Explained

ADCC | जिल्हा बँकेच्या निवडणुकीची हवा का निघून गेली? जे मैदानात आहेत ते टिकाव घरतील का?

सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. निमित्त आहे – जिल्हा बँक म्हणजेच ‘एडीसीसी’ बँकेच्या सत्तेचं राजकारण! कधीकाळी मोजक्याच ज्येष्ठ नेत्यांभोवती फिरणारं नगरच्या सहकाराचं राजकारण आता थेट तरुण नेत्यांच्या हातात पोहोचल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत गेल्या २४ तासांत अशा काही घडामोडी घडल्या, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सभापती प्रा. राम शिंदे यांची अनपेक्षित माघार… आ. रोहित पवारांनी उपस्थित केलेला तिसऱ्या अपत्याचा वादग्रस्त मुद्दा… एकाकी पडलेले खा. निलेश लंके… हे सगळंच मागच्या काही तासांत घडलं. आजच्या व्हिडीओत आपण जिल्हा बँकेच्या याच निवडणुकीतील पडद्यापुढची आणि पडद्या मागची काही गुपितं उघडण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक सुरु झाली आणि जिल्ह्याचं राजकारण पेटलं. कधीकाळी बँकेच्या अहवालात फोटो छापला नाही म्हणून स्वाभिमान दुखावलेल्या सभापती प्रा. राम शिंदेंनी जिल्हाभर दौरे सुरु केले. नेवाशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, राहुरीचे तनपुरे, श्रीरामपूरचे मा. आ. भानुदार मुरकुटे यांच्या भेटी घेत त्यांनी जिल्हा बँकेचं वातावरण तापवलं. सुरुवातीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे अगदी शांत दिसले. परंतु या शांततेत एक युवा नेता मात्र पडद्यामागून बरंच काही करत होता. त्या नेत्याचं नाव होतं, डाँ. सुजय विखे पाटील. माजी खा. सुजय विखे पाटील हे जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रीय आहेत, हे अनेकदा दिसलं. परंतु आक्रमक स्वभाव असलेल्या सुजय विखेंनी आपल्या वक्तव्यावर कंट्रोल करत, लिमीटेट स्पीचवर भर देत, वातावरण जुळवून आणलं.

जिल्हा बँकेच्या राजकारणात जसे विखे-थोरात हे महत्त्वाचे होते. तसेच गडाख, काळे, कोल्हे, तनपुरे, राजळे यांच्याशिवायही ते अपूर्ण होतं. दुष्काळात बँक बिनविरोध करायची असेल आणि सहकाराची कामधेनु असलेली जिल्हा बँक टिकवायची असेल, तर सगळ्यात आधी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना बरोबर घेणं महत्त्वाचं होतं. थोरातांना सोबत घेतल्याशिवाय जिल्हा बँक बिनविरोध होऊच शकत नव्हती. विखेंनी तेच केलं. थोरातांना योग्य मानसन्मान देऊन, त्यांना समन्वयक करण्यात आलं. त्यांच्याच अध्यक्षतेखाली संगमनेरमध्ये बैठक घेण्यात आली. विखेंसह, गडाख, काळे, कोल्हे, तांबे, ओगले, जगताप, पाचपुते, घुले, नागवडे, राजळे असे सगळेच नेते एकत्र आले. त्यानंतर पुन्हा शनिवारी गडाखांच्या सोनईत शेवटची बैठक झाली. कितीही वाद असले तरी, सहकारातील नेते शेतकऱ्यांसाठी मतभेद सोडून देतात, हे जिल्ह्याला दाखविण्यात आलं.

या बैठकांनंतर जेव्हा अर्ज भरण्याची वेळ आली तेव्हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला, तो म्हणजे प्रा. राम शिंदे यांची माघार! राम शिंदे हे जिल्हा बँकेच्या राजकारणात आघाडीवर होते. पण अचानक त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. पण या माघारीमागचं खरं कारण काय?
पडद्यामागील पहिली चर्चा अशी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या तिसऱ्या अपत्याचा मुद्दा जाहीरपणे उपस्थित केला होता. कायदेशीर अडचणी येऊ नयेत, यासाठी शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याचं खाजगीत बोललं गेलं. परंतु, राम शिंदे यांनी जाहीरपणे काय भूमिका घेतली? त्यांनी सांगितलं की, “मी माझ्या अंतरात्माचा आवाज ऐकला आणि माघार घेण्याचा निर्णय घेतला.” राजकारणात ‘अंतरात्माचा आवाज’ हा शब्दप्रयोग खूप मोठा असतो. शिंदेंनी अतिशय समजूतदारपणा दाखवत, पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी आणि सहकाराची परंपरा जपण्यासाठी ही माघार घेतल्याचं दाखविण्यात आलं. त्यांच्या या निर्णयामुळे एका मोठ्या कायदेशीर आणि राजकीय वादावर पडदा पडला, हे मात्र नक्की.

आता वळूयात या संपूर्ण निवडणुकीचे खरे ‘सॉलिड परफॉर्मर’ ठरलेल्या नेत्याकडे…
ते म्हणजे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील!
मित्रांनो, सुजय विखे पाटील हे सहसा त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक भाषणांसाठी ओळखले जातात. पण या जिल्हा बँक निवडणुकीत त्यांनी एक वेगळाच अवतार धारण केला होता. त्यांनी अत्यंत ‘लिमिटेड स्पिच’ म्हणजेच मोजकेच आणि मोजून-मापून बोलण्याची रणनीती ठेवली. कोणताही आरडाओरडा नाही, कोणतीही जाहीर चिखलफेक नाही. विखे पाटील कुटुंबाचा सहकारात दबदबा गेल्या अनेक दशकांपासून आहे. पण सुजय विखे यांनी स्वतःला सिद्ध करत पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या या मोठ्या राजकारणात आपली चमक दाखवली आहे. सुजय विखेंनी अत्यंत शांतपणे, पडद्यामागून सूत्रं हलवत सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. बँकेची आर्थिक घडी मजबूत राहण्यासाठी आणि सहकार क्षेत्र वादात अडकू नये यासाठी त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. त्यांच्या या मॅच्युरिटीमुळे विरोधी गटातील नेत्यांनाही त्यांच्यासोबत चर्चा करणे सोपे झाले. सुजय विखेंनी विरोधकांना संपवण्याचं राजकारण न करता, सर्वांना सोबत घेऊन बँक कशी चालवता येईल, यावर भर दिला. त्यांची ही ‘सायलेंट’ पण ‘थेट अचूक’ खेळी विखे पाटलांच्या सहकारातील नव्या नेतृत्वाची नांदी मानली जात आहे.

एकीकडे सुजय विखे पाटील यांचा आलेख उंचावत असताना, दुसरीकडे विखे गटाच्या विरोधात मोठी आघाडी उभी करू पाहणारे खासदार निलेश लंके मात्र या निवडणुकीत एकाकी पडल्याचे चित्र आहे. निलेश लंके यांनी जिल्हा बँकेत विखे यांच्या पॅनेलला तगडं आव्हान देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. प्रा. राम शिंदे यांच्याशी त्यांचे सूत जुळत चालले होते आणि राम शिंदेंच्या बळावर लंके विरोधकांची एक मोठी ‘मोट’ बांधणार होते. विखे विरोधकांना एकत्र करून जिल्हा बँकेवर सत्ता मिळवण्याचा लंकेंचा प्लॅन होता. पण राम शिंदेंनी माघार घेतली आणि निलेश लंकेंचा हा संपूर्ण प्लॅन पत्त्याच्या बंगल्यासारखा कोलमडला! शिंदे बाजूला झाल्यामुळे लंकेंकडे विखेंच्या रणनीतीला उत्तर देणारा तितकाच वजनदार आणि कायदेशीर ताकद असलेला चेहरा उरला नाही. परिणामी, जी विरोधकांची मोट बांधली जात होती, ती आता पूर्णपणे विखुरली गेली आहे. लंके या निवडणुकीच्या रणांगणात आता राजकीयदृष्ट्या एकाकी पडले असून, विखेंच्या चक्रव्यूहात ते अडकल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या सगळ्या धामधुमीत जिल्हा बँकेला आता काही नवे आणि तरुण चेहरे मिळणार आहेत. सहकाराच्या या सर्वोच्च सभागृहात पहिल्यांदाच दोन मोठ्या राजकीय घराण्यांमधील तरुण नेते संचालक होण्याच्या मार्गावर आहेत.

पहिले नाव आहे – रणजितसिंग देशमुख. हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई आहेत. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंग यांनी सहकारात पाऊल टाकले असून, त्यांच्या एन्ट्रीमुळे थोरात गटाला बँकेत एक तरुण आणि अभ्यासू चेहरा मिळाला आहे.
दुसरे नाव आहे – सचिन जगताप. हे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू आणि ज्येष्ठ नेते अरुणकाका जगताप यांचे सुपुत्र आहेत. नगर शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात जगताप कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे. आता सचिन जगताप यांच्या माध्यमातून हे कुटुंब बँकेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या दोन्ही तरुण संचालकांच्या येण्याने जिल्हा बँकेत अनुभवी नेत्यांच्या सोबतीला आधुनिक विचारांचे तरुण रक्त पाहायला मिळणार आहे. त्यांच्याशिवाय अक्षय कर्डिले, विवेक कोल्हे, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे हे तरुण आमदार आणि नगराध्यक्ष करण ससाणे, प्रतापसिंह पाचपुते यांच्यासारखे तरुण नेतेही संचालक असतील, हे जवळपास फिक्स झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button