
गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या दिवशीच जामखेडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय. जामखेड तालुक्यातील जवळा-मतेवाडी परिसरात सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी दुर्दैवी अपघात घडला. मतेवाडी येथील सव्वा वर्षाच्या देवांश सचिन मते या चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, देवांशचे वडील सचिन सुग्रीव मते हे शेतातील मका कुट्टीचे काम पूर्ण करून ट्रॅक्टर घेऊन घराजवळ आले होते. त्यावेळी देवांश अंगणात खेळत होता. खेळता खेळता तो ट्रॅक्टरच्या जवळ कधी पोहोचला, याची कल्पना कुटुंबीयांना आली नाही.
ट्रॅक्टर हलवत असताना चिमुकला मागच्या चाकाखाली आला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. गणेश स्थापनेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने मते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





