
नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 14 पंचायत समितीत्यांच्या आरक्षणाचे चित्र आता स्पष्ट झले. गेल्या मंगळारी सभापतीपदाचे व गेल्या सोमवारी सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर कोणत्या गटांतून त्या-त्या पंचायत समितीचा सभापती होईल, हे जवळपास निश्चित झाले. या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांच्या स्वप्नांचे इमले कोसळले. तर काहींना अचानक लाँटरी लागली. अनेकांना आता आपण बाजूला राहून आपल्या घरातील महिलांना पुढे करावे लागणार आहे. नेमकं काय झालंय… याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने डेडलाईन दिल्यानंतर या निवडणुकांची तयारी युद्धपातळीवर सुरु झाली. गेल्या मंगळवारी नगर जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण काढण्यात आले. 1996 ते 2019 दरम्यानचे आरक्षण विचारात घेता चक्रानुक्रमे हे आरक्षण काढण्यात आले. सभापतीच्या आरक्षणानंतर नगर, कोपरगाव, राहाता, जामखेड, पारनेर आणि श्रीगोंदा येथे महिला सभापती होणार हे निश्चित झाले. अनुसूचित जमातीची संख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने अकोल्याचे सभापतीपद हे अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी राखीव राहिले. अकोले सुरुवातीलाच राखीव ठेवून उर्वरीत 13 सभापतीपदाचे उरत्या क्रमाने व लोकसंख्येच्या चक्रीय पद्धतीने हे आरक्षण काढण्यात आले.
सभापतीपदाचे आरक्षण कसे राहिले ते आपण पाहू…
अकोल्यात अनुसूचित जमाती
संगमनेरमध्ये अनुसूचित जाती
कोपरगावमध्ये अनुसूचित जमाती महिला
कर्जतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महला
श्रीरामपूर सर्वसाधारण
नेवासा नागरिकांचा मागास प्रवर्ग
शेवगावमध्ये सर्वसाधारण
पाथर्डीमध्ये अनुसूचित जाती महिला
राहुरीत सर्वसाधारण
अहिल्यानगरमध्ये सर्वसाधारण महिला
जामखेडमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
श्रीगोंद्यात सर्वसाधारण महिला
तर
पारनेरमध्ये सर्वसाधारण महिला
असे 14 पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण राहिले. आता सोमवारी पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण जाहिर झाले. म्हणजेच कोणत्या गणांतून त्या-त्या पंचायत समितीचा सभापती होईल, हे चित्र स्पष्ट झाले. आता त्यात काय-काय गंमत झाली ते आपण पाहू…
श्रीरामपूरचे सभापतीपद हे सर्वसाधारणसाठी खुले राहिले. गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर तेथे निमगावखैरी, निपाणी, बेलापूर या गणांतूनच सभापती ठरणार हे निश्चित झाले. टाकळीभान गट-गणात आता महिलाराज येणार आहे. बेलापुरात खुल्या प्रवर्गातील महिलांमध्ये लढत रंगणार आहे. तर दुसरीकडे आरक्षणामुळे उंदिरगाव, पढेगावातील अनेकांचे स्वप्न भंगले आहे. दत्तनगर गट व गण आरक्षित झाल्याने अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे.
राहुरीचे सभापतीपदही सर्वसाधारणसाठी खुले राहिले आहे. गणांची सोडत झाल्यानंतर वांबोरी, उंबरे व मानोरीतून राहुरीचा नवा सभापती होईल हे स्पष्ट झाले. या तिन्ही गणांत चांगलीच रस्सीखेंच रंगणार आहे.
नेवाशाचे सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित आहे. परंतु गणांच्या आरक्षण सोडतीत खुल्या प्रवर्गाचा बोलबाला राहिला. तब्बल 8 ठिकाणी सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. कुकाणा, सलाबतपूर, देडगाव या गणांतून नेवाशाचा नवा सभापती ठरणा आहे. आ. विठ्ठल लंघे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याने त्यांची मुलगी डॉ. तेजश्री लंघे यांना यंदा सभापतीपदाची संधी असणार आहे.
संगमनेरचे सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहिले. गणांच्या सोडतीनंतर वडगावपान, घुलेवाडीतन संगमनेरचा सभापती होणार हे निश्चित झाले. त्यामुळे या दोन्ही गणांत चांगलीच लढत रंगणार आहे. दुसरीकडे आश्वी, जोर्वेत विखे-थोरात गटांत चांगलीच रस्सीखेंच आहे. हे दोन्ही गणांत महिलांमध्ये लढत रंगणार आहे. तळेगाव, राजापुरात खुल्या प्रवर्गात चुरस वाढली आहे.
कोपरगावचे सभापतीपद हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. या तालुक्यात परजणे विरुद्ध कोल्हे अशी लढत अनेक गटांत रंगणार आहे. त्यातल्या त्यात संवत्सर गटांत सर्वात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. पोहेगावातून नितीन औताडेंपुढे पेच निर्माण झाला आहे.
राहात्याचे सभापतीपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. येथे जुन्या आणि अनुभवी नेत्यांना आता कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवावे लागणार आहे. सावळीविहीर बु. (अनु.ज. महिला), साकुरी (अनु. जा. महिला), कोल्हार बु. (ना. मा.प्र. महिला) आणि पुणतांबा व दाढ बु. (सर्वसाधारण महिला) या पाच जागांमुळे विद्यमान पुरुष उमेदवारांची संधी हुकली आहे. साकुरीतील गट व गणांत महिलाराज येणार आहे.
श्रीगोंदा तालुक्यातही अनेक नेते असल्याने तेथेही चांगलीच चुरस राहणार आहे. श्रीगोंद्याचे सभापतीपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिले आहे. तेथे काष्टी, बेलवंडीत जोरदार लढत होणार आहे. पाचपुते, नागवडे, जगताप या नेत्यांमध्ये चांगलीच लढत रंगणार आहे.





