नगर जिल्ह्यात सगळ्यात महत्त्वाची निवडणूक कोणती? तर जिल्हा बँकेची… कारण या निवडणुकीत काय होईल आणि काय केलं जाईल, याचा अंदाज भल्याभल्यांना नसतो. जिल्हा बँकेच्या ६७ वर्षांच्या राजकारणात या निवडणुकीनं अनेकांना धक्का दिलाय, तर अनेकांचं राजकारण सेटही केलंय. बँकेच्या इतिहासात १९५८ साली झालेल्या मोतीलालजी फिरोदीया यांच्या पहिल्या अध्यक्षपदापासून ते आत्ताच्या चंद्रशेखर घुलेंच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रत्येक निवडणुकीत रंगत आली. परंतु २०२३ साली झालेल्या निवडणुकीत, अवघ्या एका मताने झालेल्या घुलेंच्या पराभवाची चर्चा आजही होतेय. ही निवडणुकीत सगळ्यात जास्त धक्कादायक समजली गेली होती. स्वतः अजित पवारांनीही या पराभवाचा धसका घेतला होता. सोयऱ्याधायऱ्याच्या राजकारणाचा जिल्हा समजला जाणाऱ्या नगरमध्ये, काय होऊ शकतं, हे या निवडणुकीनं दाखवून दिलं होतं. विखे पिता-पुत्र काय करु शकतात, याची प्रतिची आली होती. .
२०२१ साली जिल्हा बँकेची निवडणूक झाली. त्यात अकोल्यातून सीताराम गायकर, संगमनेरमधून बाजीराव खेमनर, कोपरगावमधून विवेक कोल्हे, श्रीरामपूरमधून भानुदास मुरकुटे, राहात्यातून राधाकृष्ण विखे, पारनेरमधून उदय शेळके, नेवाशातून शंकरराव गडाख, शेवगावमधून चंद्रशेखर घुले, पाथर्डीतून मोनिका राजळे, श्रीगोंद्यातून राहुल जगताप, कर्जतमधून अंबादास पिसाळ, जामखेडमधून अमोल राळेभात आणि राहुरीतून शिवाजीराव कर्डिले हे संचालक झाले. याशिवाय राजेंद्र नागवडे, माधनवराव कानवडे, करण ससाणे, राघवेंद्र मुळाने, अमित डफाळ, अण्णासाहेब म्हस्के, अनुराधा नागवडे, जगन धोंडे हे वेगवेगळ्या प्रवर्गातून संचालक झाले. संचालकाच्या १७ जागा बिनविरोध झाल्या व चार जागेसाठी निवडणूक झाली. मविआची धुरा बाळासाहेब थोरातांनी सांभाळली तर महायुतीची धुरा राधाकृष्ण विखेंनी सांभाळली.
विखे व थोरात या दोघांनीही आपापल्या तालुक्यात वर्चस्व मिळवले. काही ठिकाणी तडजोडीही झाल्या परंतु आपापल्या समर्थकांना जिल्हा बँकेत आणण्यात हे दोन्ही नेते यशस्वी ठरले. महाविकास आघाडीने १३ जागा जिंकल्याचा दावा त्यावेळी केला गेला. महायुतीकडे फक्त सात संख्याबळ राहिलं. ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे बँकेचं अध्यक्षपद गेलं आणि काँग्रेसकडे उपाध्यक्षपद आलं. पवारांच्या सांगण्याप्रमाणे पारनेरचे उदय शेळके यांना अध्यक्षपदाचा तर काँग्रेसच्या माधवराव कानवडे यांच्याकडे उपाध्यक्षपदाचा मान गेला. परंतु अध्यक्षपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातच उदय शेळके यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर २०२३ ला पुन्हा अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या घडामोडी सुरु झाल्या. हीच निवडणूक ऐतिहासिक ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ९ संचालक होते. काँग्रेसकडे चार संचालक होते. त्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटांत असणारे नेवाशाचे शंकरराव गडाखही महाविकास आघाडीकडेच होते. म्हणजे, महाविकास आघाडीकडे तब्बल १४ चं संख्याबळ असल्याचं सांगितलं जात होतं. तर भाजपकडे फक्त सहा संचालक होते.
२०२३ साली अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी नगरमध्ये स्वतः अजित पवारांनी बैठक घेतली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात या बैठकीचे अध्यक्ष होते. या बैठकीत संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे ठरले. परंतु अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवताना मात्र माशी शिंकली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून चंद्रशेखर घुले यांच्या नावाला अजित पवारांनी हिरवा कंदील दाखवला. तेथेच मतभेद झाले. घुले यांच्यासह राष्ट्रवादीकडून इतर काही नेतेही इच्छुक होते, परंतु अजित पवारांनी घुलेंनाच बळ दिलं आणि अंतर्गत नाराजी वाढली. याच नाराजीचा फायदा तत्कालीन खा. सुजय विखे पाटील व दिवंगत आ. शिवाजीराव कर्डिले यांनी घेण्याचं नियोजन केलं. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी भाजपनं अचानक घुलेंच्या विरोधात स्वतः शिवाजीराव कर्डिलेंना उमेदवारी जाहीर केली. घुले विरुद्ध कर्डिले अशी सरळ लढत झाली.
बँकेच्या २१ संचालकांपैकी २० संचालकांनी मतदान केलं. दिवंगत उदय शेळके यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे एक मत कमी झालं. या २० संचालकातूनही एका संचालकाचं मत बाद झालं. म्हणजे फक्त १९ मतं वैध ठरली. मतमोजनीनंतर सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली. कर्डिले यांना १० तर, घुले यांना ९ मते मिळाली होती. फक्त सहा संचालक असलेल्या भाजपला, तब्बल १० मतं मिळाली होती. म्हणजेच सरळसरळ चार मतं फुटली होती व एक मत बाद झालं होतं. म्हणजेच महाविकास आघाडीला पाच संचालकांनी दगा दिला होता. हे मतदान गुप्त पद्धतीने झाल्यामुळे अधिकृतरीत्या कोणत्या संचालकाने क्रॉस व्होटिंग केले, याची कोणतीही लेखी यादी समोर आली नाही. परंतु, जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये काही विशिष्ट संचालकांच्या नावांची आणि गटांची जोरदार चर्चा झाली. भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांनी महाविकास आघाडीच्या गोटातून मते खेचून आणली होती. ज्या संचालकांचे कौटुंबिक किंवा व्यावसायिक संबंध तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा शिवाजीराव कर्डिले यांच्याशी सलोख्याचे होते, त्यांनी पक्षादेश डावलून भाजपला मतदान केल्याची चर्चा रंगली. पराभूत झालेले उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील हे अजित पवार यांचे निकटवर्तीय होते. परंतु, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका अंतर्गत गटाची घुलेंच्या उमेदवारीला छुपी नाराजी होती. या नाराज गटातील २ ते ३ संचालकांनी कर्डिले यांच्या बाजूने मतदान केल्याचे बोलले गेले. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील बड्या नेत्यांची मते सुरक्षित राहिली असली, तरी महिला, ओबीसी, अनुसूचित जाती तसेच बिगर-शेती संस्था मतदारसंघातील संचालकांवर दबाव किंवा तडजोड करून मते वळवण्यात आली, अशी उघड चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. दक्षिण विरुद्ध उत्तर अशा अंतर्गत प्रादेशिक वादामुळेही महाविकास आघाडीची १ ते २ मते कर्डिले यांच्या पारड्यात पडल्याची शक्यता वर्तवली गेली.
आता या निवडणुकीत नेमके कोणते पाच संचालक फुटले, याची कुजबूज अजूनही होते, परंतु खरंच कोण फुटले हे छातीठोकपणे अजूनही गुपीतच राहिलेय. फक्त एका मताने घुलेंचा पराभव झाला होता. अर्थात पुढे शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यानंतर, विखेंनी पुन्हा घुलेंनाच अध्यक्षपदाची संधी दिली. परंतु पहिल्या निवडणुकीत घुलेंच्या पराभवही विखेंनीच केला होता. या एक मताच्या पराभवाची दखल जिल्हा बँकेच्या इतिहासात मात्र घेतली गेली. सोयऱ्याधायऱ्याच्या राजकारणातही विखेंनी बाजी मारली होती. फुटलेले पाच अदृष्य हात कोणते, हे शेवटपर्यंत कळालंच नाही…





