नगर जिल्ह्यात सिस्पे आणि इनफिनाईटसारख्या कंपन्यांनी गेली काही महिने चांगलाच धुमाकूळ घातला. पोटाला चिमटा घेऊन कमविलेला पैसा क्षणार्धात लुबाडण्यात आला. सामान्यांसह अगदी शिक्षितांचीही स्मार्ट फसवणूक करण्यात आली. अर्थात काहींच्या राजाश्रयाने हे शक्य झाल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु काहीही असले तरी, लुटला गेलेला पैसा परत मिळणार कधी? हा प्रश्न होताच. सुरुवातीला फक्त पारनेर, श्रीगोंदा तालुक्यात ही फसवणूक झाल्याचे बोलले गेले. परंतु जसजशा चर्चा वाढल्या, तक्रारी वाढल्या तसतशा या प्रकऱणाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत आपले हातपाय पससले असल्याचे दिसून आले. पण थांबा… भगवान के घर, देर है अंधेर नही…असं म्हणतात. अगदी तसंच होतंय. तब्बल पावणे तीनशे कोटी रुपये आता यात लुबाडले गेलेल्यांना परत मिळणार आहेत.
जादा परताव्याचे म्हणजेच तब्बल 15 ते 20 टक्क्यांचे आमिष दाखवले तर, कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. अहोरात्र कष्ट करुन पोटाला चिमटा घेऊन जगणारेही भरपूर आहेत. त्यांना श्रीमंत होण्याची इच्छा असतेच. अगदी तसेच, कमी कालावधीत गडगंड होण्याची स्वप्ने पाहणारेही कमी नाहीत. या सगळ्यांना फसवायचं म्हटलं, तर काहीतरी लालूच दाखवणं आवश्यक असतं. हेच लालूच सिस्पे, इनफिनाईट बिटकाँईन सारख्या कंपन्यांनी दाखवलं. श्रीगोंदा, पारनेर, नगर आणि पुणे जिल्ह्यात ही कंपनी सुरु झाली.
कालांतराने तिचा विस्तार झाला. काही स्थानिक पुढाऱ्यांनी, चर्चेतील माणसांनी आणि मोठ्या लोकांनी, या कंपन्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावली अन् या कंपन्यांची चर्चा वाढली. साखळी पद्धतीने सुरुवातीला भरघोस आमिषे दाखवून ही लुटमारीची साखळी अगदी घरोघर पोहोचली. पण ही फसवणूक जास्त दिवस टिकली नाही. आपण फसवले जातोय, हे हळूहळू गुंतवणुकदारांच्या लक्षात आले.
सिस्पे कंपनीने आपली आर्थिक फसवणूक केल्याचे श्रीगोंदा, सुपा व तोफखाना पोलिसांत चार गुन्हे दाखल झाले. त्यावेळी साधारणः 20 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले. हे चारही गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर तपासात काही शंकास्पद बाबी आढळल्यानंतर पोलिसांनी चार संचालक व आठ एजंटांना अटक केली. या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी परदेशात पळून गेले. त्यांचा अजूनही तपास सुरु आहे. हा तपास जसजसा पुढे सरकू लागला. त्यानंतर या गुन्ह्याची व्याप्तीही वाढली.
पहिल्या टप्प्यात पोलिसांनी 115 कोटींची मालमत्ता निष्पण्ण केली. दोन हजार बँक खाती गोठविण्यात आली. या दोन हजार बँक खात्यात तब्बल 113 कोटींची रोकड होती. रोखीचे 113 कोटी आणि सुमारे दीड कोटींची स्थावर मालमत्ता अशा 115 कोटींचा एमपीआयडीचा प्रस्तावर पोलिसानी शासनाकडे पाठवला. त्या प्रस्तावावर अजून विचार सुरु आहे. परंतु हा प्रस्ताव येत्या काही दिवसांत येईल, असेही सांगितले जात आहे. प्रस्ताव मंजूर झाला आणि प्रापर्टीचा लिलाव झाला की हेच 115 कोटी फसवणूक झालेल्यांना परत मिळतील.
आता याच तपासात अजूनही बरंच घबाड पोलिसांच्या हाताला लागलं. तपास जसजसा पुढे गेला तसतशे आणखी 155 कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. त्याचाही प्रस्ताव एमपीआयडी कायद्यानुसार तयार केला जात आहे. शासनाने हे दोन्ही प्रस्ताव मंजूर केले तर तब्बल 278 कोटी रुपये परत मिळणार आहेत. पोलिसांनी नव्याने केलेल्या तपासात सिस्पे संचालक, एजंट व त्यांच्याशी संबंधीत काही लोकांची चौकशी केली. त्यांनीही या पैशाचा लाभ घेतल्याचे समोर आले.
सिस्पेत लुबाडलेल्या पैशातून काहींनी जमिनी, प्लाँट, गाळे घेतल्याचे उघड झाले. नव्याने तपास केलेल्यांच्या बँक खात्यातही आठ कोटीं रुपये सापडले. त्यानंतर पहिल्या व आत्ताच्या लुटारुंची तब्बल 163 कोटींची मालमत्ता एमपीआयडी कायद्याच्या पुरवणी यादीत टाकण्यात आली. त्याचा तपास आता एलसीबीकडून सुरु आहे. आता पोलिसांचा तपास व सरकारची मंजूरी या सगळ्यानंतर गुंतवणूकदारांच्या अपेक्षा प्रफुल्लीत झाल्या आहेत. तब्बल पावणे तीनशे कोटींची रिकव्हरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





