
निमगावजाळी शिवारात तामखडा डोंगराच्या पायथ्याशी एका अनोळखी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रविवारी सकाळी सुमारास वनरक्षक बाळू डेंगळे यांच्या निदर्शनास झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने पोलीस पाटील दिलीप डेंगळे यांना माहिती दिली. त्यानंतर आश्वी पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला आणि पंचनामा केला. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याने ही घटना सुमारे ५ ते ६ दिवसांपूर्वी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून केस मानेपर्यंत वाढलेले आहेत. अंगात आकाशी टी-शर्ट आणि निळी पँट होती. घटनास्थळी चपला सापडल्या; मात्र ओळख पटवणारे कोणतेही कागदपत्र मिळाले नाही. या व्यक्तीबाबत माहिती असल्यास किंवा अशी व्यक्ती बेपत्ता असल्यास आश्वी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





