
अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ सप्टेंबर रोजी एका ४१ वर्षीय शेतकऱ्याने १४ हजार रुपयांना गाय आणि कालवड खरेदी केली.
ही जनावरे पिकअपमधून घेऊन घरी जात असताना टाकळी लोणार-पिसोरे खांड रस्त्यावर दोन दुचाकींवर आलेल्या काही जणांनी त्यांचा पिकअप अडवला.
काही वेळातच आणखी लोक तेथे जमा झाले. टोळक्याने शेतकरी आणि पिकअप चालकाला लाकडी काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली आणि खिशातील २१ हजार रुपये हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. यानंतर दोघांना विवस्त्र करून बाटलीतून जबरदस्तीने मूत्र पाजल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
या घटनेचे मोबाइलवर चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी प्रतीक पाचपुते याच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.





