
राज्यात अनेक भागांत पावसाने मोठा खंड घेतल्याने पिके संकटात आली आहेत. त्यामुळे परतीच्या मान्सूनकडून शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.
निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, पुढील आठवड्यात राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे; मात्र सर्वदूर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाही.
२२ ते २४ सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून, मराठवाड्यात मात्र पाऊस तुलनेने कमी राहू शकतो.
२५ सप्टेंबरनंतर बंगालच्या उपसागरात तयार होणारी कमी दाबाची प्रणाली महाराष्ट्राकडे सरकल्यास २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात.
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र पावसाचा अचूक अंदाज वातावरणातील पुढील बदलांवर अवलंबून असेल. महत्त्वाचं म्हणजे केवळ हवामान मॉडेल पाहून शेतीचे नियोजन करू नका, असा सल्लाही खुळे यांनी दिला आहे.





