मित्रांनो, आजचा विषय जरा वेगळा आहे. आपण जेव्हा ‘कला केंद्र’ किंवा ‘संगीत बारी’ हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं..? तर रात्रीचा झगमगाट, लावणी आणि काही वादग्रस्त चर्चा… पण तुम्हाला माहीत आहे का, की अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड आणि खर्डा परिसरात असणाऱ्या या कलेला थेट मराठेशाहीचा आणि पेशवेकाळाचा दिमाखदार वारसा लाभलाय..? ज्या कलेला कधीकाळी राजाश्रय होता, जी कला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान होती, ती आज उपेक्षेच्या आणि बदनाम गुन्हेगारीच्या विळख्याात कशी अडकली? आज आपण इतिहासकारांच्या भक्कम पुराव्यांच्या आधारे हाच विषय जाणून घेणार आहोत… जामखेडच्या कलावंतांचा शेकडो वर्षांचा इतिहास आभ्यासणार आहोत.
आपल्या आजच्या विषयाचा इतिहास सुरू होतो, १७ व्या आणि १८ व्या शतकात. खर्डा हे गाव जेव्हा सरदार निंबाळकरांनी एक समृद्ध व्यापारी बाजारपेठ म्हणून वसवलं. तेव्हा तिथे केवळ व्यापारीच नाही, तर अनेक गुणवान कलाकारही आले. १७९५ च्या ऐतिहासिक खर्डा लढाईच्या काळात इथे मराठ्यांच्या आणि निजामांच्या लाखो सैनिकांच्या छावण्या पडल्या होत्या. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक गो. स. सरदेसाई यांनी आपल्या ‘मराठी रियासत’ (उत्तर विभाग-२) या ग्रंथात खर्डा येथील सैन्याच्या छावण्या आणि तिथल्या संस्कृतीचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. त्या काळी युद्धभूमीवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि सरदारांच्या मनोरंजनासाठी संगीत आणि नृत्याचा आश्रय घेतला जाई.
या स्त्रियांना ‘कलावंतीण’ म्हटलं जायचं. हा शब्द आजच्यासारखा नकारात्मक नव्हता, तर तो ‘कलेमध्ये पारंगत असलेली स्त्री’ साठी आदराने वापरला जायचा. त्या शास्त्रीय संगीत, कथक, आणि जुन्या डबऱ्यातील लावण्या गाण्यात हुशार असत. खर्डा किल्ल्याला असलेला अधिकृत ‘कलावंतीण बुरूज’ आणि गावातील ‘कलावंतीण वाडे’ हे याचे पुरावे आहेत. या महिलांना त्या काळी अत्यंत सन्मानाने ‘राजाश्रय’ मिळाला होता. त्यांना जहागिरी आणि मानाचे स्थान मिळत असे…
पण जसजशी राजेशाही आणि संस्थाने संपली, तसा या कलावंतांच्या डोक्यावरचा राजाश्रयही संपला. ब्रिटिशकालीन ‘अहिल्यानगर गॅझेटियर’ मधील नोंदीनुसार, १९ व्या शतकाच्या सुरुवातीला संस्थाने खालसा झाल्यानंतर या उपेक्षित समाजातील कलाकारांना जगण्यासाठी गावगाड्यात यावे लागले. जामखेड हे बीड, धाराशिव आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने, हे लोककलेचे मुख्य केंद्र बनले. त्यातूनच तमाशाचा जन्म झाला. दरवर्षी भरणारी खंडोबाची जत्रा आणि पीर बाबांच्या उरुसामध्ये या तमाशा फडांना मोठी मागणी असायची. पुढे १९८० आणि ९० च्या दशकपर्यंत, उघड्यावरच्या तमाशाचे रूपांतर बंदिस्त ‘संगीत बारी’ आणि ‘कला केंद्रांमध्ये’ झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कौटुंबिक संकटात सापडलेल्या, गरिबीने होरपळलेल्या महिला केवळ आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी या केंद्रांमध्ये आश्रय घेऊ लागल्या. ही कला केंद्र या महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार बनली.
इथं आपल्याला एक गोष्ट खूप संवेदनशीलतेने समजून घ्यावी लागेल. या कला केंद्रांमध्ये नाचणारी प्रत्येक महिला आपली आवड म्हणून येत नाही. समाजाने नेहमीच त्यांच्याकडे संशयाने पाहिले, त्यांना ‘तमासगीर’ म्हणून हिणवले. पण कुणीही त्यांच्या वेदना समजून घेतल्या नाहीत. या महिला रात्रीच्या वेळी स्टेजवर हसत-नाचत असल्या, तरी दिवसा त्यांच्या पाठीवर आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या औषधांचा खर्च, भावाचे शिक्षण आणि मुलांच्या भविष्याची चिंता असते. अनेकदा कला केंद्र बंद पडल्यास या कलाकारांवर उपासमारीची वेळ येते. कर्जबाजारी होऊन त्यांचे संसार रस्त्यावर येतात. समाजाने त्यांना टाळले, पण त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा पुनर्वसनासाठी कधीच हक्काचे पाऊल उचलले नाही. घुंगरांच्या प्रत्येक आवाजाच्या मागे या महिलांच्या डोळ्यांतील अश्रू दडलेले असतात, हे ढळढळीत सत्य आहे.
गेल्या काही वर्षांत या पवित्र लोककलेला आणि कलावंतांच्या उपजीविकेला एका अत्यंत काळ्या प्रवृत्तीने ग्रासले. कला केंद्र वाईट नसतात, पण तिथे येणारे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि बाहेरील टोळ्यांनी या क्षेत्राला बदनाम केले. रात्रीच्या वेळी पैशांची उधळपट्टी, अवैध दारू विक्री आणि गुंडांचे वाढते अड्डे यामुळे जामखेडमधील काही कला केंद्रांना गुन्हेगारीची किनार लाभली. जमिनींचे वाद, स्थानिक वर्चस्व किंवा वर्चस्वाच्या लढाईतून इथे अनेकदा गोळीबार, हाणामाऱ्या आणि खुनासारख्या घटना घडल्या. दुर्दैवाने, गुन्हेगार गुन्हे करून निघून जातात, पण नाहक बदनामी मात्र इथे प्रामाणिकपणे कला सादर करणाऱ्या महिलांच्या पदरी येते. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे आणि सुरक्षेच्या कारणामुळे प्रशासनाला अनेकदा ही केंद्रे बंद करावी लागतात, ज्याचा थेट फटका निष्पाप कलाकारांच्या पोटावर बसतो.
आता काहींना आमचा हा मुद्दा आवडणार नाही. परंतु या कलाकारांकडे कला म्हणून पाहिले तर, त्यांच्यातील माणूसपणही जपता येणार आहे. जामखेडच्या या कलेचा प्रवास जितका समृद्ध आहे, तितकाच तो आजच्या घडीला विचार करायला लावणारा आहे. इतिहासकार गो. स. सरदेसाई आणि जुनी गॅझेटिअर्स ज्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देतात, तो वारसा आज गुन्हेगारीमुळे मलीन होतोय. गरज आहे ती या कलेचे व्यापारीकरण थांबवण्याची आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला या क्षेत्रापासून दूर ठेवण्याची. कलावंतांना सन्मान मिळायला हवा, त्यांच्या सुरक्षेची हमी मिळायला हवी आणि कलेच्या नावाखाली चालणारी गुन्हेगारी मुळापासून उपटून टाकली पाहिजे, तरच जामखेडच्या या ऐतिहासिक भूमीचा खरा वारसा जिवंत राहील.





