
नेवासा तालुक्यातील सोनई येथील त्रिलिंगेश्वर महादेव मंदिर, स्थानिकांच्या भाषेत त्रिमुखी महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. नाथ संप्रदायाशी जोडलेल्या आख्यायिका आणि प्राचीन दगडी स्थापत्यामुळे हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र बनलं आहे.
मंदिरातील शिवपिंडी त्रिमुखी स्वरूपात असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराची रचना यादवकालीन किंवा हेमाडपंथी स्थापत्यशैलीशी संबंधित असल्याचे मानले जाते.
सोनई नावामागेही एक रंजक आख्यायिका आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या परिसरातून जात असताना, गोरक्षनाथांनी सोन्याची वीट येथे टाकून दिल्याची कथा सांगितली जाते. याच सोन्याच्या विटेवरून गावाला सोनई हे नाव मिळाल्याची लोकमान्यता आहे.
महायोगी गोरक्षनाथांनी मंदिर परिसरातील गुहेत तपश्चर्या केल्याचीही श्रद्धा आहे. श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र या प्राचीन वारशाचे ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय दृष्टीने संवर्धन होणे गरजेचे आहे.





