Explained

2030 पर्यंत भारत कोलमडेल, गरीबी वाढेल, भुकेनं लोक… नेमकं झालंय काय?

कोणतेही युद्ध हे जगाला परवडत नसतं. युद्ध जरी, एक-दोन किंवा जास्त देशांत सुरु असतं, तरी त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात. सध्या अमेरिका-इराण यांच्यातील युद्धाला स्वल्पविराम मिळालाय. परंतु हे युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्हेही आहेत. अमेरिका, इस्त्रायलनं इराणला हलक्यात घेतलं आणि आता तोच इराण या दोन्ही देशांच्या मानगुटीवर बसलाय. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करुन, इराणनं जगातील निम्म्या देशांचं नाक दाबलंय. यामुळे तेल व ज्वलनशिल वायुचं संकट इतर देशांवर पसरलंय.

या युद्धामुळं किती नुकसान झालंय या बातम्यासोबतच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ती बातमी आहे, जगातील गरिबीची… होय, हे युद्ध सुरु राहिलं तर जगातील तब्बल तीन कोटी लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्राच्या डेव्हलपमेंट अँड इकाँनाँमिक विभागानं, गरिबीचा हा गंभीर इशारा दिलाय. हा तणाव असाच अजून काही दिवस कायम राहिला तर, जागतिक विकासदर तब्बल दोन टक्क्यांनी घटेल असाही अंदाज बांधला जात आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये गेली 50 दिवस युद्ध सुरु होतं. आता या दोन्ही देशांनी युद्धाला स्वल्पविराम दिला असला तरी, हे युद्ध कधीही भडकू शकतं, अशी स्थिती आहे. या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली. मुळात ही सामुद्रधुनीच या युद्धाचं खरं कारण होतं, असही समोर आलं. इराणला या सामुद्रधुनीवर हक्का गाजवायचा होता व अमेरिकेला ते मान्य नव्हतं. त्यामुळेच हा वर्चस्ववादाचा संघर्ष थेट युद्धापर्यंत येऊन पोहोचला, असं समोर आलं.

युद्धादरम्यान जेव्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली, तेव्हा जगभरातील कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला. जगातील निम्म्या देशांवर तेल व एलपीजी संकट आलं. हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग बंद झाल्यानंतर तेलाचे दर प्रति बॅरल तब्बल 120 ते 150 डाँलर्सने वाढले. काही देशांत हे दर वाढण्याची शक्यता अजूनही आहे. जेव्हा तेल व गॅस महागतो, त्यावेळी इतर गोष्टीही सहाजिकच महाग होतात. झालंही तसंच… जगभरातील निम्म्याहून अधिक देशात गेल्या काही आठवड्यांपासून महागाईने उच्चांक गाठलाय.

सध्या जागतिक अर्थव्यवस्था मंदावलीय. यामुळे भविष्यात बेरोजगारी वाढण्याचाही धोकाही समोर आलाय. म्हणजेच अनेक देशांपुढे आता गरिबी वाढण्याची समस्या उभी राहिलीय. संयुक्त राष्ट्र विकास प्रमुख अलेक्झांडर डी क्रू यांनी याच धोक्यावर दोन दिवसांपूर्वी भाष्य केलं. मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर होणाऱ्या धोकादायक परिणामांवर अलेक्झांडर क्रू यांनी लक्ष केंद्रित केलं. ते म्हणाले की, “जर अमेरिका आणि इराणमधील तणाव असाच राहिला आणि होर्मुझची सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिली, तर जागतिक विकास दर 1.5 ते 2 टक्क्यांनी घसरेल.

ही घसरण जगातील 3 कोटी लोकांना अत्यंत गरिबीत ढकलण्यास पुरेशी आहे. हे 3 कोटी लोक प्रामुख्याने आफ्रिकी, दक्षिण आशियाई अशा देशांमधील आहेत, जे अन्नासाठी आणि इंधनासाठी आयातीवर अवलंबून आहेत. जेव्हा इंधनाचे दर वाढतात, तेव्हा प्रत्येक गोष्टीची किंमत वाढते. इराण आणि आजूबाजूचा परिसर हा खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा मोठा स्त्रोत आहे. खते महागली की उत्पादन कमी होते आणि अन्नाचे दर वाढतात.”

अमेरिका- इराण युद्धाच्या परिणामामुळे जागतिक जीडीपीच्या ०.५% ते ०.८% भागाचे नुकसान झाले आहे. जे काही उभारण्यासाठी अनेक दशके लागतात, ते नष्ट करण्यासाठी आठ आठवड्यांचे अमेरिका-इराण युद्ध पुरेसे होते, असे मत अलेक्झांडर डी क्रू यांनी व्यक्त केले. हे युद्ध 28 फेब्रुवारी रोजी सुरू झाले, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणच्या प्रत्युत्तरानंतर, जगाची जीवनरेखा असलेले तेल आणि वायूचे मार्ग बंद झाले आणि ऊर्जेसह जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी विस्कळीत झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील हे युद्ध भविष्यात संपले तरी, त्याचे आधीच दिसणारे परिणाम कायम राहतील. ज्यामुळे जगभरातील 30 दशलक्ष किवा त्याहून अधिक लोक संभाव्यतः गरिबीत ढकलले जातील, असा इशारा देण्यात आलाय.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या इशाऱ्यानुसार भारत, बांगलादेश, श्रीलंका, सोमालिया, सुदान, टांझानिया, केनिया आणि इजिप्त यांसारख्या देशांना या युद्धाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. येत्या काही महिन्यांत अन्नसुरक्षेचा अभाव मोठ्या प्रमाणावर पसरेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याबद्दल फार काही करता येणार नाही. या गरिबीचा फटका भारतालाही बसणार आहे. गेल्या काही वर्षात भारताने गरिबी निर्मूलनात मोठी प्रगती केली असली, तरी हा जागतिक परिणाम भारताला दोन प्रकारे भोगावा लागू शकतो. भारत त्याच्या गरजेपेक्षा 80 टक्के जास्त तेल आयात करतो. पण सध्याच्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेल महागले की देशांतर्गत महागाई वाढेल.

ज्यामुळे देशातील सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसेल. जर जगभरात गरिबी वाढली, तर भारताकडून होणारी वस्तूंची आणि आयटी सेवांची निर्यात कमी होईल. ज्याचा परिणाम देशाच्या विकास दरावर होईल. त्यामुळे भारतातही तब्बल 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त कुटुंब अत्यंत गरिबीत ढकलले जातील, असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. अमेरिका व इराणमधील युद्धाच्या झळा आत्ता जरी भारताला बसत नसल्या तरी पुढच्या पाच-दहा वर्षांत मात्र या झळा नक्की बसतील, असं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button