
अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्ग आणि काही अंतर्गत रस्त्यांलगतच्या हॉटेल-लॉजिंगबाबत नागरिकांकडून गंभीर तक्रारी करण्यात येत आहेत. देहविक्रीचे कथित प्रकार काही ठिकाणी सुरू असल्याचा आरोप असून, कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा हे प्रकार सुरू होत असल्याची चर्चा आहे.
छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, पुणे महामार्ग तसेच नगर-दौंड मार्गावरील काही हॉटेल आणि लॉजिंगबाबत नागरिकांनी पोलिसांकडे लक्ष वेधले आहे.
केवळ तात्पुरती कारवाई न करता या प्रकारामागील संपूर्ण साखळीचा तपास करण्याची मागणी होत आहे. मध्यस्थ, हॉटेल चालक-मालक आणि अन्य संबंधितांची भूमिका तपासण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
काही ठिकाणी संशयास्पद वर्दळीमुळे महिला, पालक आणि विद्यार्थिनींमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचेही तक्रारींमध्ये म्हटले आहे.
त्यामुळे पोलिसांनी हॉटेल-लॉजची नियमित तपासणी करून, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, या सर्व तक्रारी आणि आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.





