Explained

Sujay Vikhe Patil | एक पराभव आणि सलग चार विजय… राजकारण कोणत्या दिशेला चाललंय?

जे होतं, ते चांगल्यासाठीच होतं… अशी मराठीत एक म्हण आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत डाँ. सुजय विखे पाटलांचा पराभव झाला, अन् पुढच्या दोन वर्षांत नगर जिल्ह्याचं राजकारणचं 360 अंशात बदललं. या पराभवापूर्वी जिल्ह्यात विखे-पवार आणि विखे-थोरात हा टोकाचा संघर्ष असायचा. प्रत्येक निवडणूक याच दोन्ही घटकांमुळे अगदी घासून व्हायची. पवार-थोरात हे दोन्ही नेते विखेंसोबत अगदी त्वेषानं लढायचे. परंतु पराभवानंतर विखेंनी आपली स्टॅटर्जी बदलली, अन् साम-दाम-दंड भेद यासोबतच अगदी ग्रास रुटपासून राजकारण सुरु झालं. गेल्या दोन वर्षांत नगर जिल्ह्यात जेवढ्या निवडणूका झाल्या त्या सगळ्या एकतर्फी प्रकारात गणल्या गेल्या. आत्याची राहुरी विधानसभेची पोटनिवडणूकही विखेंच्या रणनितीमुळे अगदीच एकतर्फी झाली. आपल्या पराभवानंतर अक्षय कर्डिलेंच्या रुपाने, सुजय विखेंनी स्वतःच्या हिमतीवर पाचवा आमदार निवडून आणला. शरद पवार गटाची जादू आता पूर्णतः संपते काय? हा प्रश्न यानिमित्ताने राजकीय विश्लेषकांना पडला. नेमकं काय झालं? राजकारण कसं व का बदललं? पुढं काय होईल?

2024 च्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डाँ. सुजय विखेंचा पराभव होईल, असं कुणालाच वाटत नव्हतं. परंतु काही नकारात्मक मुद्दे चर्चेत आले आणि विखेंचा पराभव झाला. त्यात फोन न उचलणे, कार्यकर्तांना न भेटणे, वेळ न देणे, असे अनेक मुद्दे विखेंच्या पराभवास कारणीभूत ठरले. नगर दक्षिणेत, महत्त्वाची असणारी साकळाई पाणी योजना पुर्णत्वास न जाणं, हेही या पराभवाचं आणखी एक कारण होतंय… आता या पराभवानंतर विखेंनी स्वतःला बदललंच, पण आपल्या यंत्रणेतही अमुलाग्र बदल केले. काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. स्वतः सगळ्या गोष्टीत लक्ष घालणं सुरु केलं. चहापेक्षा किटली गरम… असा जो काही प्रकार होता, तो थांबवला.

खासदार असताना विखेंची जेवढी चर्चा व्हायची, त्यापेक्षा जास्त चर्चा, पराभवानंतर सुरु झाली. त्यानंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणूक लागली. विखे शांत बसणारे नाहीत, हे राजकीय विश्लेषकांना माहित होतं. विखेंचा पराभव हा निष्क्रिय राजकारणी म्हणून नाही, तर फक्त अपप्रचारामुळे झालाय, हे प्रवरा यंत्रणेचं अॅनलिसीस होतं. त्यामुळे विखेंच्या पराभवाला जे कुणी कारणीभूत होते, त्यांच्यावर लक्ष्य केंद्रीत केलं गेलं. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय… अशी मराठीत एक म्हण आहे. अगदी त्याप्रमाणे, प्रवरा यंत्रणेनं जिल्ह्याचं राजकारण हाताळलं.

विधानसभा निवडणुकीत, याच प्रवरा यंत्रणेने काही धक्कादायक निकाल लावून दाखवले. लोकसभेला जसा विखेंचा पराभव होऊ शकतो, हे जिल्ह्यानं पाहिलं, अगदी तसंच विधानसभेलाही प्रवरा यंत्रणेनं काही दिग्गजांना पराभूत करुन दाखवलं. त्यात संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नेवाशात माजीमंत्री शंकरराव गडाख, राहुरीत माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, पारनेमध्ये खासदार पत्नी राणी लंके यांच्या पराभवाचा समावेश होता. संगमनेरमध्ये शिवसेनेचे अमोल खताळ, नेवाशात शिवसेनेचे विठ्ठल लंघे, पारनेरध्ये राष्ट्रवादीचे प्रा. काशिनाथ दाते यांचा विजय, हा नगरकरांसाठी सुखद धक्का होता. हे तिन्ही नेते पहिल्यांदाच आमदार झाले होते. शिवाय त्यांनी ज्या नेत्यांचा पराभव केला, ते सहकारातील व राजकारणातील दिग्गज समजले जात होते. परंतु हे घडलं ते डाँ. सुजय विखे पाटील व त्यांच्या प्रवरा यंत्रणेमुळे… खताळ, लंघे, दाते या नेत्यांनीही विजयानंतर, प्रवरा यंत्रणेचे तोंडभरून कौतूक केले.

‘टायगर अभी जिंदा है’ आणि ‘जो मला त्रास झाला तो मी व्याजासह परत करणार…’ अशी काही वाक्ये सुजय विखेंच्या तोंडून कायम उच्चारली गेली. प्रवरा यंत्रणेनेही ती सुपरहीट केली. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात 12 पैकी 10 आमदार हे महायुतीचे राहिले. कधीकाळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा, नगर जिल्हा भगव्या लाटेवर स्वार झाला. याचं संपूर्ण श्रेय, हे सुजय विखेंचंच राहीलं. बरं, ही जादू फक्त विधानसभेलाच दिसली का? तर नाही. त्यानंतर नगर जिल्ह्यातील नगरपालिका व अहिल्यानगरची महानगरपालिका निवडणुकीतही सुजय विखेंनी आपली जादू कायम ठेवली. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत ज्या निलेश लंके यांची चर्चा झाली, ती चर्चा पुढच्या काही महिन्यांतच पूर्णपणे ओसरली.

खासदार झाल्यानंतर काही महिन्यांत नगरला राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात खा. लंके यांनी, भर स्टेजवर शरद पवारांसमोर विधानसभेला 12-0 करुन दाखवतो, म्हणून दंड थोपाटले होते. परंतु तसं काहीच झालं नाही. राष्ट्रवादीला रोहित पवारांच्या रुपाने, एकमेव जागा जिंकता आली. बाकी संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा सुपडा साफ झाला. स्वतः खासदार निलेश लंके यांच्या पत्नीचाही पराभव झाला. नगरपालिका व महानगर पालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. खासदार निलेश लंके ना पारनेर तालुक्यात चर्चेत राहिले, ना नगर दक्षिणेत, ना नगर जिल्ह्यात…

सुजय विखेंनी लोकसभेत पराभव झाल्यानंतर सगग तीन सार्वत्रिक निवडणुकांत आपला जलवा कायम ठेवला. त्याचीच पावती म्हणून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत बढती दिली. त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यानंतर राहुरीच्या पोटनिवडणुकीतही सुजय विखेंच्या नियोजनाचीच चर्चा झाली. माजीमंत्री प्राजक्त तनपुरेंना यशस्वी माघार घ्यायला लावून, विखेंनी सुरुवातीलाच या निवडणुकीची रंगत काढून टाकली.

निकालानंतर, विखे-जगतापांचं परफेक्ट नियोजन पुन्हा एकदा अधोरेखित झालं. नगर जिल्ह्याचं राजकारण हे युवा नेत्यांच्या हातात चाललंय. 2024 ची निवडणूक, ही नगर जिल्ह्यातील युवा नेत्यांच्या उदयाची सुरुवात होती. आता 2029 च्या निवडणुकीतही बारापैकी किमान 11 आमदार हे अगदीच तरुण असतील, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button