शिर्डी जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात, गुरुवारी एक मोठी आणि नाट्यमय घडामोड समोर आली. गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेली मुख्य आरोपी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलिसांसमोर हजर झाली. चौकशीनंतर बाहेर आलेल्या कल्लना खरातशी बोलण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला, परंतु तिने बोलण्यास नकार देत, तेथून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे, या जमीन खरेदी प्रकरणात तिने दिलेल्या महत्त्वपर्ण स्टेटमेंनंतर या प्रकरणाचा तपास पुन्हा नव्याने सुरु झाल्याच्या चर्चा आहेत. नेमकी काय आहे ही घटना? किती कोटींच्या संपत्तीचा आहे हा गोलमाल?
शिर्डी येथील शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी ही मूळ तक्रार ३१ मार्च २०२६ रोजी दाखल केली होती. गोंदकर यांच्या शिर्डीलगतच्या निघोज परिसरातील ४ एकर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पैशांच्या अडचणीत असलेल्या या शेतकऱ्याला जाळ्यात ओढून, भोंदू अशोक खरात याने अवाजवी व्याज व व्यवहाराच्या नावाखाली ही जमीन लाटल्याचा आरोप ठेवून, गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी प्राथमिक व्यवहारात साडेपाच कोटींहून अधिकचा आर्थिक खेळ समोर आले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ३१ मार्च २०२६ रोजीच भोंदूबाबा अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, आणि मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनवणे व अशोक तांबे यांच्याविरुद्ध फसवणूक आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर गुन्हा दाखल होताच आरोपी कल्पना खरात फरार झाली होती.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कल्पना खरात हिच्या नावे आणि बेनामी संपत्तीच्या माध्यमातून ७० पेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा संशय आहे. शिर्डी, पुणे, नाशिक ते अगदी रायगडमधील उरणपर्यंत या मालमत्ता पसरलेल्या आहेत. हा एकूण बेनामी मालमत्तेचा आणि संपत्तीचा आकडा तब्बल १००० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, पती तुरुंगात असतानाही उरणमध्ये जमीन खरेदीचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली होती.
शिर्डीत गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार होती. त्या दरम्यान तिने या प्रकरणात आपला प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे सांगत कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयाने तिला अंतरिम जामीन मंजूर केला असून, चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ती गुरुवारी शिर्डी पोलिसांत हजर झाली.
पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला, मात्र आपल्याला या व्यवहारांविषयी काहीही माहीत नाही, नवऱ्याने सांगेल तिथे आपण फक्त कोऱ्या कागदांवर सह्या केल्या, असा बचावात्मक पवित्रा तिने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस आता तिच्या जबाबाची सत्यता पडताळणार आहेत. बेनामी संपत्तीचे धागेदोरे, आर्थिक रसद आणि या प्रकरणातील इतर राजकीय किंवा स्थानिक पांढरपेशा सहकाऱ्यांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. जर तिने सहकार्य केले नाही किंवा पुरावे हाती लागले, तर तिचा जामीन रद्द होऊन तिच्यावरील कायदेशीर कारवाईचा बडगा अधिक तीव्र होऊ शकतो.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर कल्पना खरात पोलीस ठाण्याबाहेर आल्या. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले आणि कोणतेही अधिकृत भाष्य न करता त्या निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणातील नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.





