Explained

Murder Case | मुलाकडून वृद्ध बापाचा निर्घून खून; महाराष्ट्र हादरवणारी घटना नेमकी कशी घडली?

जामखेड-कर्जत मतदारसंघ सध्या जरा जास्तच चर्चेत आहे. एकीकडे राजकीय कुरघोड्यांनी हा मतदारसंघ गाजत असताना काही धक्कादायक घटनांनीही मतदारसंघाची राज्यभर चर्चा सुरु आहे. आता याच जामखेड तालुक्यातून एक मन विचलीत करणारी घटना समोर आलीय. जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे पोटच्या पोरानेच बापाचा निर्घून खून करण्याचा प्रकार घडलाय. बाप-लेकातील किरकोळ कारणातून मुलाने बापावर थेट कोयता व काठीने सपासप वार करुन माणुसकीला काळिमा फासलाय. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करुन पोस्टमाँर्टम अहवाल आल्यानंतर मुलावर खूनाचा गुन्हा दाखल केलाय. संशयीत आरोपीला अटकही झालीय. किरकोळ कारणातून घडलेलं हे हत्याकांड सध्या राज्यभर गाजतंय. नेमकं काय झालं? आणि हे हत्याकांड का घडलं?

घटना आहे, 26 एप्रिल 2026 ची. जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे सोनवणे कुटुंब राहतं. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ऊन उतरल्यावर रावसाहेब विठ्ठल सोनवणे हे 68 वर्षांचे वृद्ध त्यांच्या लिंबाच्या बागेत गेले. तेथे ते लिंबू तोडत होते. त्याच सुमारास शेजाऱ्याशी काहीतरी बिनसल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांचा मुलगा अशोक रावसाहेब सोनवणे (वय 24) हाही त्यांच्यासोबत होता. शेजाऱ्यांना विनाकारण शिविगाळ का करता? असं अशोकनं वडिलांना विचारलं. तरीही रावसाहेब सोनवणे हे विनाकारण शिविगाळ करतच राहिले. आता या शिविगाळीचा त्रास त्याचा मुलगा अशोकसह इतरांनाही होऊ लागला. शेजाऱ्यांसोबत भांडणाला कारण होईल, म्हणून अशोकला ही शिविगाळ सहन झाली नाही. कारण नसताना वडिल शिविगाळ करत असल्यानं अशोकनं त्यांना पुन्हा समजावलं. परंतु आता दुसऱ्यांदा मुलाने टोकल्याने रावसाहेब यांचा पारा चढला. त्यांनी हातातील कोयत्याने अशोककडे धाव घेतली. अशोकने पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु राग अनावर झाल्याने रावसाहेब यांनी आपल्या मुलावरच कोयता उगारला.

बाप-लेकातील हे भांडण अतिविकोपाला गेलं. रावसाहेब यांनी रागाच्या भरात पुन्हा अशोकवर कोयता उगारला. आता अशोकचाही संयम सुटला. त्यानं बापाच्या हातातील कोयता वरच्या वर आडवून तो हिसकावून घेतला. तरीही वडिलांचा राग शांत होत नसल्याने त्याने तोच कोयता पुन्हा बापावर उगारला. वाद आता अगदीच विकोपाला गेला. त्यानंतर रागाच्या भरात अशोकने शेजारी पडलेली काठी उचलली. व त्याच काठीने व कोयत्याने बापावर सपासप वार केले. रावसाहेब हे वयोवृद्ध असल्याने, मुलाच्या ताकदीपुढे त्यांचे काहीच चालले नाही. अशोकने वडिलांच्या पोटावर, पाठीवर बेदम मारहाण केली. हीच मारहाण जिव्हारी लागल्याने रावसाहेब यांचा तोल गेला व ते जमिनीवर कोसळले. काही क्षणात ते बेशुद्ध झाले.

वडिल बेशुद्ध झाल्याने व काहीच हालचाल करत नसल्याने अशोकही राग शांत झाल्यावर घाबरला. त्यानंतर जखमी रावसाहेब यांना तातडीने अरणगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जामखेडला हलविण्याचा सल्ला डाँक्टरांनी दिला. त्यानंतर जखमी रावसाहेब यांना तातडीने जामखेड येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे डाँ. गिरी यांनी रावसाहेब यांची तपासणी केली असता रावसाहेब यांचा मृत्यू दाखल करण्यापूर्वीच झाल्याचं निदान त्यांनी केलं. घटना गंभीर असल्यानं जामखेड ग्रामीण रुग्गाणालयानं तत्काळ जामखेड पोलिसांना ही खबर दिली. जामखेड पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. प्रकरण मारहाणीचं असल्याचं स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी तपास सुरु केला. डेडबाँडीची अवस्था पाहता काही फाँरेन्सिक तपासण्या आवश्यक होत्या. ते तज्ज्ञ नगरमध्ये उपलब्ध नसल्याने अखेर, हे पोस्टमाँर्टम पुण्याला करण्याचे ठरले. त्यानंतर मृत रावसाहेब यांचे शवविच्छेदन पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले.

ससून रुग्णालयाने दिलेला अहवाल व पोलिसांची शंका बरोबर निघाली. ससून रुग्णालयाच्या डाँक्टरांनी पोटाला गंभीर फटका बसल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचा रिपोर्ट दिला. हा रिपोर्ट आल्यानंतर मंगळवारी 28 एप्रिलला पोलिस हेड काँन्स्टेबल प्रवीण इंगळे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय दंड विधान कलम 2023 नुसार कलम 103 (1), शस्त्र अधिनियम कलम 4 व 5 नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तत्काळ मुलगा अशोकला अटक झाली. किरकोळ कारणातून बाप-लेकातील भांडण विकोपाला गेले आणि हा अनर्थ घडला. या घटनेनंतर संपूर्ण जामखेड तालुक्यात खळबळ उडाली. पोलिसांनी मुलाला अटक केली असली तरी, या घटनेची चर्चा मात्र अजूनही सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button