
गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे आणि अहिल्यानगरमधील गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षी महापालिकेची परवानगी घेतलेल्या तब्बल २७२ गणेश मंडळांना यंदा पुन्हा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. राज्य शासनाच्या आदेशानुसार ही परवानगी पाच वर्षांसाठी कायम राहणार आहे.
मात्र, नव्याने स्थापन झालेल्या गणेश मंडळांना ऑनलाइन नोंदणी करून परवानगी घ्यावी लागणार आहे. मंडप, स्वागत कमानी आणि रनिंग मंडपासाठीची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
अर्ज करताना मंडळाचा पत्ता, नोंदणी क्रमांक, मंडपाचे माप, उभारणीचा कालावधी, आग प्रतिबंधक उपाययोजना आणि गर्दीची क्षमता यासह आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील.
उत्सव संपल्यानंतर तीन दिवसांत मंडप आणि कमानी हटवणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.





