Explained

चांद बिबी आणि बहिरी ससाणा : एका ऐतिहासिक चित्रामागील दडलेलं रहस्य!

मित्रांनो, इतिहास केवळ युद्धांच्या तारखा आणि राजांची नावं सांगत नाही. तर अनेकदा इतिहासाची सर्वात मोठी रहस्यं ही, जुन्या चित्रांच्या एका कोपऱ्यात दडलेली असतात. स्क्रीनवर दिसणारं हे चित्र नीट पाहा. घोड्यावर स्वार झालेली एक शूर महिला आणि तिच्या हातावर शांतपणे बसलेला एक शिकारी बहिरी ससाणा..! ही महिला म्हणजे मुघल साम्राज्याला आणि थेट सम्राट अकबराच्या सैन्याला घाम फोडणारी एक लढवय्यी विरांगणा होती… नाव होतं, चांदबीबी… होय, चांद बिबी… तेव्हा अहमदनगर नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थानाची ‘वारियर क्वीन’!

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात, अनेक राजे आणि मुस्लिम शासकांना, हातावर ससाणा घेऊन शिकार करताना दाखवलं गेलंय. अर्थातच हे सगळे शासक पुरुष होते. पण, चांद बिबी या एकमेव अशा महिला राज्यकर्त्या आहेत, ज्यांची ओळख या ‘बहिरी ससाण्या’शिवाय अपूर्ण मानली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की चांद बिबी यांच्या प्रत्येक पेंटिंगमध्ये हा ससाणा का दिसतो? ही केवळ त्यांची शिकारीची आवड होती, की यामागे त्यांच्या घराण्याचं कोणतं मोठं रहस्य दडलं होतं? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण इतिहासकार डॉ. सारा वहीद यांच्या ‘Chand Bibi: The Lives and Legends of a Warrior Queen’ या पुस्तकाच्या आधारे आणि ४०० वर्ष जुन्या ऐतिहासिक पुराव्यांसह यामागचं खरं कारण शोधणार आहोत. चला तर मग, इतिहासाचं हे पान उलटून पाहूया!

हे रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर, चांद बिबी कोण होत्या, हे माहीत असणं गरजेचं आहे. चांद बिबी यांचा जन्म १५४७ मध्ये आत्ताच्या अहिल्यानगर व तेव्हाच्या अहमदनगरच्या निजामशाही घराण्यात झाला. त्या काळात दक्षिण भारतातील हिंदू राज्ये पूर्वीच लोप पावली होती. फक्त विजयनगरचे साम्राज्य हे एकमेव हिंदू राज्य दक्षिणेत होते. याशिवाय बहामनी या दक्षिणेतील मुस्लिम राज्याचीही पाच शकले झाली होती. ती होती, निजामशाही, अदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बेरीदशाही…

विजयनगर राज्याच्या विरोधात या पाचही शाह्यांनी काही काळापुरती एकमेकांशी युती केली होती. याच युतीच्या काळात चांदबिबीचा विवाह अली अदिलशाह याच्यासोबत झाला. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. १५८० च्या सुमारास अदिलशहाचा त्याच्याच एका नोकराने खून केला. अदिलशहा व चांदबिबीस मुलगा नव्हता. त्यामुळं पतीच्या अकाली मृत्यूनंतर विजापूरचा कारभार आणि नंतर आपल्या माहेरचं म्हणजेच, अहमदनगर साम्राज्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी चांद बिबी यांच्यावर आली. चांदबिबीने काही काळ आपल्या पुतण्या इब्राहीम अदिलशहा यास गादीवर बसवले. परंतु तो लहान असल्याने सगळा कारभार स्वतः संभाळला. तो काळ असा होता जेव्हा दिल्लीचा मुघल सम्राट अकबर संपूर्ण भारत जिंकण्याच्या तयारीत होता. त्याचं पुढचं लक्ष्य होतं ‘अहमदनगर’. १५९५ मध्ये अकबराचा मुलगा शाहजादा मुराद याने प्रचंड सैन्यासह अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला. अंतर्गत मतभेद असूनही चांद बिबींनं सर्व सरदारांना एकत्र केलं. मुघल सैन्याने सुरुंगाने किल्ल्याची भिंत उडवून दिली तेव्हा सैन्यात घबराट पसरली. अशा वेळी चांद बिबी स्वतः हातात तलवार घेऊन, अंगावर चिलखत चढवून आणि घोड्यावर स्वार होऊन युद्धभूमीत उतरल्या. त्यांनी स्वतः उभे राहून ती भिंत रातोरात पुन्हा बांधून घेतली. त्यांच्या या अभूतपूर्व साहसामुळे मुघल सैन्य थक्क झाले आणि त्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. याच शौर्यामुळे त्यांना ‘चांद सुलताना’ ही पदवी मिळाली.

आता येऊया आपल्या मूळ प्रश्नावर – त्यांच्या हातातील तो बहिरी ससाणा!

डॉ. सारा वहीद यांनी त्यांच्या पुस्तकात या प्रतिमेचं अतिशय सुंदर राजकीय विश्लेषण केलं आहे. मध्ययुगीन काळात, ससाण्याच्या साहाय्याने शिकार करणे, ज्याला ‘फॉल्कनरी’ Falconry म्हटलं जातं. ही केवळ पुरुष राजांची आणि राजपुत्रांची मक्तेदारी मानली जायची. राजपुत्रांना लहानपणापासून ससाण्याला कसं प्रशिक्षित करायचं, हे शिकवलं जायचं. ससाणा हा एक अत्यंत हिंस्त्र आणि स्वतंत्र पक्षी आहे. त्याला आपल्या हातावर शांत ठेवणे, त्याला कधी शिकारीसाठी सोडायचे आणि एका इशाऱ्यावर परत कसे बोलवायचे, हे राजाच्या अंतर्गत ‘संयम’, ‘नियंत्रण’ आणि ‘हुकूमशाही’चे प्रतीक मानले जायचे. डॉ. सारा वहीद लिहितात की, चांद बिबी यांना या रूपात दाखवून त्या काळातील कलाकारांनी एक अत्यंत शक्तिशाली राजकीय संदेश दिला होता. तो संदेश असा होता की, जरी चांद बिबी एक महिला असल्या, तरी त्यांच्याकडे एका बलाढ्य आणि सार्वभौम पुरुष राजासारखीच राजकीय ताकद, नियंत्रण आणि नेतृत्वगुण होते. त्या कोणाच्या हातातील बाहुलं नव्हत्या, तर दख्खनची सूत्रं त्यांच्या हातात होती.

पण मित्रांनो, हा दावा केवळ आधुनिक इतिहासकारांनी चित्र पाहून केलेला तर्क नाही! याला ४०० वर्ष जुने भक्कम ऐतिहासिक पुरावे आणि दाखले आहेत. १६ व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध दख्खनी इतिहासकार अहमद बिन मोहम्मद फिरिश्ता यांनी त्यांच्या ‘तारिख-ए-फिरिश्ता’ या अधिकृत ग्रंथात अहमदनगरच्या निजामशाही घराण्याच्या उत्पत्तीबद्दल एक अतिशय रंजक इतिहास लिहून ठेवला आहे. फिरिश्ता यांच्या नोंदीनुसार, चांद बिबी यांचे आजोबा म्हणजेच अहमदनगर सल्तनतचे मूळ संस्थापक मलिक अहमद यांच्या वडीलांचे मूळ नाव ‘मलिक हसन’ होते. ते मूळचे विजयनगर साम्राज्यातील होते. ज्यांना बहमनी सैन्याने कैदेत पकडून सुलतान अहमद शाह वली बहमनी यांच्या दरबारात आणले होते. तिथे त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून सुलतानाने त्यांना शाही दरबारातील ‘बाजदार’ म्हणजेच ‘शाही ससाणा पाळणारे’ प्रमुख अधिकारी म्हणून नियुक्त केलं.

ससाण्यांना प्रशिक्षण देण्याच्या आणि त्यांच्याद्वारे शिकार करण्याच्या याच अद्भूत कौशल्यामुळे सुलतानाने मलिक हसन यांना ‘बहरी’ हा किताब दिला! पर्शियन आणि दख्खनी भाषेत ‘बहरी’चा अर्थच ‘शिकारी ससाणा’ किंवा आपण मराठीत ज्याला ‘बहिरी ससाणा’ म्हणतो, तो होतो. पुढे जाऊन जेव्हा मलिक हसन यांच्या मुलाने म्हणजेच मलिक अहमद यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि ‘अहमदनगर’ शहराची पायाभरणी केली, तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ आपल्या घराण्याचं नाव ‘निजामशाही बहरी’ असं ठेवलं. समकालीन ग्रंथ ‘बुरहान-ए-मासिर’मध्येही याचा स्पष्ट उल्लेख आढळतो.

याचा अर्थ असा होतो की, चांद बिबी यांच्या हातातील तो बहिरी ससाणा केवळ एक शिकारी पक्षी नव्हता, तर ते त्यांच्या घराण्याचं ‘टोटेम’ म्हणजेच अधिकृत कौटुंबिक प्रतीक होतं! ज्याप्रमाणे मुघल आपल्या चिन्हांमध्ये सिंह किंवा सूर्य वापरायचे, त्याचप्रमाणे अहमदनगरचे निजामशाह आपल्या अस्मितेसाठी ‘बहिरी ससाणा’ वापरायचे. चांद बिबींनी आपल्या चित्रातून आपल्या याच महान पूर्वजांचा आणि घराण्याचा वारसा जगासमोर ताठ मानेने मांडला होता.

दुर्दैवाने, १५९९ मध्ये मुघलांशी तडजोड करत असल्याच्या एका चुकीच्या अफवेमुळे त्यांच्याच काही फितूर सरदारांनी महालात चांद बिबींची फितुरीने हत्या केली. पण त्यांनी दाखवलेलं शौर्य आजही भारताच्या इतिहासात अमर आहे. अहमदनगरजवळ असलेला सलाबतखानचा मकबरा आज स्थानिक पातळीवर ‘चांदबिबी महाल’ म्हणून ओळखला जातो, जो आजही या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. डॉ. सारा वहीद यांच्या पुस्तकाने इतिहास कशा प्रकारे चित्रांच्या आणि प्रतीकांच्या माध्यमातून जिवंत राहतो, याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आहे.

त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चांद बिबींचं हातावर ससाणा घेतलेलं चित्र पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा… तो ससाणा एका राजघराण्याची ओळख होता आणि त्या शूर राणीच्या राजकीय ताकदीचा मूक हुंकार होता!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button