Explained

‘तू काय डहाणूकर लागून गेला का?’ कसा होता टिळकनगर कारखान्याचा रंजक इतिहास!

बरोब्बर वर्षभरापूर्वी, म्हणजे जुलै २०२५ ला एक बातमी आली. भारतातील प्रमुख मद्यनिर्मिती करणाऱ्या एका कंपनीने, ४ हजार १५० कोटींना फ्रेंचमधील इम्पीरिअल ब्लू नावाची व्हिस्की कंपनी खरेदी केली. हा सौदा त्यावेळी देशभर गाजला. कारण भारतातील एका कंपनीने, थेट विदेशातील लोकप्रिय ब्रँण्ड एवढ्या महागड्या किंमतीत विकत घेण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतातील कोणत्याच मद्य कंपनीने, एवढा महागडा करार केला नव्हता. ही झाली बातमीची एक बाजू… पण फ्रेंचमधील व्हिस्कीची कंपनी विकत हेणारी ही कंपनी आपल्या नगरची आहे, असं आम्ही सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना… पण हे खरं होतं. तब्बल सव्वाचार हजार कोटींना विदेशी दारुचा अख्खा ब्रँण्डच त्यांनी विकत घेणारी कंपनी होती, आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर इंडस्ट्रीज.

आता ही टिळकनगर इंडस्ट्रीज काय भानगड आहे? हेही आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. स्वातंत्र्यापूर्वी देशातील निवडक खासगी कारखान्यांपैकी एक असलेला, हाच टिळकरनगरचा कारखाना एकेकाळी कौतूकाचा विषय होता. या कारखान्यात तयारी होणारी साखरेची क्वालीटी एवढी भारी होती की, थेट ब्रिटीश सैनिकांना ती पाठवली जायची. स्वातंत्र्यानंतरही या कारखान्याची साखर, कित्येक वर्षे भारतीय लष्करासाठीही दिली जायची. पण मग साखर कारखाना आणि थेट दारुचा संबंध कसा आला? साखरेचा गोडवा थेट ब्रँडी, व्हिस्कीपर्यंत कसा गेला? हेच आपण आज समजून घेणार आहोत…

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला साखर उद्योगावर ब्रिटीशांचे वर्चस्व होते. दोन दिवसांपूर्वी आम्ही हरेगाव कारखान्याच्या वैभवशाली इतिहासावर एक स्वतंत्र व्हिडीओ केला होता. या व्हिडीओत ऊस वाहून आणण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर रेल्वे नेण्याची अभिनव कल्पना ब्रिटीशांनी राबविल्याचे आम्ही सांगितले होते. या व्हिडीओवर अनेकांचा विश्वासच बसला नव्हता. काहींनी तर थेट रावळगाव येथील कारखाना हा पहिला होता, अशाही कमेंट केल्या. परंतु हे खरं नव्हतं. कारण हरेगावचा कारखाना हा थेट १९१९ च्या नोंदीनुसार, भारतातला पहिलाच साखर कारखाना होता. त्यानंतर भारतभर अनेक कारखाने सुरु झाले. परंतु या सगळ्या कारखान्यावर एकतर ब्रिटीश किंवा मोठ्या भांडवलदारांचेच वर्चस्व होते. याच काळात एका मराठी माणसानेही खासगी साखर कारखाना सुरु करण्याचे स्वप्न पाहिले व ते प्रत्यक्षातही उतरवले. त्या मराठी माणसाचं नाव होते, महादेव लक्ष्मण उर्फ बाबासाहेब डहाणूकर. इंग्रजांच्या राजवटीत बाबासाहेबांनी १९३३ मध्ये श्रीरामपूर भागात जमीन खरेदी करुन इतका मोठा आधुनिक साखर कारखाना सुरू करण्याचे धाडस केले.

हा कारखाना महाराष्ट्रातील साखर क्रांतीचा पाया मानला गेला. हरेगाव कारखान्याकडे जशी ब्रिटीशांची खासगी रेल्वे ऊस वाहतूक व्यवस्था होती. अगदी तशीच स्वतःची रेल्वे वाहतूक यंत्रणा डहाणूकर यांनीही त्यांच्या कारखान्यासाठी विकसीत केली. स्वतःच्या हजारो एकर उसाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी स्वतःचे रेल्वे नेटवर्क नेले. डहाणूकरांनी त्यांच्या शेतातील ऊस कारखान्यापर्यंत आणण्यासाठी स्वतःची छोटी रेल्वे सुरू केली होती. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खाजगी मालकीची रेल्वे धावणे ही त्या काळी अत्यंत अद्भूत आणि कौतुकाची गोष्ट मानली गेली. एका मराठी माणसाच्या या कारखान्याची व त्याच्या धाडसाची देशभरात चर्चा झाली.

बापूसाहेब डहाणूकर हे स्वतः स्वातंत्र्यसैनिक होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे ते चाहते होते. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊनच, त्यांनी या कारखान्याच्या परिसराला ‘टिळकनगर’ असे नाव दिले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात एका मोठ्या राष्ट्रीय नेत्याच्या नावाने औद्योगिक वसाहत उभारली गेल्याने हा कारखाना राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही खूप गाजला. टिळकनगर ही त्या काळातील एक स्वयंपूर्ण आणि सुसंस्कृत वसाहत होती. कामगारांसाठी पक्की घरे, क्लब हाऊस, क्रीडांगणे, मोफत रुग्णालय आणि शाळा, अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था तिथे होती.

या कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेचा दाणा पांढराशुभ्र आणि मोठा असायचा. या साखरेचा दर्जा इतका अफलातून होता की, ब्रिटीश काळातील लष्कराला आणि देशातील व्हीआयपी बाजारपेठांना याच कारखान्यातून साखर पुरवली जायची. सहकारी कारखान्यांचा उदय होण्यापूर्वी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य भाव देणारा कारखाना, म्हणून याची ख्याती होती. गळीत हंगाम सुरू झाला की, शेतकऱ्यांना पैशांची चिंता नसायची.

डहाणूकरांनी केवळ साखरेवर लक्ष न ठेवता, उसाच्या मळीपासून अल्कोहोल तयार करण्यासाठी १९४८ मध्येच डिस्टिलरी प्लांट सुरू केला. ही दूरदृष्टी पुढे चालून कंपनीसाठी मैलाचा दगड ठरली. रेल्वेने होणारी उसाची वाहतूक, अथांग वैभव, साखरेचा उच्च दर्जा आणि कुटुंबाप्रमाणे घेतली जाणारी कामगारांची काळजी, यामुळे या कारखान्याची देशभर चर्चा होती. परंतु याच वैभवाला नंतर नजर लागली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा महाराष्ट्र सरकारने कमाल जमीन धारणा कायदा आणला, तेव्हा या कारखान्याची स्वतःची हजारो एकर सुपीक जमीन सरकारने ताब्यात घेतली.

एका मोठ्या खाजगी कारखान्याची जमीन शेती महामंडळाकडे हस्तांतरित होण्याच्या या कायदेशीर लढाईमुळे हा कारखाना पुन्हा चर्चेत आला. स्वतःच्या मालकीची जमीन गेल्याने व पुढे नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याच्या स्पर्धेमुळे हा कारखाना डबघाईस आला. कारखान्याची आर्थिक गणिते बिघडली आणि १९८७ साली या कारखान्याने साखर उत्पादन अधिकृतरित्या बंद केले.

साखर कारखाना बंद पडला, तरी डहाणूकर घराण्याने आणि कंपनीच्या व्यवस्थापनाने हार मानली नाही. साखरेची निर्मिती करताना उपउत्पादन म्हणून मिळणाऱ्या मळीपासून दारू बनवण्याचा डिस्टिलरी प्लांट त्यांच्याकडे १९४८ पासून होता. त्यांनी याच व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. टिळकनगर इंडस्ट्रीची खरी ओळख पुढे त्यांच्या ‘मॅन्शन हाऊस फ्रेंच ब्रँडी’ या ब्रँण्डमुळे झाली. ही ब्रँडी भारतभरात विशेषतः दक्षिण भारतात इतकी लोकप्रिय झाली की, ती भारतातील सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम ब्रँडी बनली.

२०१३ आणि २०२३ च्या जागतिक मद्य विक्रीच्या आकडेवारीनुसार, मॅन्शन हाऊस हा जगातील सर्वात जास्त विकला जाणारा ब्रँडी ब्रँड ठरला. दरवर्षी या ब्रँडच्या तब्बल १ कोटीपेक्षा जास्त बाटल्यांची विक्री झाली. याच कंपनीने पुढे प्रिमियम ब्रँण्डी, व्हिस्की, रम आणि जीनच्या क्षेत्रातही प्रदार्पण केले. तेथेही विक्रीच्या क्षेत्रात नवे विक्रम प्रस्तापित केले. केवळ भारतातच नाही तर, ही कंपनी देशातील तब्बल ३० पेक्षा जास्त देशात मद्यविक्री करते. कतार, ओमान, युनायटेड स्टेट्‍स, अरब अमिराती, आखाती देश, केनिया, काँगो, नायजेरिया, मलेशिया, सिंगापूर, एवढंच कशाला थेट अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप या देशांतही ती विकली जाते.

टिळकनगरमध्ये तयार केलेली मॅन्शन हाऊस फ्रेंच ब्रँडी आणि कुरियर नेपोलियन ही जगभरात सर्वाधिक विकली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची ब्रँडी ठरली आहे. टिळकनगरची ही कंपनी दरवर्षी २३०० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल करते. २०२५ मध्ये टिळकनगर इंडस्ट्रीजने जागतिक दर्जाच्या ‘पर्नोड रिकार्ड’ कंपनीकडून भारतातील तिसरा सर्वात मोठा आणि प्रचंड लोकप्रिय व्हिस्की ब्रँड ‘इम्पिरियल ब्लू’ पूर्णपणे खरेदी केला. या एकाच करारामुळे टिळकनगर इंडस्ट्रीजला भारतीय व्हिस्की बाजारपेठेत थेट ८% ते ९% चा हिस्सा मिळाला.

साखरेच्या गोडव्यापासून सुरु झालेला हा प्रवास थेट जगभरातील दुसऱ्या क्रमांकाच्या मद्यनिर्मितीपर्यंत पोहाचला आहे. हे एक नगरकर म्हणून आपल्यासाठी निश्चित कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button