
श्रीरामपूरच्या काळाराम मंदिर रोडवर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरुण पाटील यांच्या कार्यालयात गप्पा सुरू होत्या. त्याचवेळी सागर बेग आणि त्याचे काही साथीदार तिथे आले. परिसरात गर्दी जमली होती. याचदरम्यान श्रेयस उर्फ विकी हिवराळे हा व्हिडीओ काढत असल्याचे फिर्यादी नागेश सावंत यांच्या लक्षात आले.
त्यांनी हा व्हिडीओ काढून टाकण्यास सांगितले. मात्र, आरोपानुसार, विकीने नकार देत शिवीगाळ केली. दुसऱ्या दिवशी नागेश यांचा मुलगा अमोल इन्स्टाग्राम पाहत असताना एका बनावट खात्यावरून तोच व्हिडीओ दिसला.
त्यानंतर अमोलने संबंधित क्रमांकावर फोन करून व्हिडीओ हटवण्याची विनंती केली. सुरुवातीला व्हिडीओ काढण्याचे आश्वासन मिळाले; मात्र नंतर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. व्हिडीओ हटवणार नसल्याचे सांगत, ‘तुम्ही आमचे बाप आहात का? तुम्हाला काय करायचे ते करा,’ अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी श्रेयस उर्फ विकी हिवराळे याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.





