Explained

Explained : Rahata Nagar Parishad | विखे ‘प्युअर ओबीसी’ नगराध्यक्ष करणार? राहात्यात रंगत वाढली

राहाता नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे व सदस्यपदांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. राहात्याच्या नगराध्यक्षपदासाठी यावेळी ओबीसी उमेदवाराला संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखेनी आपल्या मतदारसंघात प्युअर ओबीसीला संधी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे राहात्याचा नगराध्यक्ष हा प्युअर ओबीसीच होईल, असे आता बोलले जात आहे. दुसरीकडे नव्याने एक प्रभाग व तीन नगरसेवक वाढल्याने यंदा 10 प्रभागांसाठी 20 नगरसेवक निवडून येणार आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या भेटीगाठी सध्या सुरु झाल्या असून, काहीही झाले तरी विखे पाटील सांगतील तसेच या नगरपरिषदेत होणार आहे. नेमके कोण आहेत इच्छुक चेहरे, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

पालकमंत्री विखेंचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या राहता नगरपरिषदेची निवडणूक काही दिवसांत होणार आहे. राहाता व शिर्डी या दोन्ही पालिका विखेंच्या अधिपत्याखाली लढल्या जाणार आहेत. यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याने, या निवडणुकीत रंगत आली आहे. राहाता नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण निघाले. गेल्या चार वर्षांपासून पालिकेवर प्रशासक राज असल्याने यावेळी अनेकांना पालिकेत जाण्याचे डोहाळे लागले आहेत. राहाता पालिकेवर विखेंचाच झेंडा फडकणार असल्याचे सध्याच्या राजकीय अंदाजातून स्पष्ट होत असले तरी थोरात गट, पिपाडा गट, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भुमिकाही महत्त्वाच्या राहणार आहेत. गेल्यावेळी भाजपच्याच डाँ. राजेंद्र पिपाडा यांनी विखेंविरोधात अपक्ष उमेदवारी केली. त्यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुनही पिपाडांनी त्यांचे ऐकले नव्हते. परंतु आता स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेल्या फडणवीसांसोबत राजेंद्र पिपाडा पुन्हा दिसले. त्यामुळे आता पालिका निवडणुकीत ते विखे गटासोबत पंगा घेणार नाही, असे बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत, पिपाडांना सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे यावेळी ते विखेंशी जुळवून घेतील का, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. दुसरीकडे थोरातांची संगमनेरमध्येच कोंडी करण्यात विखे गेल्या काही दिवसांपासून यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत थोरात राहत्यात लक्ष घातली, असे यावेळी तरी दिसत नाही.

काही दिवसांपूर्वी विखेंनी राहत्यात प्युअर ओबीसी उमेदवाराला नगराध्यक्षपद देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे अनेकांना नगराध्यक्ष होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. माजी नगराध्यक्ष साहेबराव निघाने, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर, डाँ. स्वाधीन गाडेकर, मिलिंद बनकर, सचिन गाडेकर, नाभिक समाजाचे नेते दशरथ तुपे, स्वप्निल गाडेकर, भगनाव टिळेकर, प्रवीण सदाफळ, राजेंद्र पठारे आदींच्या नावाची चर्चा नगराध्यक्षपदासाठी सध्या सुरु झाली आहे. त्यात यापूर्वी ज्यांना संधी दिली त्यांच्याऐवजी नव्या नावांना पसंती दिली जाईल, असेही सांगितले जात आहे. त्यामुळेच सामाजिक कार्यकर्ते व अजातशत्रू राजकारणी दशरथ तुपे यांचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे.

राहात्यात विखे पाटील हेच सबकुछ असल्याने ते सांगतील तेच उमेदवार निवडून येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. साहेबांचा आदेश आल्यानंतर धावपळ नको म्हणून अनेकांनी आपली कागदपत्रेही तयार ठेवली आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी सोशल मीडियाद्वारे प्रचार सुरुही केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button