
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर ते शिर्डी विमानतळ या सुमारे ८५ किलोमीटरच्या महत्त्वाच्या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमदार माणिकराव कोकाटे आणि दिलीप बनकर यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कुंभमेळा प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
ओझर, खेरवाडी, चांदोरी, सायखेडा, भेंडाळी, हिवरगाव, वडांगळी, पंचाळे, वावी, सायाळे, जवळके डोहाळे मार्गे शिर्डी विमानतळ असा हा रस्ता अनेक गावं, शेती क्षेत्र, औद्योगिक भाग आणि धार्मिक स्थळांना जोडतो.
मात्र अनेक ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने दुचाकी, चारचाकी, एसटी आणि मालवाहतूक वाहनांची मोठी गर्दी होते. कुंभमेळ्यात हा मार्ग पर्यायी वाहतूक मार्ग ठरू शकतो.
चांदोरीजवळ छत्रपती संभाजीनगर मार्गाला जोडल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि शिर्डीकडून येणाऱ्या भाविकांना नाशिक शहरातील गर्दी टाळता येण्याची शक्यता आहे. आता या रुंदीकरणाला मंजुरी आणि निधी कधी मिळतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





