कुणालाही थांगपत्ता लागणार नाही, असं अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण चालतं. कोणत्याही बाहेरच्या नेत्याला स्थिरावू दिल्याचा, इतिहास इथं सापडत नाही. अगदी राजकारणाचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या पवारांच्या नातवाला म्हणजेच रोहित पवारांनाही या जिल्ह्यानं गेल्या सात वर्षांत स्थिरावू दिलं नाही. दखलपात्र होणं, तर दूरच… सहकाराच्या याच जिल्ह्यात, सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नवं वादळं आलंय. पण याच वादळांना एका छताखाली आणणारा एक भिष्म पितामहही जिल्ह्यानं पाहिलाय, नाव आहे, यशवंतराव गडाख…
नगर जिल्हा बँकेची निवडणूक लागते… आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात… पण अचानक, या सगळ्या धुमश्चक्रीत एक नाव समोर येतं आणि विखे-थोरातांपासून ते राम शिंदेंपर्यंत सगळेच नेते आपले राजकीय झेंडे बाजूला ठेवून एका ८० वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याच्या पाया पडायला सोनईला पोहोचतात! सहकारात यशवंतरावांना एवढं महत्त्व का आहे? त्यांच्या एका शब्दावर सगळेच नेते एकत्र का येतात? का गडाखांचा एक शब्द या जिल्ह्यात अंतिम मानला जातो? आजच्या या विशेष व्हिडिओत आपण या पडद्यामागच्या थरारक राजकारणाचा आणि गडाखांच्या ३१ वर्षांच्या साम्राज्याचा सविस्तर वेध घेणार आहोत.
साधारणः दोन महिन्यांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकांची चर्चा वाढली. रणधुमाळी उडाली. राजकीय काटा काढण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. अशा अत्यंत तणावाच्या वातावरणात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी पहिली आणि सर्वात मोठी राजकीय गुगली टाकली!
गडाखांनी जाहीर केलं, “जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. राजकीय इर्षेपोटी बँकेचं नुकसान होऊ नये, म्हणून ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली पाहिजे!”
ही केवळ घोषणा नव्हती, तर जिल्हा बँकेच्या इतिहासाला कलाटणी देणारा टर्निंग पॉईंट होता. गडाखांच्या या एका विधानाने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांची गणितं बिघडवली. गडाखांच्या या अपेक्षेला भाजपचे नेते सभापती प्रा. राम शिंदे यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर विखे-पितापुत्र म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे यांनीही सोनईला जाऊन गडाखांची भेट घेतली आणि जिल्ह्यात ‘बिनविरोध’च्या हालचालींना प्रचंड वेग आला.
पण मित्रांनो, राजकारण इतकं सोपं नसतं. या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आला. तो ट्विस्ट म्हणजे खासदार नीलेश लंके आणि राम शिंदे या दोन नव्या नेत्यांची एन्ट्री! खरंतर जिल्हा बँकेच्या सक्रीय राजकारणाशी आणि सहकाराशी या दोन्ही नेत्यांचा आत्तापर्यंत थेट संबंध आला नव्हता. पण यावर्षी त्यांनी बँकेच्या राजकारणात थेट लक्ष घातलं. थेट बँक ताब्यात घेण्याची भाषा सुरु झाली. आणि नेमकं हेच सहकारातील जुन्या जाणत्या नेत्यांना खटकलं! त्याचा परिणाम काय झाला? ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त बैठक घेतली.
या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे, यात फक्त आणि फक्त सहकार क्षेत्रातील पारंपरिक जुने नेते उपस्थित होते. खासदार लंके किंवा सभापती राम शिंदे या दोन्ही पैकी कोणालाही या बैठकीचं निमंत्रण नव्हतं! म्हणजेच, बँकेवरील आपली जुनी पकड सैल होऊ द्यायची नाही, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून दिला गेला. कारण जिल्ह्यातील सहकार वाचवायचा असेल तर सहकाराबाहेरील नेत्यांना बँकेत लुडबूड करु द्यायची नाही, हे नेत्यांना चांगलं माहित होतं.
आता प्रश्न पडतो की, विखे-थोरातांसारखे दिग्गज नेते आमनेसामने असताना, गडाखांच्या एका वक्तव्यानंतर सगळं वातावरण का फिरलं? याचं उत्तर आहे गडाखांची ‘अजातशत्रू कारकीर्द’ आणि त्यांचं ‘ज्येष्ठत्व’!
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात यशवंतराव गडाख हे नाव एका पक्षापुरतं मर्यादित नाही. ते सहकारातील ‘भीष्मपितामह’ आहेत. १९९१ ते २०२१ अशी सलग ३१ वर्षे त्यांनी जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलंय. एवढंच नाही, तर तब्बल ७ वर्षे म्हणजे १९९३-९५ आणि १९९९-२००५ या वर्षांत त्यांनी बँकेचं चेअरमनपद भूषवलं. त्यांच्या अजातशत्रूत्वाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे, विखे आणि थोरात यांच्यात कितीही टोकाचा संघर्ष असला, तरी गडाखांच्या शब्दाचा मान दोन्ही बाजूंनी राखला जातो. गडाख हे कुणा एका गटाचे नाहीत, हे नेत्यांनाही माहित आहे. ते जिल्ह्याच्या हिताचा आणि वडीलकीचा विचार करतात. त्यांच्या चेअरमनपदाच्या काळात त्यांनी बँकेला राजकीय आखाडा बनू दिलं नाही.
आर्थिक शिस्त लावली, संगणकीकरण केलं आणि बँकेला नेहमी ‘अ’ ऑडिट वर्ग मिळवून दिला. त्यामुळेच आज वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा शब्द म्हणजे नगरच्या राजकारणातील अंतिम हुकूम ठरतो! जिल्हा बँकेच्या १९५८ ते २०२६ या काळात तब्बल ४१ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाले. त्यात सहकारातील तब्बल २४ नेत्यांनी आलटून-पालटून जिल्हा बँकेची धूर सांभाळली. विठ्ठलराव विखे, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले यांच्यासह यशवंतराव गडाखही जिल्हा बँकेचे कर्तेधर्ते राहिले.
यशवंतराव गडाख यांच्या या महाकाय राजकीय वजनाला दुसरी मोठी ताकद मिळते, ती म्हणजे त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वच्छ आणि सुसंस्कृत प्रतिमेमुळे! शंकरराव गडाख यांनी अत्यंत कमी वयात जिल्ह्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आक्रमक पण संयमी राजकारण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर असणारा जनतेचा अथांग विश्वास. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आजही जिल्हा विसरलेला नाही. गडाख कुटुंबाची हीच ‘क्लीन इमेज’ आणि नैतिक वजन यशवंतराव गडाखांच्या शब्दाला दुप्पट धार देतं.
जेव्हा गडाख कुटुंब एखादी भूमिका घेतं, तेव्हा त्यामागे केवळ सत्ताकारण नसतं, तर जनमानसाचा पाठिंबा असतो, हे जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याला पक्कं ठाऊक आहे. त्यामुळे गडाखांची सोनईतील आमराई किंवा नगरमधील विरंगुळा बंगला हे जिल्हा बँकेच्या राजकारणात पहिल्यापासून चर्चेत राहिलं. अगदी बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीही ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे, माजीमंत्री शंकरराव गडाख, बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनीही गडाखांशी चर्चा करुन निवडणुकीची तयारी केली. या नेत्यांमधील अंतर्गत मतभेद कितीही मोठे असले, तरी गडाखांच्या बैठकीतून बाहेर पडताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच सूर दिसला – तो म्हणजे बँकेची सुरक्षितता!
मित्रांनो, राजकारणी येतात आणि जातात, सत्ता येतात आणि जातात. पण सहकार आणि जिल्ह्याच्या हितासाठी आपला शब्द अंतिम राखणारं ‘यशवंतराव गडाख’ हे नेतृत्व आजही अहिल्यानगरचा खरा ‘किंगमेकर’ आहे, हे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केलंय.





