आकर्षक पॅकिंग, वेगवेगळ्या फ्लेवर्सची उपलब्धता, नशेचा बाजार आणि ऐय्याशी करण्याची सणक, यामुळे सध्या महाराष्ट्रभर फुलचंद पानाची क्रेझ वाढलीय. अनेक पान टपरीचालक तर थेट सोशल मीडियावर आपल्या पानांची जाहीरात करत असल्याने या फुलचंदने भाव खाल्लाय. फुलचंद पानात जे घटक टाकले जातात, ते तांबाखूमुक्त असल्याचा दावाही काही करतात. परंतु तसं नाहीए. हे पान सुरक्षित नाहीए. अर्थात, याबाबत अन्न व औषध प्रशासनाने काही अधिकृत माहिती जाहीर केली नसली, तरी हे पान आरोग्याला घातकच असल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. या बातमीने महाराष्ट्राची झोप उडावलीय. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील 5 तरुणांना याच फुलचंद पानामुळे कॅन्सर झालाय. अजून धक्कादायक म्हणजे, एका तरुणाचा याच कॅन्सरने मृत्यू झालाय. हे सगळं जेवढं धक्कादायक आहे, तेवढंच गंभीरही आहे.
पंचरत्न, नवरत्न, 120-300, बनारस, कलकत्ता, मसाला… अशी पानांची विविध नावं तुम्ही ऐकली असतील. असंच एक सर्वात लोकप्रिय पान आहे, फुलचंद… नावाप्रमाणेच हे पान जरा फुललेलं असतं. वेगळी चव आणि आकर्षक पॅकिंगमुळे फुलचंद पान अल्पावधीत लोकप्रिय झालं. या पानानं गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच भाव खाल्लाय. जो फुलचंद खातोय, तो प्रतिष्ठीत समजला जातोय. सोप्पा भाषेत सांगायचं म्हटलं तर, फुलचंद हे रिच स्टेटस समजलं जातंय.
फुलचंद पान हे अलिशान समारंभ व अनेक मोठ्या समारंभातही विशेष आकर्षण म्हणून ठेवले जाते. फुलचंद पान हे उच्च दर्जाचे व चवीने गोड असणारे पान आहे. त्यात उच्च दर्जाचे घटक असल्याचं मार्केटींग केलं जातं. गुलकंद, सुकामेवा, नाजूक चांदीचा वर्ख, कात, चुना आणि बरंच काही यात टाकलं जातं. या पानाने थोडीशी नशा येते, त्यामुळे यात नशेसाठीही काही-बाही टाकलं जातं. त्यात रासायनिक पदार्थही टाकले जातात, ज्यामुळे या पानाला जरा वेगळा कडकपणा येतो. सुरुवातीला काही विशिष्ट टपऱ्यांमध्ये विक्री होणारं हे पान आता अगदी चौकाचौकातील टपऱ्यांवरही विकलं जातंय. पण थांबा… हेच पान सध्या स्लो पाँयझन ठरतंय.
मध्यंतरी पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी याच पानांतून ड्रग्ज विक्री होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. हे पान शरीसासाठी अत्यंत गंभीर असल्याचा इशाराही वैद्यकीय विभागाने दिला होता. या पानामुळे अनेक प्रकारचे गंभीर आरोग्य परिणाम समोर आले होते. या पानातील काही रासायनिक घटकांमुळे हृदयविकाराचा धोका, मानसिक अस्वस्थता, रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचे प्रकार, समोर आले होते. हे पान अगदी 30 रुपयांपासून 50.100 रुपयांपर्यंत विकलं जातंय.
या एका पानात दारुच्या एका बाटलीची नशा येत असल्याचंही खाणारे सांगतात. हे एक प्रिमिअम दर्जाचे पान असले तरी, त्यात अनेक रासायनिक पदार्थ वापरले जात असल्याने ते शरिरासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. सर्वात मोठी चिंताजनक बाब म्हणजे या पानांमध्ये गांजासारखा अंमली पदार्थ किंवा नशा आणणारी पांढरी पावडर मिसळली जात असल्याचाही संशय आहे.
याच फुलचंद पानाचा एक नवा कहर, सध्या महाराष्ट्रभर गाजतोय. फुलचंद पानामुळे पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरातील पाच तरुणांना कॅन्सर झाल्याची चर्चा आहे. या बातमीने सध्या पाथर्डी तालुक्याची झोप उडवलीय. विशेष म्हणजे, याच पानाचं व्यसन करणाऱ्या एका तरुणाचा तोंडाच्या कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाल्याच्याही चर्चा आहेत. आता फुलचंद पानामुळे खरंच कॅन्सर होतो का? हा प्रश्न आहे. तर काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार फुलचंद पानामुळे कॅन्सर होतो, हे शंभर टक्के खरं आहे.
फुलचंद पानामध्ये मुख्य घटक हा सुपारी असतो. काही संशोधनानुसार सुपारीला काही रासायनीक पदार्थ व नशेच्या पदार्थांसोबत टाकले तर ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणजेच ओएसएमएफ सारखे आजार होते. ज्यामुळे तोंड उघडण्यास त्रास होतो व त्यानंतर तोंडाचा कॅन्सर होतो. या पानात विविध फ्लेवर व कृत्रिम सुगंधी द्रव्ये वापरली जातात. त्यात काही रासायनिक नशा आणणारे विषारी घटकही असतात. ज्यामुळे शरीरातील पेशींचं नुकसान होतं, आणि कॅन्सर होतो. अनेकदा या पानांमध्ये किमाम किंवा छुपे तंबाखूचे अंश असतात जे तोंडाच्या व घशाच्या कर्करोगाला निमंत्रण देतात.
हे पान खाल्लानं चक्कर येते, सुस्ती येते किंवा थेट धुंदी चढते. ही धुंदीच काही घातक रासायनिक पदार्थांमुळे येते, असं सांगितलं जातं. सतत फुलचंद पान खाणाऱ्यांना शंभर टक्के कॅन्सर होतो, असही काहींचं म्हणणं आहे. हिरड्यांना सुज येणे, दात खराब होणे, तोंडाला जखमा होणे, रक्तप्रवाह असंतुलीत होणे, मेंदूवरचा ताबा सुटणे, डोळे जड पडणे हे प्रकार फुलचंद खाल्लानंतर होतात.
हे सगळं अति गंभीर असल्याचं काही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाथर्डी तालुक्यात पाच तरुणांना झालेला कॅन्सर, हा याच फुलचंदचा प्राथमिक धोका आहे, असंही आता बोललं जातंय. आरोग्य विभागाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन या पनावर बंदी आणावी, अशी मागणी आता होत आहे. पाथर्डीच्या पाच तरुणांच्या केसेस या फक्त सुरुवात आहे, फुलचंदने संपूर्ण महाराष्ट्रात उडवलेली दाणादान लवकरात लवकर बंद करावी, असं आता बोललं जातंय.





