
अहिल्यानगर जिल्हा बँकेत मोठ्या घडामोडी घडल्यात. बँकेवर तातडीने प्रशासक नियुक्त करण्यात आला असून, विद्यमान चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. मंडळी, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी 2026 मध्येच संपली होती. मात्र त्यानंतरही चेअरमन म्हणून घुले पाटील बँकेचा कारभार पाहत होते.
दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने जिल्ह्यातील निवडणुका 31 मेपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूकही लांबली होती. यामुळे अशी चर्चा होती की, घुले पाटील हेच प्रशासक म्हणून पुढेही काम पाहतील. पण अचानक मंगळवारी सायंकाळी सहकार विभागाने मोठा निर्णय घेतला आणि बँकेवर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले.
या ठिकाणी विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या कायद्याचा फटका. एप्रिल महिन्यात सहकार कायद्यात बदल करण्यात आले आणि त्यानुसार ज्या सहकारी संस्थांची मुदत संपली आहे, त्यावर तातडीने प्रशासक नेमणे बंधनकारक करण्यात आले. याच नव्या नियमामुळे घुले पाटील यांना पदावर कायम राहता आले नाही आणि थेट प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे आणि पुढील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





