
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे ४० वर्षीय सचिव मनीष अण्णासाहेब घाडगे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांनी स्वतःला पेटवून घेतले, ज्यामध्ये गंभीर भाजल्याने १ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासूनच मनीष घाडगे यांनी आत्महत्या का केली ? हा प्रश्न चर्चेत होता. पण आता मनीष यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलंय.
त्यांनी संस्थेतील अंतर्गत वादातून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीष गेल्या १५-२० वर्षांपासून संस्थेचे कामकाज पाहत होते; मात्र संस्थापक साहेबराव घाडगे यांच्या निधनानंतर संस्थेच्या वर्चस्वावरून वाद सुरू झाला. संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी आणि मनीष यांना सचिवपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता.
२६ एप्रिल रोजी त्यांच्यावर खोटे आरोप करून बदनामीची धमकी देण्यात आली, ज्यामुळे ते तीव्र तणावाखाली होते. याच जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाईड नोट मधून स्पष्ट झाले आहे.
आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चिठ्ठी लिहून त्रासाला जबाबदार असणाऱ्यांची नावे नमूद केली होती. या प्रकरणी मनीष यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांनी सुमती घाडगे, स्नेहल घाडगे, श्रुती घाडगे यांच्यासह सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे गुन्हा दाखल केलाय.





