Explained

नगरचा पलंग, बुऱ्हाणनगरची पालखी आणि 230 वर्षे जुना दांडा… तुळजाभवानीचं धक्कादायक रहस्य…

मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांनी आई तुळजाभवानीचं तुळजापूर पाहिलंय. तिथलं वैभव अनुभवलंय. पण तुम्हाला माहित आहे का, तुळजापूरला जाण्यापूर्वी आई भवानीनं तिचं बालपण कुठं घालवलं होतं? होय! एक असा इतिहास… जो आजही अनेकांसाठी एक गुढ रहस्य आहे. साक्षात ब्रह्मांडनायिका वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत एका गावात एका सामान्य मुलीसारखी बालरुपात राहिली होती! हे गाव कोणतं? तर अहिल्यानगर शहराजवळील ‘बुऱ्हाणनगर’..! पण आई भवानी बुऱ्हाणनगर का राहिली? आज ११०० वर्षांनंतरही दरवर्षी निघणाऱ्या एका भव्य पालखीशी आणि एका अनोख्या पलंगाशी तिचा संबंध कसा जोडलेला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आम्ही तुम्हाला बुऱ्हाणनगरची पालखी आणि नालेगावचा पलंग यांमागील तो इतिहास सांगणार आहोत, जो यापूर्वी तुम्ही कधीच ऐकला नसेल! व्हिडीओत आम्ही योग्य संदर्भ गुंपण्याचा पुरेपुर प्रयत्न केलाय.

व्हिडीओ सुरु करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. आम्ही काही लोककथा, संदर्भ, परंपरा आणि काही दाखले घेऊन ऐतिहासीक व्हिडीओ करत असतो. आपल्या गावाची, जिल्ह्याची व एकंदर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा प्रेक्षकांना समजावी, हा आमचा प्रामाणिक हेतू असतो. ना आम्ही काही अंधश्रद्धा पसरवतो, ना विज्ञानाला चॅलेंज देतोय…. फक्त रुढी-परंपरांची ओळख व्हावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू असतो… आजचा व्हिडीओही रुढी-परंपरा व काही संदर्भावरुन गुंफलेला आहे.

इतिहास आणि स्थानिक कथांनुसार, बुऱ्हाणनगर हे केवळ एक गाव नाही. तर ते आई तुळजाभवानीचं ‘माहेर’ मानलं जातं. साक्षात आदिमाया भवानी इथे वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत बालरुपात वास्तव्यास होती. एका लहान मुलीच्या रुपात ती या भागात बागडली. तिनं भक्तांना दर्शन दिले. पण जेव्हा ती १२ वर्षांची झाली, तेव्हा तिने तिचं पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी बुऱ्हाणनगर सोडलं. आणि ती तुळजापूरकडे मार्गस्थ झाली. पण जाताना ती तिच्या या माहेरच्या भक्तांना विसरली नाही! तिनं बुऱ्हाणनगरच्या ‘भगत’ कुटुंबाला आणि नगरच्या ‘पलंगे’ कुटुंबाला एक वचन दिलं… ‘मी जरी तुळजापूरला गेले, तरी दरवर्षी विजयादशमीला मी माझ्या या माहेरच्या लोकांच्या पालखीत बसेन आणि तुमच्याच पलंगावर विश्रांती घेईन!’ एका १२ वर्षांच्या मुलीने ११०० वर्षांपूर्वी दिलेलं हे वचन… आजही तिचे भक्त तितक्याच निष्ठेने पाळत आहेत!

याच वचनामुळे, गेल्या ११०० वर्षांपासून म्हणजेच ३५ पेक्षा जास्त पिढ्यांपासून नगर जिल्ह्यात एक अनोखी प्रथा सुरू आहे. त्या काळात समाजात जातीभेद टोकावर होता, पण देवीने हा मान नगरच्या तेली समाजातील भगत आणि पलंगे कुटुंबाला दिला. देवी कोणत्याही राजाच्या किंवा श्रीमंताच्या पालखीत बसत नाही, तर ती बसते बुऱ्हाणनगरच्या ‘भगत’ कुटुंबाच्या पालखीत! कारण भगत हे त्या बालरुपी देवीचे सर्वात जवळचे भक्त होते. हा मान इतका कडक आहे की, विजयादशमीच्या दिवशी जोपर्यंत बुऱ्हाणनगरची पालखी तुळजापुरात पोहोचत नाही, तोपर्यंत मुख्य सीमोल्लंघन सोहळा सुरूच होऊ शकत नाही. साक्षात राजघराणीही या माहेरच्या पालखीची वाट पाहत उभी असतात!

आता वळूयात या कथेच्या सर्वात थरारक भागाकडे… पालखीचा दांडा! दरवर्षी विजयादशमीला जी पालखी संपूर्ण तुळजापुरातून फिरते, ती दरवर्षी नवीन बनवली जाते. पण, या पालखीचा मुख्य लाकडी दांडा मात्र २३० वर्षांपेक्षा जास्त जुना आहे! दरवर्षी भाद्रपद महिन्यात बुऱ्हाणनगरचे भगत कुटुंब हा पवित्र दांडा घेऊन ‘राहुरी’ येथे जातात. तिथे पिढ्यानपिढ्या काम करणारे सुतार बांधव अत्यंत पवित्र वातावरणात, उपवास करून या दांड्याला नवीन पालखी जोडतात. २३० वर्ष जुनं लाकूड! ज्याला आजपर्यंत वाळवी लागलेली नाही की तो कुठे सडला नाही. हा दांडा म्हणजे त्या १२ वर्षांच्या बालरुपी देवीच्या आणि भक्तांच्या भेटीचा जणू एक जिवंत साक्षीदारच आहे!

पण मित्रांनो, इथेच या कथेत सर्वात मोठा ट्विस्ट येतो! अनेक लोक म्हणतात की हा पलंग आणि ही पालखी कधीच एकत्र येत नाहीत. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे! सत्य काय आहे माहित आहे? प्रवासाच्या सुरुवातीलाच, नगर जवळील ‘भिंगार’ या ऐतिहासिक ठिकाणी या दोघांची एक अत्यंत अद्भूत आणि अंगावर काटा आणणारी भेट होते! बुऱ्हाणनगरहून निघालेली देवीची पालखी जेव्हा भिंगार कॅम्पच्या हद्दीत येते, नेमक्या याच वेळी, नालेगावाहून निघालेला मानाचा पलंग भिंगारच्या मारुती मंदिरात दाखल होतो! तिथे हजारो भक्तांच्या साक्षीने ‘पलंग आणि पालखीची भव्य भेट’ होते! हा सोहळा पाहण्यासाठी भिंगारमध्ये दरवर्षी लाखो लोकांची जत्रा भरते. पण भिंगारची ही ऐतिहासिक भेट झाल्यानंतर मात्र, तुळजापूरच्या प्रवासा दरम्यान हे दोन्ही सोहळे आपापल्या वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या टप्प्यांनी पुढे मार्गस्थ होतात. म्हणजेच, सुरुवातीला भेटून एकत्र निघणारे हे दोन सोहळे, नंतर तुळजापूर पोहोचेपर्यंत पुन्हा कधीही समोरासमोर येत नाहीत!

भिंगारवरून वेगळे झाल्यानंतर, नालेगावचे ‘पलंगे कुटुंब’ देवीचा पलंग घेऊन पुढे जाते. नवरात्रात नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केल्यानंतर आणि विजयादशमीला सीमोल्लंघन केल्यानंतर देवी प्रचंड थकलेली असते. आपल्या हक्काच्या माहेरच्या लोकांनी लेकीला विसावा देण्यासाठी बनवलेला हा सागवानी लाकडाचा भव्य पलंग तुळजापूरला पायी चालत नेला जातो. पालखी म्हणजे देवीचं वैभव आणि पलंग म्हणजे देवीची शांतता… आणि या दोन्ही उर्जा भिंगारनंतर संपूर्ण प्रवासात कधीही एकत्र आणल्या जात नाहीत.

आणि मग येतो तो विजयादशमीचा सोहळा! बुऱ्हाणनगरची पालखी जेव्हा तुळजापुरात प्रवेश करते, तेव्हा लाखो लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबातील मुख्य मानकरी जेव्हा पालखी खांद्यावर घेतात, तेव्हा त्यांच्यात साक्षात देवीची शक्ती संचारते. पण या कथेचा शेवट अजून थक्क करणारा आहे. उत्सव संपला की, ज्या पालखी आणि पलंगासाठी वर्षभर लाखो लोक वाट पाहत होते, ती पालखी आणि तो पलंग सन्मानपूर्वक विसर्जित केला जातो. पुन्हा कधीच वापरला जात नाही! नवीन वर्षात पुन्हा सगळं शून्यापासून सुरू होतं. वयाच्या १२ व्या वर्षी बुऱ्हाणनगर सोडलेली ती लहान मुलगी म्हणजेच आपली आई भवानी आज ११०० वर्षानंतरही या प्रथेच्या रूपाने आपल्या माहेरशी जोडलेली आहे. ही कथा आहे आपल्या संस्कृतीची, जी आजही विज्ञानाला आव्हान देत जिवंत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button