
राज्यात नुकताच गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा मोठा उत्सव संपन्न झाला आहे. आता सगळ्यांना वेध लागले आहे ते गणेशोत्सवाचे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदाचे वातावरण आहे आणि अहिल्यानगर देखील आगामी गणेशोत्सवासाठी पूर्णतः तयार आहे.
दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरात पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्पष्ट केले.
शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या आणि मिरवणुकीत वादग्रस्त फोटो किंवा प्रदर्शन टाळा, असा सल्लाही देण्यात आला.
कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई होणार असून, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला. गणेशोत्सव केवळ उत्सव न ठेवता सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनही पोलिसांनी केले.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणासाठी मदत करून मंडळांनी समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले.





