
ज्या सोयाबीनला काही महिन्यांपूर्वी ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत होता, त्याच सोयाबीनचा दर आता सुमारे ५ हजार ७०० रुपयांवर आला आहे. म्हणजेच क्विंटलमागे तब्बल १ हजार ८०० रुपयांची घट झाली आहे.
विशेष म्हणजे, नवीन सोयाबीन हंगाम महिनाअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यंदा सोयाबीनची पेरणी साधारण महिनाभर उशिराने झाली. पेरणीनंतरही पावसाने मोठा खंड घेतला. बहर आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या काळात पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांत पिकाला फटका बसला. काही ठिकाणी सोयाबीन करपल्याने उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
एका बाजूला उत्पादनाची चिंता, तर दुसऱ्या बाजूला घसरलेले बाजारभाव… अशा दुहेरी संकटात सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडला आहे. नवीन हंगामात सोयाबीनला किती भाव मिळतो, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





