्मत? चला सविस्तर पाहू…

१९८९ साली देशात ९ व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. ही निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासातील युगप्रवर्तक निवडणूक मानली गेली. या निवडणुकीने भारताला पहिल्यांदाच ‘आघाडी सरकार’ आणि ‘त्रिशंकू संसद’ या नव्या राजकीय पर्वाचा परिचय करून दिला. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या निधनानंतर काँग्रेसने विक्रमी ४१४ जागा जिंकल्या. राजीव गांधींकडे देशाची सूत्रे गेली होती. परंतु बोफोर्स घोटाळा आणि अंतर्गत वादांमुळे १९८९ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पुन्हा काहीशी बॅकफूटला गेली. या वर्षीच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त १९७ जागा जिंकता आल्या. तरीही काँग्रेस हा संसदेतील सर्वात मोठा पक्ष होता. मात्र, स्पष्ट बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता असल्याने राजीव गांधींनी सत्ता स्थापन करण्यास नकार दिला आणि विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तत्कालीन लोकप्रिय नेते विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली ‘नॅशनल फ्रंट’ ही आघाडी स्थापन करण्यात झाली. यामध्ये जनता दल, तेलगु देसम पक्ष, द्रवीड मुन्नेत्र कळघम आणि आसाम गण परिषद यांसारख्या प्रादेशिक पक्षांचा समावेश होता. जनता दलाला या निवडणुकीत १४३ जागा मिळाल्या होत्या. रामजन्मभूमी आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन भाजपनंही २ वरुन थेट ८५ जागा जिंकण्यापर्यंत मजल मारली होती. या सगळ्या डाव्या पक्षांनी व्ही. पी. सिंग यांना पंतप्रधान केलं खरं, पण अवघ्या ११ महिन्यांत हे सरकार कोसळलं. व्ही. पी. सिंग यांचे सरकार कोसळल्यानंतर जनता दलात उभी फूट पडली. चंद्रशेखर यांनी ६४ खासदारांना सोबत घेऊन ‘जनता दल- समाजवादी’ नावाचा नवा गट स्थापन केला. राजीव गांधी यांच्या काँग्रेसने चंद्रशेखर यांना बाहेरून पाठिंबा दिला आणि १० नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर प्रधानमंत्री बनले. याच चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये नगरचे फायर ब्रँण्ड नेते बबनराव ढाकणे, यांना ‘केंद्रीय ऊर्जा संसाधन राज्यमंत्री’ होण्याची संधी मिळाली.

ढाकणे केंद्रात मंत्री झाले, पण ते नगरमधून निवडून आले नव्हते, हे विशेष. ढाकणे हे मुळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील धडाडीचे तरुण नेते होते. १९८९ मध्ये बीडमधून लोकसभा निवडणूक जिंकण्यापूर्वी बबनराव ढाकणे यांनी जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेतेपदापर्यंतची अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. १९६७ ते १९७७ अशी सलग १० वर्षे ते नगर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९७२ ते ७५ या पाच वर्षांत ते पाथर्डी पंचायत समितीचे सभापतीही होते. पुढे १९७८ ते १९७९ मध्ये सलग आमदारही होते. पुढे कॅबिनेट मंत्रीही होते. १९८१-८२ ला ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापतीही होते. नगरच्या राजकारणात, ते एक फायरब्रँण्ड नेते म्हणून ओळखले जात होते. परंतु तरीही १९८९ साली नगर सोडून ते थेट बीडची लोकसभा निवडणूक लढवायला गेले.

आता या जिल्हा बदलामागे, स्थानिक राजकीय स्थिती कारणीभूत होती. नगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु ढाकणे हे डाव्या विचारसरणीचे नेते होते. ते त्यावेळी जनता दलात होते. जनता दलाकडूनच त्यांनी नगर दक्षिणेची १९८४ ची निवडणूक लढवली होती. परंतु त्या निवडणुकीत, काँग्रेसच्या यशवंतराव गडाखांनी त्यांचा तब्बल एक लाखांच्या फरकाने पराभव केला होता. १९८९ सालीही काँग्रेसने यशवंतराव गडाखांनाच पुन्हा संधी दिली होती. त्यामुळे पुन्हा गडाखांविरोधात लढण्याची ढाकणेंची इच्छा नव्हती. शिवाय जनता पक्षाच्या ध्येयधोरणानुसार, त्यांना पुन्हा केंद्रात जायचे होते. त्यामुळे त्यांनी नगरऐवजी, त्यांच्या पाथर्डी तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या बीड जिलह्याची निवड केली. ढाकणेंनी, त्याआधी तब्बल १५ वर्षे राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपली वेगळी छाप सोडलेली होती. वंचितांचे व उसतोड मजूरांचे नेते म्हणून ते राज्यात प्रसिद्ध होते. बीड जिल्हा हाच मुळात उसतोड मजूरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होता. शिवाय, तेथील जातीच्या राजकारणाची गोळाबेरीजही ढाकणेंच्या पथ्यावर पडणारी होती. त्यामुळे जनता दलाने, त्यांना बीडमधून लढण्याचा आग्रह केला. ढाकणे त्यासाठी लगेच तयार झाले.

केंद्रात जनता पक्षाची लाट असली तरी, बीडची परिस्थिती सोप्पी नव्हती. बीडमध्ये केशरकाकू क्षीरसागर नावाचे वादळ घोंगावत होते. केशरकाकूंनी १९८९ पूर्वी सलग दोनदा बीडची खासदारकी मिळवली होती. बीड जिल्ह्यातील नवगण राजूरी हे त्यांचं मुळ गाव. गावाच्या सरपंच, पंचायत समितीची सभापती, आमदार आणि नंतर खासदार असा त्यांच्या राजकारणाचा चढता आलेख राहिला होता. बीडच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. १९८० आणि १९८४ अशा सलग दोन वर्षे त्या बीडच्या खासदार होत्या. इंदीरा गांधींची जशी देशाच्या राजकारणावर पकड होती, तशीच काकूंची बीडच्या राजकारणावर पकड होती. बीड जिल्ह्यात असं एकही गाव नव्हतं, जिथं काकूंचा कार्यकर्ता नव्हता. परंतु याच काकूंच्या विरोधात ढाकणेंनी उमेदवारी केली. ढाकणे हे जनता दलाचे नेते होते. तर काकू काँग्रेसच्या दिग्गज होत्या. या निवडणुकीपूर्वी ढाकणेंनी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना, ऊसतोड कामगारांना मान्य होईल, असा करार करुन घेतला होता. त्यामुळे उसतोड कामगार व सामान्यांमध्ये ढाकणेंची हवा होती. याच हवेवर स्वार होत, ढाकणेंनी संपूर्ण बीड जिल्हा पालथा घातला. घराघरात जावून प्रचार केला. काकूंच्या सभांना जेवढी गर्दी व्हायची तेवढी गर्दी ढाकणेंच्या सभांनाही जमू लागली.

याच निवडणुकीत, भाजपने सदाशिव मुंडे नावाचा तगडा उमेदवार उभा करुन ही लढत तिरंगी केली होती. ही निवडणूक बीडच्या इतिहासातील अत्यंत चुरशीची निवडणूक ठरली. संपूर्ण जिल्ह्यात ऊसतोड कामगार, वंजारी समाज आणि काँग्रेस विरोधी तरुण वर्ग ढाकणे यांच्या पाठीशी उभा राहिला. या अत्यंत अटीतटीच्या लढतीत बबनराव ढाकणे यांना २,२९,४९६ मते मिळवून मिळाली. त्यांच्या विरोधात केशरकाकू क्षीरसागर यांना २,२७,५११ मते मिळाली. अवघ्या १,९८५ मतांच्या फरकाने काकूंचा पराभव झाला. भाजपचे सदाशिव मुंडे यांनीही तब्बल १ लाख ३३ हजार ७६० मते घेतली होती. स्थानिक नेत्यांच्या मतांचे विभाजन होऊन बाहेरच्या जिल्ह्यातील ढाकणेंनी बीडचे खासदार होण्याचा मान मिळवला होता. या विजयानंतर बबनराव ढाकणे दिल्लीत पोहोचले. पुढे जेव्हा जनता दलात फूट पडून चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात बबनराव ढाकणे यांना केंद्रीय ऊर्जा संसाधन राज्यमंत्री करण्यात आले. ढाकणेंच्या रुपाने बीड जिल्ह्याला, तब्बल ३७ वर्षांनंतर केंद्रात मंत्रीपद मिळाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button