Explained

Chandrashekhar Kadam Vs Ramdas Dhumal | मतमोजणीत लाईट गेली आणि आमदार बदलला…

नगर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील सगळ्या हाय-होल्टेज निवडणूक कोणती? तर राहुरीची… होय, राहुरीत १९९८ साली झालेल्या पोटनिवडणुकीसारखी जबराट निवडणूक, नगर जिल्ह्यात यापूर्वी कधी झालीच नव्हती. आता या निवडणुकीत असं काय होतं..? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण, या निवडणुकीत असं काही घडलं होतं, जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. अहो, चार मतांनी पराभूत झालेल्या उमेदवार, चक्क २३ मतांनी विजयी झाला होता. बरं, एकदा नाही तर दोनदा फेरमतमोजणीही झाली होती. आणखी एक गंम्मत म्हणजे, फेरमतमोजणी सुरु असतानाच मतमोजणी केंद्राची लाईट गेली. सगळीकडे लख्ख अंधार, अवघ्या काही सेकंदात लाईट आली, पण तेवढ्याच वेळात ‘गेम’ झाल्याच्या चर्चा झाल्या. कुणी म्हणालं मतपत्रिका पळवल्या, कुणी म्हणालं अधिकाऱ्यांनीच मतपत्रीका खाल्ल्या, कुणी म्हणालं, कार्यकर्त्यांनी मतपत्रिका गायब केल्या… मतमोजणी केंद्रावरच नाही, तर संपूर्ण राहुरी तालुक्यात चर्चा, गोंधळ आणि दहशत पसरली. विजयी झालेल्या उमेदवाराला काही मिनिटांपूर्वी अंगावर घेतलेला विजयाचा गुलाल अक्षरशः झटकावा लागला… होय, आज याच हाय होल्टेज निवडणुकीचा किस्सा आज आपण पाहणार आहोत…

साल होतं १९९८ चं. केंद्रात अस्थिरता होती. खरंतर, १९९६ ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. पण पुढं दोन वर्षांत देशाला तीन पंतप्रधान मिळाले. सगळा गडबड-गोंधळ सुरु होता. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं सरकार स्थापन केलं आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झालं. पण त्यांचं सरकार अवघ्या १३ दिवसांत कोसळलं. त्यानंतर केंद्रात विविध प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन ‘युनायटेड फ्रंट’चं सरकार स्थापन केलं. या आघाडीला काँग्रेसनंही बाहेरून पाठिंबा दिला. या काळात आधी एच. डी. देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल हे देशाचे पंतप्रधान झाले. हे सरकार स्थिरस्थावर होत असतानाच, नोव्हेंबर १९९७ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ‘जैन कमिशन’चा अहवाल आला. या अहवालात, संयुक्त आघाडी सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम, म्हणजेच डीएमके पक्षावर राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना पाठिंबा दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेसने पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्याकडे द्रमुकच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची मागणी केली. मात्र, गुजराल यांनी ती फेटाळल्यामुळं काँग्रेसनं २८ नोव्हेंबर १९९७ रोजी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी, गुजराल सरकार कोसळलं. तेव्हा राष्ट्रपती होते के. आर. नारायणन. राष्ट्रपतींनी कुणीच सत्ता स्थापनेला पुढं येत नसल्याचं पाहून, अखेर ४ डिसेंबर १९९७ ला लोकसभा बरखास्त केली. आणि दोन वर्षात म्हणजे १९९८ ला पुन्हा सार्वत्रिक निवडणुका लागल्या.

आता काँग्रेसला परत सत्तेवर बसायचं होतं. त्यामुळे शरद पवारांकडे काँग्रेसने महाराष्ट्राची जबाबदारी दिली. कोपरगाव मतदारसंघ हा त्यावेळी भाजपकडं होतं. भाजपचे भीमराव बडधे खासदार होते. त्यांनी १९९६ च्या निवडणुकीत शंकरराव काळेंचा पराभव करुन, लोकसभा गाठली होती. आता हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडं आणण्यासाठी, शरद पवारांनी येथून राहुरीचे विद्यमान आमदार प्रसाद तनपुरेंना तिकीट दिलं. तनपुरेंनी भीमराव बडधेंना जोरदार फाईट दिली आणि खासदारकी मिळवली. तनुपरे खासदार झाल्यामुळं, त्यांना राहुरीच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. आणि १९९८ ला राहुरीची पोटनिवडणूक लागली. हीच निवडणूक, न भूतो न भविष्यती झाली….

त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, कोपरगावचे सूर्यभान वहाडणे. वहाडणे हे आरएसएसचे निष्ठावान कार्यकर्ते. कोपरगाव लोकसभा मतदारसंघातही त्यांनी यापूर्वी भीमराव बडधेंना निवडून आणून दाखवलं होतं. त्यामुळे आता राहुरीच्या पोटनिवडणुकीत त्यांनी संघाच्या मुशीतला कट्टर कार्यकर्ताच उभा केला.. नाव होतं चंद्रशेखर कदम. कदम कुटुंब हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवराचं. संपूर्ण कदम कुटुंब, कट्टर हिंदूत्ववादी. संघाच्या मुशीतलं. अगदी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्यापासून ते थेट गोपीनाथ मुंडेपर्यंत कदम कुटुंबाचे संबंध होते. वहाडणे यांनी आग्रह केल्यामुळे कदमांनी, भाजपकडून पोटनिवडणुकीत फार्म भरला. इकडं, प्रसाद तनपुरेंनी ही जागा काँग्रेसकडेच रहावी, म्हणून त्यांच्या विरोधात तीनदा लढलेल्या रामदार पाटील धुमाळांना उमेदवारी देण्याचा आग्रह केला. काँग्रेसनंही धुमाळांनाच उमेदवारी दिली. कदम आणि धुमाळांसह जनता दलाचे लक्ष्मण धायगुडे, अपक्ष पंढरीनाथ पवार हे तगडे उमेदवारही निवडणुकीत उभे होते. या सगळ्यांनी जोरदार प्रचार केला. पण पोटनिवडणूक असल्यानं मतदान कमी झालं. फक्त ५४ टक्के मतदानावर राहुरीचा आमदार ठरणार होता. मतदान कमी झाल्यानं सगळ्यांनाच धाकधूक होती. धुमाळांसाठी पवारांसह काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी सभा घेतल्या होत्या. तर कदमांसाठीही थेट गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींनी राहुरीचं मैदान गाजवलं होतं. आता मतमोजणीचा दिवस आला आणि सातही उमेदवारांचं, फुल्ल टेन्शन वाढलं.

तारीख होती, ५ जून १९९८. वार होता शुक्रवार. सकाळी मतमोजणी सुरु झाली. त्यावेळी आत्ताच्या सारखं ईव्हीएम नव्हतं. हाताने एकेक करुन मतपत्रिका मोजाव्या लागायच्या. त्यामुळे मतमोजणीला वेळ लागला. अखेर, सायंकाळी उशीरा मतमोजणी अधिकाऱ्यांनी निकाल घोषित केला. काँग्रेसच्या रामदास धुमाळांनी अवघ्या चार मतांनी विजय मिळवला होता. भाजपचे चंद्रशेखर कदम हरले होते. धुमाळ समर्थकांनी जल्लोष सुरु केला. मात्र तब्बल चार हजारांच्या आसपास मतपत्रिका बाद झाल्याने कदम समर्थकांनी फेरमतमोजणीचा अर्ज दिला. निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा मतपत्रिका तपासण्यास सुरुवात केली. नजरचुकीने बाद ठरवल्या गेलेल्या मतपत्रिकांमध्ये भाजपची काही वैध मते आढळली. यामुळे गणिते बदलली. फेरमतमोजणीत चंद्रशेखर कदम यांची वीस मते वाढली. म्हणजेच, चंद्रशेखर कदम आता १६ मतांनी पुढं गेले. आता काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरलं. पुन्हा गोंधळ वाढला. बाद झालेल्या मतपत्रिका पुन्हा काऊंट कशा केल्या, असा सवाल करण्यात आला. काँग्रेसनं पुन्हा मतमोजणीची मागणी केली. नियमानुसार दुसऱ्यांदा फेरमतमोजणी झाली.

हीच दुसरी रिकाऊंटींग, बीपी वाढवणारी ठरली. दुसऱ्यांदा फेरमतमोजणी सुरू असतानाच, मतमोजणी केंद्रावरील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. केंद्रात काही मिनिटांसाठी पूर्ण अंधार पसरला. गडबड गोंधळ वाढला पण लगेच काही मिनिटांत लाईट आली. त्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरु झाली. संपूर्ण पोलीस बंदोबस्तात हे सगळं सुरु होतं. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, चंद्रशेखर कदम यांना पुन्हा सात मतं जास्त मिळाले. पहिले १६ आणि नंतरचे सात, अशा सगळ्या मतांची बेरीज करुन सुरुवातीच्या चार मतांचा फरक पाहता कदम यांना २३ मतांनी विजयी घोषित करण्यात आलं.

या निकालानंतर राहुरी शहरात नाही, तर तालुक्यात गोंधळ झाला. मतमोजणी सुरु असताना लाईट गेली आणि अंधाराचा गैरफायदा घेऊन काही मतपत्रिका गायब केल्याच्या चर्चा सुरु झाल्या. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तर मतमोजणी अधिकाऱ्यांनीच काही मतपत्रिका गिळून घेतल्याचा आरोपही केला. मोठा गदारोळ उडाला. पण अखेर दुसऱ्या मतमोजणीनंतर चंद्रशेखर कदम आमदार म्हणून विजयी घोषित करण्यात आले. साऊथच्या थरारक चित्रपटात, जसे काही मिनिटांत सीन बदलतात, तसे सीन राहुरीच्या पोटनिवडणुकीत २८ वर्षांपूर्वी बदलले होते. राहुरीच्या राजकीय इतिहासात, कदमांनी पहिल्यांदा कमळ फुलवलं होतं. कदम आमदार झाले पण केंद्रातील व राज्यातील स्थिती पुन्हा बदलली. १९९९ मध्ये पुन्हा मुदतपूर्ण निवडणुका घेण्यात आल्या. तनपुरेंची खासदारकी गेली. त्यांनी पुन्हा राहुरी विधानसभा लढवली. १६ महिन्यांपूर्वी आमदार झालेल्या चंद्रशेखर कदमांचा त्यांनी पुढे ८३८ मतांनी पराभव केला. राहुरीत पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. परंतु कदमांनी जनसंपर्क कायम ठेवला. पुढे २००४ च्या निवडणुकीत त्यांनी जोरदार पुनरागमन करत, प्रसाद तनपुरे यांचा १० हजार मतांनी पराभव केला. कदम हे संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांनी वयाच्या ६० वर्षानंतर पुन्हा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राहुरीच्या राजकारणाची सूत्रे खऱ्या अर्थानं बदलली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button