
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रविवारी झालेल्या लिलावात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून, कांद्याला कमाल ५५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला.
बाजार समितीत तब्बल ३३१३ कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये नंबर एक कांद्याला ४ हजार ते ५५०० रुपये, नंबर दोन कांद्याला २५०० ते ३९५० रुपये, तर नंबर तीन कांद्याला १२०० ते २४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. याशिवाय गोल्टी कांद्याला १५०० ते ३८०० रुपये, तर जोड कांद्याला ७०० ते १८०० रुपये भाव मिळाला.
दरम्यान, राहाता बाजार समितीत डाळिंबाचीही मोठी आवक झाली. तब्बल ७३०५ क्रेट डाळिंब बाजारात दाखल झाले. नंबर एक डाळिंबाला १६१ ते ३०० रुपये, नंबर दोनला १०१ ते १६० रुपये, नंबर तीनला ५१ ते १०० रुपये, तर नंबर चारला १० ते ५० रुपये भाव मिळाला. बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी ही माहिती दिली.





