Explained

Explained : काय सांगता… अडीच कोटींच्या ठेवी असणारी ‘ही’ ग्रामपंचायत तुम्हाला माहित आहे का?

लोणी-प्रवरा म्हटलं की, आठवतो आशिया खंडातील पहिला साखर कारखाना. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेलं हे गावं. हेच गाव दिवाळी पाडव्याला पुन्हा एकदा चर्चेत आलं. निमित्त होतं, पाडव्याची ग्रामसभा. गेल्या 108 वर्षांपासून पाडव्याला ग्रामसभा घेणारं महाराष्ट्रात एकमेव गाव म्हणून त्यावेळी लोणी चर्चा झाली. काहीतरी वेगळं व समाजाभिमूख करणारं हे गाव म्हणून विखे पाटलांनी लोणीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोणी ग्रामपंचायतीकडे थोड्या थिडक्या नाही तर, तब्बल अडीच कोटींच्या ठेवी आहेत, हेही अनेकांना सांगून खरं वाटत नाही. एकतर ग्रामपंचायत म्हटली तर, कर्मचाऱ्यांचे पगार करण्याएवढाही पैसा ग्रामपंचयातीकडे नसतो, मात्र लोणीची ग्रामपंचायत करोडपती आहे हे सांगितल्यावर आपल्याला नगर जिल्ह्याचा अभिमान वाटतो. नेमकं काय आहे लोणीची खासियत, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

गेल्या बुधवारी, पाडव्याच्या निमित्ताने लोणीची ग्रामसभा झाली. विखे कुटुंबातील सर्वच सदस्य या ग्रामसभेला उपस्थित होते. या ग्रामसभेत विखेंनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं. ते म्हणाले, “ग्रामस्थ आणि नागरिक यांच्या सहकार्याशिवाय ग्रामपंचायत लोकाभिमुख काम करू शकत नाही. गावातील सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांच्यासाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाले. काळानुरूप विकासाचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. व्यावसायिकांनी गाळा भाडे, नागरिकांनी पाणी व घरपट्टी भरून पंचायतीला सहकार्य केले पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा निधी आपण मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नशील आहोत. लोणी हे गाव शैक्षणिक केंद्र असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना अडचण येणार नाही. यासाठी ग्रामस्थांनी जागरूक राहिले पाहिजे. जलसंपदा विभागाच्या वतीने अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ओढे, नाले यातून पाणी निघून जाण्यात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यात येणार आहेत. त्यावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

गावाच्या एकोप्यामुळे या ग्रामपंचायतीकडे सध्या तब्बल अडीच कोटींच्या ठेवी जमा असल्याचा उल्लेखही विखेंनी आवर्जून केला. नगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या ठेवी जमा असणारी ही कदाचित एकमेव ग्रामपंचायत असेल. लोणीचा विकास हा केवळ विखेंच्या दुरदृष्टीमुळेच होऊ शकला, असे भाषणात अनेकांनी सांगितले. विखे कुटुंबातील सदस्य मंत्रीमंडळात असल्याने ग्रामपंचायतीला निधी मिळण्यात अडचणी येत नाहीत व त्यामुळेच ग्रामपंचायत विकासाभिमुख कारभार करु शकते, असेही अनेकांनी आपल्या मनाोगतात सांगितले. शिक्षणाच्या सुविधा, वाढलेली बाजारपेठ, शिक्षणामुळे आलेल्या सोयी-सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या योजना आदींमुळे लोणीचा विकास दिवसेंदिवस वाढत आहे.

विकासाबरोबर गावातील सुरक्षेबाबतही विखे कुटुंब तेवढेच जागरुक असल्याचे यावेळी दिसले. या ग्रामसभेत माजी खा. डाँ. सुजय विखेंचे भाषणही गाजले. सुजय विखे म्हणाले की, गावांतील भाडेकरुंची माहिती घरमालकाने ग्रामपंचायतीकडे देणे आवश्यक आहे. भाडेकरुंची आता पोलिस पडताळणी होणार आहे. गावात गुन्हेगारी येऊ नये व इथल्या महिला-मुलींची सुरक्षितता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील ज्या कुटुंबात आजपर्यंत व्यापारी संकुलात एकही गाळा मिळालेला नाही, त्यांना प्राधान्याने नूतन संकुलात गाळा देण्यात येणार आहे. लोणी गावात गुन्हेगारी शिरणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.

विखे कुटुंबाने करुन लोणी गावाचा विकास करुन दाखवत, एका आदर्श ग्रामपंचायतीचे उदाहरण राज्याला दाखवले आहे. एकीकडे तोट्यात चालणारा ग्रामपंचायतीचा कारभार थेट कोटींच्या ठेवींपर्यंत कसा चालतो, हे विखेंनी दाखवून दिले. नगर जिल्ह्यातील या आदर्श ग्रामपंचायतीचा नगरकर म्हणून आपल्या सर्वांना अभिमान वाटेल, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button