Explained

300 वर्षानंतरही ‘अमर’ राहिलेल्या अहिल्यादेवी नेमक्या होत्या कोण? त्यांचं कार्य काय होतं?

राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे 15 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा- 2026 साजरा होतोय. सिंचन व बिगरसिंचनाची कामे वेळेत पूर्ण करणे, विभागाच्या कामाचा आढावा घेणे, चांगलं काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, असं सगळं या पंधरवाड्यात सुरु आहे. याशिवाय कालवा स्वच्छता मोहिम, चर योजना, बंदिस्त नलिका, शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी बिलांच्या तक्रारींचे निरसन असं सगळंही या पंधरवाड्यात सुरु आहे.

महायुती सरकारनं हे सगळं सुरु केलंय, ते फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त… कारण गेल्यावर्षी म्हणजेच, 31 मे 2025 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 300 वी जयंती साजरी करण्यात आली. हे वर्षे त्यांच्या 301 व्या जयंतीनमित्त विशेष आहे. याच जयंती उत्सवानिमित्त पुर्ण वर्षभर महायुती सरकारने त्यांच्या चौडी या जन्मगावापासून विविध उपक्रम सुरु केले आहेत. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य समजून घ्यायचं, म्हटल्यावर त्यांचे चरित्र समजून घेणं महत्त्वाचं आहे, चला तर आज आपण याच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरीत्राचा संक्षिप्त आढावा घेऊयात…

 

नगर जिल्ह्याला आता अहिल्यानगर हे नाव देण्यात आलंय. खरं तर, अहिल्याबाई या फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशभराचा आदर्श ठरलेल्या राज्यकर्त्या आहेत. जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात 31 मे 1725 मध्ये अहिल्याबाईंचा जन्म झाला. धनगर कुटुंबातील माणकोजी व सुशीला शिंदे हे त्यांच्या आई वडिलांचं नाव. लहानपणापासून चुणचुणीत असलेल्या अहिल्याबाईंवर मल्हारराव होळकरांची नजर गेली. मल्हारराव होळकरांनी नऊ वर्षांच्या अहिल्याबाईचा विवाह, 1733 मध्ये आपला मुलगा खंडेराव यांच्याशी लावून दिला. मल्हारराव होळकर यांनी 1734 मध्ये इंदोर येथे होळकर साम्राज्याची रितसर स्थापन केली होती.

वंशपरंपरेत चालणारी वतने, परगणे, इनाम मिळालेल्या राज्यांचा कारभार हे सगळं आता अहिल्याबाई पाहू लागल्या. पुढे त्यांना मालेराव व मुक्ता ही दोन मुले झाली. 1754 मध्ये राज्यस्थानातील कुंभेरी येथील लढाईत खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला. त्यावेळी मल्हाररावांनी सूनबाई असलेल्या अहिल्याबाईला सती जाण्यापासून रोखलं. त्यावेळी अहिल्यादेवी या फक्त 28 वर्षांच्या होत्या. होळकरांच्या वंशावळीत मल्हारराव होळकरांनंतर वारसा म्हणून अहिल्याबाईंचं नाव नोंदवलं गेलं.

खरंतर त्यावेळी वंशावळीत फक्त पुरुषांची नावे असत. परंतु होळकर साम्राज्याने पहिल्यांदा महिलेला वंशावळीत स्थान दिलं. त्यानंतर मावळ प्रांताचा कारभार अहिल्यादेवीच पाहू लागल्या. पानिपतच्या लढाईत पाणी न मिळाल्याने सैन्याचा पराभव झाला, असं बोललं गेलं. त्यानंतर अहिल्याबाईंनी ठिकठिकाणी विहीरी खणून पाण्याच्या स्त्रोतांचं खऱ्या अर्थानं संवर्धन सुरु केलं.

पुढे अहिल्याबाईंनी इंदौरमधून आपल्या सत्तेचं केंद्र हलवत नर्मदेकाठी महेश्वर इथे आपली राजधानी हलवली. इंदौरचं सेनापतीपद दत्तकपुत्र तुकोजी होळकर यांच्याकडे दिलं. नर्मदा नदीच्या किनारी महेश्वर राजधानी झाल्यानंतर 1767 ते 1795 या काळात अहिल्याबाईंनी उत्तम प्रशासनाचे दाखले देत आदर्श कारभार सुरु ठेवला. या काळात त्यांनी उत्तरेतील राज्यांमध्येच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये लोकपयोगी आणि धार्मिक वास्तूही बांधल्या. मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासोबतच अन्नछत्र, धर्मशाळा, विहिरी तयार केल्या. नंदूरबारमध्ये त्यांनी विहिर खोदून घेतली. तिला आजही अहिल्याबाई विहिर म्हणून ओळखली जाते.

आपल्या खासगी तिजोरीतून त्यांनी नर्मदा व गंगा नद्यांच्या किनारी घाट बांधले. महेश्वरला सोनार व विणकरांना बोलावून महेश्वरी साडीला राजाश्रय दिला. शिवाय खेड्यापर्यंत न्यायनिवाडा करणारी यंत्रणा उभारली. मुलींना शस्त्रशिक्षणही दिलं. बंधारे, तळे बांधून त्यांनी बागायती क्षेत्र वाढवलं. जलसंवर्धनासोबत अहिल्याबाईंनी इतर अनेक आघाड्यांवर सामाजिक काम केलं, जे आजही आदर्श मानलं जातं. याच अहिल्याबाईंचं वयाच्या सत्तराव्या वर्षी 13 ऑगस्ट 1795 साली निधन झालं.

अहिल्यादेवींनी राज्याच्या सीमा सोडून देशाच्या पातळीवर काम केलं. अनेक ठिकाणी त्यांनी केलेली कामे आपल्याला पाहायला मिळतात. काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बाजूला जो घाट बांधण्यात आला, तो अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलाय. उज्जैनमधील शिप्रा घाटही अहिल्याबाईंनीच बांधला. देशातील प्रत्येक महत्त्वाच्या तिर्थक्षेत्राजवळ असलेलं पाण्याचं कुंडही अहिल्याबाईंनीच तयार केलं. कोलकत्ता ते इंदोर हा राष्ट्रीय महामार्ग अहिल्यादेवी होळकरांच्या काळात झाला. दिल्लीची संसदेची जागा देखील अहिल्यादेवी होळकरांच्या मालकीची होती. पंढरपूर येथील होळकरांचा वाडा आजही त्यांच्या कामाची साक्ष देतोय.

पुणे- मुंबई महामार्गावर देखील एक मोठी बारव त्यांनी बांधलीय. त्यानंतर श्रीगोंदा येथे बारवही त्यांनीच खोदलेली आहे. देशभरातली शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. एवढंच नाही, तर ज्या ठिकाणी त्यांनी मंदीरे बांधली तेथेच मंदिराच्या समोर बारवही निर्माण केली. त्या बारव आजही त्या ठिकाणच्या नागरिकांना जिवंत पाणी देत आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड येथील मत्स्योदरी देवी यांच्या समोर असलेली बारव, बीडच्या खंडेश्वरी देवीसमोर असलेली बारव, वैद्यनाथ मंदिरासमोरील बारव, जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या बाजूला असलेला दगडी तलाव आजही अहिल्यादेवींनी केलेल्या कामाची साक्ष देतोय.

अहिल्याबाई यांचे पर्यावरणीय योगदानही त्यांच्या दूरदृष्टी आणि शाश्वत विचारांचे प्रतीक आहे. त्यांनी जलव्यवस्थापन, वनसंवर्धन, शाश्वत शेती आणि निसर्गपूरक स्थापत्यशास्त्राद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यातून आधुनिक काळातील पर्यावरण संरक्षण आणि टिकाऊ विकास यांसाठी प्रेरणा मिळते. त्यांच्या योगदानामुळे त्या केवळ समाजसुधारक किंवा शासक नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाच्या अद्वितीय विचारांनी प्रेरित नेत्याही होत्या. त्यांचे कार्य आजही आपल्याला निसर्ग व पर्यावरणासोबत सुसंवाद साधण्याचा संदेश देते. त्यांच्या काळातील धोरणांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर, नद्यांचे संरक्षण, वृक्षारोपण, जलस्रोत व्यवस्थापन, आणि निसर्गपूरक साधनांचा समतोल दिसून येतो.

घाट आणि बारव बांधणीमुळे केवळ धार्मिक व सामाजिक सुविधा नाही तर जलसंधारण, पर्यावरण रक्षण आणि निसर्गाच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन मिळाले. त्यांनी बांधलेले व आजही उत्तम स्थितीत असलेले अनेक घाट, बारव, कुंड हे त्यांच्या कार्याचे स्मरण करून देतात. त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहेत. त्यांच्या या योगदानामुळे त्या निसर्गाप्रति संवेदनशील नेत्या होत्या, हे स्पष्ट होते.

याच अहिल्याबाईंच्या कार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने सध्याच्या पंधरवाड्यात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button