
खासदार झालेले निलेश लंके निवडणुकीनंतर हवेत होते. शरद पवार गटाच्या नगरमधील अधिवेशनात लंके वेगळ्याच हवेत दिसले. नगर जिल्ह्यात येत्या विधानसभा निवडणुकीत 12-0 करुन दाखवतो, असं ते स्टेजवर बोलून गेले. लंकेंचा काँन्फीडन्स पाहता, शरद पवारांनीही नगर जिल्हाच काय पण राज्यातील राष्ट्रवादीचे स्टेजही लंकेंच्या हातात दिले. परंतु लंकेंची ही हवा जास्त काळ टिकली नाही. गेल्या विधानसभेला नगरमध्ये 12-0 तर सोडाच, पण राष्ट्रवादीचा केवळ एकच आमदार काठावर निवडून आला. लंकेंना स्वतःची पत्नीही आमदार करता आली नाही. याच लंकेंची खरी ताकद किती आहे, हे आता हळूहळू दिसू लागले आहे. राष्ट्रवादीचे एक-एक करुन अनेक मोहरे पक्षाला टाटा-बाय-बाय… करताना दिसत आहेत. कधीकाळी, आम्ही बाप बदलत नाही… म्हणणारे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरेही शरद पवारांना सोडून चालल्याचे बोलले जात आहे. अगोदर राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष व आता राष्ट्रवादीचा युवक जिल्हाध्यक्ष शरद पवारांना सोडून जात असल्याने काँलर उडविणाऱ्या लंकेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नेमकं काय चाललंय राष्ट्रवादीचं? अमित भांगरेंच्या मनात नेमकं काय? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
नगर जिल्ह्याच्या राजकारणात, गेल्या बुधवारी एक खळबळजनक बातमी समोर आली. शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी येथे भेट घेतली. नुसती भेट घेतली नाही, तर त्यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. त्यांच्या आई माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे व भाजपचे अकोल्याचे माजी आ. वैभव पिचड हेही या भेटीचे साक्षीदार होते. या भेटीने राजकीय वातावरण पुन्हा तापले. कारण गेल्या आठ दिवसांत भांगरेंनी विखेंची भेट घेण्याची ही दुसरी वेळ होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील राजकीय संदर्भ बदलत चालल्याचे हे द्योतक होते. भांगरे-विखे भेटीच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे गुरुवारी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेल्या राजेंद्र फाळके यांच्या घरी, सभापती राम शिंदे यांनी भेट दिली.
या दोन्ही भेटी, नगरच्या बदलत्या राजकारणाच्या द्योतक ठरल्या. सध्या खा. निलेश लंके व आ. रोहित पवार हे शरद पवार गटाचे राज्याचे नेते आहेत. अर्थात, शरद पवारांनीच त्यांना राज्यपातळीवर प्रमोट केलेय. पण याच दोघांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पार रसातळाला गेलीय, हे या निमित्ताने पुढे आले. जिल्हाध्यक्षांचा राजीनामा व त्यापाठोपाठ युवक जिल्हाध्यक्षांची पक्ष सोडण्याची तयारी, या दोन्ही घटना पवार-लंकेंना धक्का देणाऱ्या ठरणार आहेत. या दोन्ही घटनांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बुद्धीचातुर्य मात्र ठळक दिसले. कधीकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जाणारा नगर जिल्हा आता हळूहळू भाजपच्या हातात चाललाय, हे या निमित्ताने अधोरेखित होऊ लागलेय.
येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. जिल्हाध्यक्षदासाठी सुनीता भांगरे यांच्या नावाची चर्चा होती. अहिल्यानगर लाईव्ह 24 ने सुनीता भांगरे यांना झेडपीच्या अध्यक्षपदाची संधी असून, कदाचित त्या भाजपमध्ये येतील, अशी शक्यता सर्वात अगोदर वर्तवली होती. आता आमचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत सुनीता भांगरे व त्यांचा मुलगा अमित भांगरे यांनी दोनदा विखेंची भेट घेतलीय. या भेटीमुळे भांगरे शरद पवारांची साथ सोडतील, अशा शक्यता वाढल्या आहेत. गेल्यावेळी अमित भांगरे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. अनेक सभांतून त्यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली होती. आम्ही बाप बदलत नाही, माझा राजकीय बाप शरद पवारच आहे… हे त्यांनी अनेकदा स्टेजवरुन सांगितले होते. पण आता त्यांची भूमिका बदलली. कदाचित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा शब्द घेऊन, भांगरे आई-मुलगा भाजपमध्ये येतील, असे संदर्भ जोडले जात आहे.
आगामी जिल्हा परिषदेच्या पाश्वभूमीवर राजेंद्र फाळके व भांगरे कुटुंब भाजपमध्ये दाखल होतील, असे सांगितले जात आहे. या दोन्ही पक्षप्रवेशानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ताकद मात्र वाढणार आहे. राष्ट्रवादीत असलेल्या पाथर्डीच्या प्रताप ढाकणे, राहुरीच्या प्राजक्त तनपुरे या नेत्यांच्याही पक्षबदलाच्या चर्चा अधूनमधून होताना दिसतात. शरद पवारांचा पक्ष नगर जिल्ह्यातून हळूहळू नामशेष होतोय, हे या सर्व चर्चातून दिसत आहे. फाळके व भांगरे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लागेल तेव्हा लागेल, मात्र या भेटीनंतर विखे काय चिज आहे, हे मात्र राज्याला दिसल्याचे बोलले जात आहे.





