
अनेक वर्षांपासून नागरिक आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरलेला नगर-मनमाड महामार्ग आता वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. राहाता शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने वाहतूक अधिक सुरळीत झाली असून धुळीच्या त्रासातूनही नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर-मनमाड रस्ता पूर्ण करून दाखवण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती मिळाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
डांगे स्कूल ते सावळविहीर फाटा या मार्गावर केवळ डांबरीकरणच नाही, तर रस्त्याच्या सुरक्षिततेवरही लक्ष देण्यात आले आहे.
या ठिकाणी मध्यभागी डिव्हायडर उभारण्यात आला असून दर ५० फूट अंतरावर आधुनिक पथदिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या प्रवासात वाहनचालकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे.
तालुक्यातील उर्वरित कामेही महिनाअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.





