
नगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्याची जनगणना लवकरच सुरु होणार आहे. 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणनेची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर 15 मे पासून प्रत्यक्ष जनगणना सुरु होईल. प्रशासनाकडून या जनगणनेची सगळी तयारी आता पूर्ण झाली आहे. त्यासाठी पहिल्यांदा जिल्ह्यातील घरांची यादी निश्चित करण्यात आली.
या यादीत अहिल्यानगर महानगर पालिका कार्यक्षेत्र वगळून तब्बल 6 हजार 870 घरगट तयार करण्यात आले. या प्रत्येक गटांत घरांची संख्या जवळपास 150 ते 180 अशी ठेवण्यात आली.
या सगळ्यांचा हिशोब पाहिला तर नगर जिल्ह्यात तब्बल 10 लाख 70 हजार घरे असल्याची आकडेवारी समोर आली. या सगळ्या घरांत आता शासकीय कर्मचारी जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सुमारे 6 हजार 869 प्रगणक, 1 हजार 145 पर्यवेक्षक नेमले गेले आहेत. याशिवाय 10 टक्के अतिरिक्त मनुष्यबळही नियुक्त केले आहे. ही जनगणना डिजीटल स्वरुपात होणार असल्याने या जनगणनेची उत्सुकता ताणली आहे. प्रत्येक कुटुंबाला तब्बल 33 प्रश्न विचारले जातील, असेही सांगितले जात आहे.





